अकस्मात धोका टाळण्यासाठी

आज वर्षभराने नियमित तपासणीसाठी रुबी हॉलची वाट धरली. कालच सांगितलेल्या रक्त तपासण्या करून त्यांचे रिपोर्ट ताब्यात घेतले होते. घरातली सगळी कामे आवरून धावत पळत तिथे पोहोचले. मुख्य डॉक्टरांना भेटण्याअगोदर त्यांच्या सहाय्यक डॉक्टरांकडे तपासणी केली. त्यामध्ये ब्लड रिपोर्टची नोंद केली. ब्लड प्रेशर, नाडी व हृदयाचे ठोके तपासले. काही त्रास होतो का याची विचारणा केली. त्यानंतर मुख्य डॉक्टरांकडे पाठवले.
त्या रिपोर्टच्या अनुषंगाने मुख्य डॉक्टरांनी मला पहिलाच प्रश्न विचारला.
डॉ : वजन का वाढलं ?
मी : (दबक्या आवाजात) डॉक्टर, सध्या अनियमित आहार तर आहेच, परंतु व्यायाम सुध्दा अजिबात होत नाही.
डॉ : म्हणजे तुम्ही रोज आंघोळ करत नाहीत.
मी संभ्रमात
डॉ : बाह्य शरीर स्वच्छ राहण्यासाठी जशी आंघोळीची गरज असते तसंच ते आतून स्वच्छ राहण्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम हे दोन्ही गरजेचे आहे.
तपासणीत ब्लडप्रेशरचा बारा 150 /90 पर्यंत गेलेला. मी साधारणतः महिन्यातून एकदा रक्तदाब, हृदयाचे ठोके, ऑक्सिजनची पातळी त्याचबरोबर रक्तातील साखर घरीच तपासत असते.
डॉ : इथे जो रक्तदाब तपासला जातो त्यापेक्षा तुम्ही घरी चेक केलेल्या रक्तदाब तपासणीची जी नोंद ठेवतात ती तुमच्यासाठी व आमच्यासाठीही जास्त महत्त्वाची आहे. महिन्यातून एकदा रक्तदाब तपासणी आवश्यक आहे.
मी : डॉक्टर, मी हे घड्याळावर चेक केलेलं आहे.
डॉ : सहसा ते टाळा. एक चांगलं मशीन घ्या. घरात थर्मामीटर जसा आवश्यक असतो तसंच रक्त तपासणीसाठीचं मशीन ही घरात आवश्यक आहे. घरातल्या सगळ्यांनीच महिन्यातून एकदा आपला रक्तदाब तपासायला हवा.
रक्तदाब तपासणीची पण योग्य पद्धत आहे. मी तुम्हाला ती समजवून सांगतो.
१. प्रथम त्याचा पट्टा हातावर बांधताना तो कपड्यावर न येता कातडीवर यायला हवा.
२. खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत आपली पाठ टेकलेली हवी.
३. ज्या हाताला पट्टा बांधला आहे तो हात टेबलावर व्यवस्थित टेकलेला असावा.
४. पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्या हाताला बांधलेला पट्टा, टेकलेला हात व हृदय तिन्ही एकाच पातळीवर असायला हवे. म्हणजेच टेबलापेक्षा आपल्या खुर्चीची उंची कमी असावी.
५. तपासणीला सुरुवात करण्याअगोदर आपण खुर्चीवर एक मिनिट तरी स्वस्थ बसायचं.
६. त्यानंतर तीन reading समोर दिसतात. Systolic, Diastolic, व Heart beats. तिन्ही रीडिंगची नोंद करायची किंवा फोटो काढायचा.
ही तपासणी केव्हा करायची याबद्दलही डॉक्टरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले.
१. तपासणी करण्याअगोदर अर्धा तास तरी आपण स्वस्थ असायला हवं. Relax असताना ही तपासणी करणे योग्य.
२. जेवणानंतर किंवा चहापानानंतर करायची नाही.
३. खूप दगदग झालेली नसावी.
४. थोडीफार झोपही झालेली असावी.
५. मी रविवारी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान दर आठवड्याला तपासणी करतो.
