आजकाल मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागण्या अगोदरच उन्हाळी शिबीर, समर कॅम्प यांच्या जाहिराती वृत्तपत्र, नियतकालिक, हॅंडबिल, फेसबुक, इन्स्टाग्रामवर झळकू लागतात. आपण पालकही भरमसाठ फी भरून महिनाभराच्या शिबिरात मुलांचा प्रवेश निश्चित करतो. या शिबिरांतून मुलांना खूप काही शिकायला मिळेल ही पालकांची मानसिकता झाली आहे.
परंतु माझ्या मुलींच्या 'अभिनव विद्यालया’च्या मुख्याध्यापिका मीना टिचर, ज्या प्रसिद्ध बाल मानसशास्त्रज्ञ होत्या, त्यांच्या दृष्टीने हे तितके योग्य नाही. शाळेइतकीच शिस्त असलेल्या ग्राउंडवर किंवा अशा शिबिरात मुलांना आपल्या मनासारखे खेळ खेळता येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या आवडीचे खेळ खेळण्यास त्यांना वाव मिळतच नाही. त्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता वाढीस कशी लागणार? हा त्यांचा प्रश्न. आणि ते रास्तही आहे.
परंतु आमच्या वेळेस असे नव्हते. एकत्र कुटुंबात वाढलेली आम्ही भावंडं. अशी शिबिरं तेव्हा अस्तित्वात नव्हती. अस्तित्वात असली तरी परवडणारी नव्हती. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गल्लीतल्या मुला-मुलींबरोबर लंगडी, लपंडाव, दगड का माती, सोनसाखळी, आट्यापाट्या असे खेळ खेळत असू. भावांसाठी गोट्या, भोवरा, पतंग हे पर्यायही होते.
परंतु या सुटीत आमचे आई - वडिल आमच्यासाठी एक गोष्ट आवर्जून करत. वाचनालयाचा उत्तम पर्याय त्यांनी आमच्यासाठी खुला ठेवला होता. सुटीच्या काळात आम्ही जवळच्या घरगुती वाचनालयात जात असू. मला आठवते केवळ १० पैसे खर्च करून आम्हाला पुस्तक उपलब्ध होई. एका बैठकीत आम्ही ते पुस्तक वाचून मोकळे होत असू. सर्व भावंडांचे ते पुस्तक वाचून झाले की पुस्तक बदलून आणत असू. तेव्हाची पुस्तके म्हणजे जादूची छडी, जादूचा दिवा, जादूची चटई वगैरे वगैरे. एका रंजक विश्वात घेऊन जाणारी. आजच्या काळातील जे. के. रोलिंग च्या कल्पकतेतून साकारलेल्या ‘हॅरी पॉटर’ या कादंबरीची छोटेखानी स्वरूपातील ही पुस्तके आमच्या भावविश्वात रंजकतेबरोबर नकळत अगम्य साहस, उत्कंठा फुलवत.
जवळच्या लायब्ररीतली पुस्तके वाचून झाली असे वाटले की, नारायणबुवाच्या समाधीच्या आवारातील वाचनालयात जात असू.
ही पुस्तकं वाचत असतानाच आमच्या मनात एक भन्नाट कल्पना आली, की आपणही असे वाचनालय सुरू करावे. अस्मादिक व त्यांची भावंडे उपजतच हुशार असल्यामुळे दरवर्षी वर्गात पहिला नंबर ठरलेला. शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभात बक्षीस म्हणून गोष्टींची पुस्तके मिळत. त्या १०-१२ पुस्तकांनी वाचनालय सुरू करायचे आम्ही भावंडांनी ठरवले. अर्थात या विचाराला वडीलधाऱ्यांनी आडकाठी घातली नाही.
वाचनालय सुरू करायचे म्हणजे त्याला काहीतरी नाव द्यावे लागणार. ‘योगेश्वर वाचनालय’ हे नाव एकमताने निश्चित झाले. त्या काळात दर बुधवारी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय आमच्या राममंदिरात होत असे. स्वाध्याय परिवाराची इष्ट देवता म्हणजे योगेश्वर भगवान. एकमेकांना भेटल्यावर ‘जय योगेश्वर’ म्हणून अभिवादन करत असू. त्याचाच पगडा आमच्या बालमनावर होता. नाव निश्चित झाले, आता नावाचा फलकही हवाच. एका पुठ्ठ्यावर नाव लिहून आमच्या वाचनालयाचा सुंदर फलक तयार झाला. सर्व पुस्तकांवर ‘योगेश्वर वाचनालय’ ही मालकी हक्क सांगणारी अक्षरे ठळक स्वरूपात लिहून झाली. आमच्याकडे कोणती पुस्तके आहेत याची यादी एका वहीत लिहून ठेवली. त्याच वहीत तारखेनुसार, कोणते पुस्तक कोणाला दिले, त्याचे किती पैसे आले, पुस्तक परत येण्यास विलंब झाला तर त्याच्यासाठीचा दंड असा सगळा तपशील नोंद करून ठेवत असू. सकाळी दिनचर्या आटोपल्यावर ओट्यावर ही पुस्तके कल्पकतेने मांडत असू. यासाठी जुन्या खोक्यांचा वापर करून छानशी मांडणी तयार करत असू. बाजूला वाचनालयाच्या नावाचा फलक दिमाखात झळकत असे. जेवणाची वेळ झाली की पुन्हा सगळी पुस्तके छोट्याशा पेटीत ठेवून घरात जात असू. जेवण, वामकुक्षी झाल्यावर पुन्हा तीन वाजता आमचे वाचनालय, पुस्तकांची मांडणी करून सुसज्ज असे. सुदैवाने आम्हाला प्रतिसादही छान मिळत होता. २-३ रुपयांची कमाई झाली की आम्ही दुकानात जाऊन नवीन पुस्तकांची खरेदी करत असू. ३०-४० पैशांना एक पुस्तक मिळत असे. अशा पद्धतीने आमचे वाचनालय समृद्ध होत होते. बघता बघता ही संख्या ७०-८० च्या घरात पोहोचली.
