फेसबुक वर निर्मिती कट्याविषयी आज जो लेख आला आहे तो आहे तसाच इथे पोस्ट करतोय, लेखकांना आपले साहित्य अनेक नव्या वाचकांपर्यंत पाठवायची एक गाजलेली जागा आता अनेक नव्या साहित्य विधांसाठी खुली झाली आहे.
नमस्कार सर्वांना,
“निर्मिती कट्टा”
खूप वर्षांनी तुमच्याशी बोलायचे निमित्त मिळाले आहे.
न लिहिलेली पत्रे हे तुमचे पेज गेली कित्येक वर्षे तुम्ही अविरत चालवत आहात. मी या पेजवरून काही वर्षांपूर्वी बाजूला झालो आणि डॉ स्वाती धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ते उत्तम काम करीत आहे. अर्थात पत्रांची संख्या रोडावली आहे पण तरीही विविध विषयांवरची पत्रे येत राहतात, ती पोस्ट होतात, अलीकडच्या काळात काही पत्रे विलक्षण व्हायरल झाली, त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. मी जरी जरा बाजूला झालो असलो तरी अशा गोष्टी माझ्या नजरेत भरतातच.
“न लिहिलेली पत्रे”चे एक भावंडं होते. “नुक्कड”! ज्यावर आपण कथा पोस्ट करायचो. दैवयोगाने कालच सहा वर्षापूर्वी “नुक्कड - पुढील वाटचाल” या विषयावर आयोजित केलेली चर्चा वाचली. नुक्कड त्यावेळीस किती सशक्त होते याची जाणीव झाली. आजही ते विवेक साहित्य मंच च्या छत्रछायेखाली कार्य करते आहे. पण याचवेळी आमच्या मनात एक विचार आला की, “का नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी साद खालून एक नवे मुक्त व्यासपीठ सुरु करावे? पुन्हा एकदा चैतन्य निर्माण व्हावे? पुन्हा एकदा लिहिते हात पुन्हा सळसळून लिहू लागावेत?”.
त्यावेळच्या जवळपास पंचवीसच्या वर कथा लेखकांनी आपल्या कथांची पुस्तके आता प्रकाशित केली आहेत,. आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे शिवाय पारितोषिके प्राप्त केली आहेत. येणारा काळ ही यादी आणखी मोठी करेल याची आम्हाला खात्री आहे.
यासाठीच आम्ही “न लिहिलेली पत्रे” च्या अंतर्गत एक नवे व्यासपीठ सुरु करण्याचे योजत आहोत. त्याचे नाव असेल “निर्मिती कट्टा”.
हा कट्टा साहित्य निर्मितीसाठी असेल व यात समावेश असेल:
-
प्रवासवर्णन (दीर्घ आणि क्रमश: येऊ शकेल असे)
-
व्यक्तिचित्रणे (ती सत्यावर आधारित असू शकतात किंवा काल्पनिक)
-
कथा - इथे जरा आणखी काही मुद्दे स्पष्ट करण्याची इच्छा आहे. नुक्कडवर सहा वर्षापूर्वी झालेल्या चर्चेचा आधार ह्याला आहे. आपल्याकडे कथा प्रामुख्याने कौटुंबिक पार्श्वभूमीच्या आल्या. पण कथेत अनेक प्रकार आहेत जसे की विज्ञानकथा, रूपककथा, दंतकथा, रहस्यकथा, भयकथा, पण हे वैविध्य नुक्कडवर आले नाही. दीर्घकथासुद्धा नुक्कड वर आली नाही. हे सर्व प्रकार आता यायला हवेत आणि त्यांनी “निर्मिती कट्टा” हे व्यासपीठ समृद्ध व्हायला हवे.
-
नुक्कडने कादंबरी हा प्रकार हाताळला नाही. जरी “न लिहिलेली पत्रे” वर पत्र रूपातील कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. पण आता या व्यासपीठावर जर कुणाला कादंबरी लिहायची असेल आणि ती क्रमश: प्रसिद्ध करायची तयारी असेल तर तसेही करता येईल.टप्प्या टप्प्याने लिहिणे बऱ्याच जणांना सुकर वाटते.
-
हे व्यासपीठ कवितेसाठी वापरू नये.
-
हे सर्व साहित्य निर्माण होत असताना विक्रम भागवत यांची सर्वतोपरी मदत आपल्याला मिळेल. म्हणजे तुम्ही पाठवलेले साहित्य वाचून त्यावर संस्कार करणे, त्यात सुधारणा आवश्यक असल्यास तशी आपल्याशी चर्चा करणे अशा संपादकीय कामाचा समावेश असेल. याचा दुसरा अर्थ असा आहे की पाठवलेले साहित्य तसेच पोस्ट होईल अशी आशा बागळू नका. कदाचित काही किमान गुणवत्ता निकष नसतील तर साहित्य नाकारले जाण्याची शक्यतासुद्धा आहेच. फक्त टायपो (टाईप करताना झालेल्या चुका) दुरुस्त करूनच साहित्य पाठवणे आवश्यक आहे. टायपो असलेले साहित्य तात्काळ नाकारले जाईल.
-
या व्यासपीठावर सेन्सॉर असणार नाही. कुठलाही विषय/कुठलीही संवेदना या व्यासपीठाला त्याज्य असणार नाही. अर्थात जातीय, धार्मिक आणि वर्गीय तेढ निर्माण करणारे लिखाण नाकारले जाईल.
आपल्या साहित्याची सॉफ्ट कॉपी पाठवायची कुठे? तर :
आणि चर्चेसाठी विक्रम भागवत यांचा व्हाट्स अप क्रमांक 7045192548 तुम्ही वापरू शकता.
विशेष सूचना: डॉ. स्वाती धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली “न लिहिलेली पत्रे” हे व्यासपीठ पुढे काम करीत राहीलच. आणि आपली पत्रे तुम्ही nlihilelipatre@gmail.com या मेल आयडी वरच पाठवायची आहेत.
एका अर्थी तुम्हाला एकाच पेजवर, ज्याचे जवळपास एक लाख पाच हजार फॉलोअर्स आहेत, वैविध्यपूर्ण साहित्य वाचता येईल. त्याचवेळी नवनिर्मिती करणाऱ्या लिहीत्या हातांना एक लाख पाच हजार वाचक उपलब्ध होतील.
तुमच्या प्रतिक्रियांची आणि साहित्याची आम्ही वाट पाहात आहोत.
तुमचे
@vikrambhagwat आणि डॉ. स्वाती धर्माधिकारी
Creative design by Sayali Ghotikar