अतिशय व्यग्र असूनही डॉक्टरांनी ही बाब अतिशय व्यवस्थित समजवून सांगितली.
मी : डॉक्टर, HDL व LDL काय प्रकार आहे.
डॉ : आता TC, TG, LDL व HDL या चार घटकांपैकी फक्त LDL वर लक्ष केंद्रित करायचं आहे. ते वाढता कामा नये. तुमचं 107 आहे ते 70 असायला हवं.
मी: डॉक्टर हे कशामुळे वाढतं ?
डॉ : (थोडासा विचार करत)
आपल्याला 1000 कॅलरीची आवश्यकता असताना आपण 1300 कॅलरीचं जेवण करतो. उरलेल्या 300 कॅलरीचं काय होतं ?
तर ते चरबी स्वरूपात साठवलं जातं. ही चरबी म्हणजेच कोलेस्टेरॉल.
मी : त्यासाठी काय करायला हवे?
डॉ: हे कंट्रोल करण्यासाठी तुमच्या आहारात सुधारणा आवश्यक आहे.
गोड, तेलकट, चटपटीत वस्तू तर टाळायलाच हव्या, परंतु जेवणाचं प्रमाणही कमी असायला पाहिजे.
दिवसातून तीन वेळा जेवण करतो म्हणजे महिन्यातून 90 वेळा जेवण करतो. त्यातले 80 जेवण हे आपल्या आरोग्यासाठी हवे आणि उरलेले 10 जेवण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ठीक राहील.
मी : म्हणजे थोडक्यात आहार कमी करायला हवा.
डॉ : हो. रात्रीचं जेवण तर अगदी थोडेच असावे. आणि हे सूत्र आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण सांगा.
हे डॉक्टर म्हणजे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ.
खरंतर माझी शारीरिक दुखण्याची कोणतीच तक्रार नव्हती. आपल्याला वाटत असतं की आपण अगदी धडधाकड आहोत. परंतु आपल्या तपासणीचे रिपोर्ट वेगळंच काही सांगत असतात. रक्तदाब, रक्तशर्करा व कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे सगळं या तपासण्यातूनच कळतंय. आपल्या आरोग्याचे निदान त्यातूनच होत असते. भविष्यामध्ये आपलं आरोग्य निरोगी राहावं, काही समस्या निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे किती आवश्यक आहे याची जाणीव झाली.
परवाच एका परिचिताशी फोनवर बोलणे झाले. दुकानावर दिसले नाही म्हणून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ‘ताई, माझी बायपास सर्जरी झाली म्हणून मी घरीच आहे’. साहजिकच मनात प्रश्न आला…अरे हृदयविकाराचा झटका आला असेल का? त्यांनी खुलासा केला. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या भावाचे अमेरिकेत हृदयविकाराने निधन झाले. खबरदारी म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या तपासण्या करून घेतल्या. त्यात डॉक्टरांना रक्तवाहिनीत 80% ब्लॉकेजेस आढळून आले, म्हणून डॉक्टरांनी त्वरित बायपास करण्याचा सल्ला दिला. थोडक्यात निभावले. थोडा उशीर झाला असता तर घरच्यांना शोक करत बसावे लागले असते.
सहा महिन्यांपूर्वी एक स्नेही जे मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत असतात. त्यांच्या coach ने routine check up करायला सांगितले. तपासणीत त्यांच्या रक्तवाहिनीतही २/३ ब्लॉकेजेस आढळून आले. तेव्हा स्टेंट टाकून निभावले.
या दोन प्रसंगात काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
परंतु ऐन ४५ व्या वर्षी आमच्या वर्गमित्राला
हृदयविकाराचा झटका आला आणि तो हे जग सोडून गेला. तेव्हा त्याच्या परिवारासाठी मन खूप हळहळले.
बऱ्याचदा आपले शरीर आपल्याला सांगत असते परंतु आपण दुर्लक्ष करतो. ऐकायचे टाळतो आणि घरच्यांच्या वियोगाला कारणीभूत ठरतो.
म्हणून म्हणते लोकहो जागे व्हा.
Precaution is better than cure.

वंदना लोखंडे
पुणे
१६/०८/२०२६