आता विचार केल्यावर लक्षात येते या छोट्याशा प्रयोगातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले.
१. पुस्तक वाचनाची आवड विकसित झाली.
२. फलक तयार करण्यासाठी चित्रकला व हस्तकला या दोन्हींबरोबर कल्पकतेला वाव मिळाला.
३. सगळा तपशील नोंद करण्याच्या योग्य सवयीबरोबरच हिशेब कसा मांडावा याची जाण आली.
४. पैशांची बचत करून नवीन पुस्तकांत त्याची गुंतवणूक करावी याचे भान आले.
५. वाचनालयासाठी पुस्तक खरेदी करताना पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य मिळाले. स्वतः निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली.
६. लायब्ररीत जाताना, पुस्तक खरेदी करताना चालत जात असू. त्यामुळे नकळत शरीराला व्यायामही घडत होता.
७. हे सगळं करत असताना पुस्तकांची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी पण आम्हाला कळत होती. एखादे पुस्तक फाटले तर त्याला खळीने किंवा डिंकाने चिटकवून सुस्थितीत ठेवत असू. यासाठीची कणकेची खळ किंवा डिंक घरीच तयार करत असू. अशाप्रकारे स्वयंपूर्णतेचे बीज रोवले जात होते.
हीच सवय पुढे स्वाध्यायचे ‘नचिकेत ग्रंथालय’ सांभाळताना उपयोगी आली. परमपूज्य पांडुरंग शास्त्रींचे वाङ्मय आमच्याकडे विक्रीसाठी ठेवत असू. त्यासाठी बैठकीत एक स्वतंत्र कपाट होते. त्या कपाटाच्या चौकटीवर खडूने लिहिलेली ‘नचिकेत ग्रंथालय’ ही अक्षरे अजूनही डोळ्यासमोर आहेत. आलेल्या वाङ्मयाची नोंद ठेवणे, कोणते पुस्तक कोणाला दिले, रोख - उधार हे सगळे तपशीलवार मी लिहून ठेवत असे. कोणाची उधारी असेल तर त्याला वेळच्यावेळी आठवण करून देणे व पुस्तकांच्या विक्रीचे पैसे परत करणे हे सगळे कार्य मी प्रभूची सेवा करत आहोत या भावनेतून व्यवस्थित पार पाडत होते. यासाठी कोणतेही कमिशन मिळत नव्हते.
हे वाङ्मय घेण्यासाठी जवळपासच्या खेड्यातून अनेक स्वाध्यायी येत असत. त्यांची विचारपूस करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांची चहा पाण्याची व्यवस्था करणे ही सगळी जबाबदारी ओघाने येत होती. जनसंपर्क ही सुद्धा एक कला आहे. त्याचे बीज माझ्यात अंकुरत होते.
‘नचिकेत ग्रंथालय’ सांभाळताना ‘प.पू. दादांचे’ वाङ्मय वाचणे ओघाने आलेच. हे वाङ्मय वाचत असताना जीवन समृद्ध होत गेले. सुसंस्कारीत झाले. हे विचारधन गाठिशी असल्यामुळेच कदाचित मी लिहिती झाले. वाचनाची आवड जोपासल्यामुळे माझ्यातले सर्जनशील व्यक्तिमत्त्व कवयित्री , लेखिका म्हणून विकसित झाले.
कोणत्याही व्यवसायासाठी स्वयंसिद्ध राहण्याचे बाळकडू आम्हा भावंडांना ‘योगेश्वर वाचनालय’ चालवताना मिळाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आजच्या माझ्या 'वंदन पब्लिकेशन’चा पाया यातूनच घडला गेला असे मनापासून वाटते. लहानपणी जोपासलेला हा पुस्तकांचा छंद सुटता सुटत नाही. आजही माझ्या घरातील बराच भाग ह्या पुस्तकांनी व्यापला आहे.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वेच्छेने जोपासलेल्या ह्या खेळात्मक व्यवसायाने आज मला एक स्वतंत्र ओळख मिळवून दिली हे सांगताना आनंद होतो.
हा सर्व अनुभव गाठीशी असल्यामुळे आजकालच्या तरुण पालकांना आवर्जून सांगावेसे वाटते की मुलांना आपल्या तालावर न नाचवता त्यांच्या मनाप्रमाणे खेळ खेळू द्या. वाचन करण्यास प्रवृत्त करा. त्यांच्यातील उपजत नैसर्गिक कला वाढीस लागू द्या. त्यांना केवळ यांत्रिक रोबोट न करता त्यांच्यातील उत्कृष्ट भावनाशील माणूस घडवत रहा.
वंदना लोखंडे
०२/०८/२०२६
