एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ
(२७३२, तुकाराम गाथा)
.
आपल्या संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले हे अभंग चरण आपल्या पाठीशी सदैव आहे, आणि सांगते की एकमेकांना सहाय्य करत गेलो तर मार्ग सुकर होतो, सुपंथ होतो. याचा प्रत्यय या जानेवारी २०२५ मधे मला पुन्हा अनुभवता आला त्याची ही कहाणी आहे.
.
आपापल्या जागी लेखन करत असताही एकमेकांशी जोडलेले राहून एकाच वेळेस लेखक गट तयार करून लेखन करण्याबद्दल मला पहिला अनुभव आला तो नॅनोव्रिमो [1] या प्रकल्पात सहभागी झालो तेव्हा. जगभरात नोव्हेंबर महिन्यात असा कादंबरी लेखनाचा महिना ठरवून लेखन केले जाते. दिवसाला १६६७ शब्द किमान लिहायचे असा संकेत पाळून ३० दिवसात पन्नास हजार किंवा त्याच्या वर इतके शब्दांची कादंबरी लिहायची असा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असतो आणि अनेक वर्षांपासून जगभरातले अनेक लेखक यात शामिल होत असतात.
.
त्यांच्या संकेत स्थळावर आपला संकल्प नोंदवून त्याचा मागोवा घेत राहायचा असतो. हे लेखन करण्याकरता स्थानीय पातळीवर प्रादेशिक पातळीवर गट तयार होतात आणि कोणत्या वेळेत कोण लिहिणार याचे नियोजन केल्या जाते. आधी फेसबुक गटांवर होत असलेले हे नियोजन आता व्हॉटसॅप गटांमधेही केले जाते. ठरविक वेळेवर आपल्या बरोबर काही लोक लिहिताहेत आणि मधे मधे आपले अपडेट देताहेत एकमेकांना प्रोत्साहित करताहेत असा उर्जायुक्त हा लेखन सोहळा तिस दिवस अविरत चालतो, त्यात भाग घेतला तेव्हाची माझी कादंबरी पहिलेच लिखाण म्हणून माझ्यापुरतीच ठेवली आहे पण त्या उपक्रमाने जे अनुभव दिले त्यांचा उपयोग मला लिहितांना सातत्य टिकवणे यात होतो.
.
कादंबरीचा एक आराखडा मनात असतोच आणि तिला प्रत्येक दिवसात किमान सोळाशे सदुसष्ट शब्द पुढे न्यायचे हा संकेत असतो त्या चाकोरीत राहून देखील लेखन करता येते आणि अश्या काटेकोर संकेताचा फायदा होतो हे मी अनुभवले आहे. हे लेखन तिस दिवस झाले की मग पुढच्या महिन्यात त्याचे संपादन करून काही आवश्यक फेरफार करून कादंबरी प्रकाशित करणारे अनेक कादंबरीकार नॅनोव्रिमो या प्रकल्पाने जगाला दिले आहेत.
.
२०२१ पासून इंटरनेट वर लिहिण्याचे कौशल्य विकसित करण्याची कार्यशाळा आयोजित करणारे निकोलस कोल आणि डिकी बुश यांच्या शिप-थर्टी-फॉर-थर्टी या हॅशटॅग चा मागोवा घेत घेत मला त्यांच्या लेखक गट करून लिहिण्याच्या प्रकल्पाची माहिती मिळाली. ते दिवसाला फक्त दोनशे पन्नास शब्द इतकाच संकेत ठेवून दिवसाला एक लघुनिबंध लिहिणे आणि तो समाजमाध्यमावर रोज प्रकाशित करणे अशी तिस दिवसांची कार्यशाळा आयोजित करतात हे मला माहित होते. त्यांच्या या कार्यशाळेत सहभागी होणारे तो हॅशटॅग वापरून लघुनिबंध पोस्ट करतात ते आपल्याला एक्स (आधीच ट्टिटर) या संकेत स्थळावर वाचायला मिळते.
.
समविचारी लेखकांचा असा गट अश्याच प्रेरणेने नागपुरात २०२३ मधे तयार झाला आणि तेव्हापासून लेख लिहिणे आणि त्यावर चर्चा करणे असे काही लेखक जोडलेले होतो. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमिवर जानेवारी महिन्यात रोज एक असे तिस लेख लिहुया या संकल्पनेला गटातल्या लेखकांनी उचलून धरले आणि आमचा ३०दिवसात३० प्रयोग२०२५ सुरू झाला.
.
आमच्या गटाचे नाव आम्ही सुरपाखरांचा थवा असे ठेवलेय, म्हणून #सुरपाखरू हा पण हॅशटॅग वापरलेला आहे. हे हॅशटॅग शोधून फेसबुकवर या प्रकल्पातले अनेक लेख वाचायला मिळतात. फेसबुक यातले सगळेच लेख हा हॅशटॅग शोधून दाखवत नाही त्यांचे गणित वेगळेच आहे त्यावर आपला उपाय चालत नाही.
.
या प्रकल्पाच्या निमित्ताने रोज घडणाऱ्या चर्चा संवाद हा या प्रकल्पाचा महत्वाचा घटक होता आणि एकमेकांना प्रोत्साहन देणे, धीर देणे, बळ देणे या गटात अनुभवायला मिळाले आणि एक तिस दिवसांचा सोहळाच आम्ही सगळे या प्रकल्पात जगलो. या प्रकल्पामुळे मला आता असे सहा लेखक माहिती आहेत ज्यांनी तिस दिवसात तिस लेख लिहिलेले आहेत. साहजिकच हे सगळे आपल्या या तिस लेखांचे इबुक स्वरूपात पुस्तक तयार करणार आहेत.
.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने सुचलेल्या काही ओळी…
.
सुरपाखरू सुरपाखरू
क्षितिजे नवी काबिज करू
अविरत अक्षर पाझरू
.
संकल्प हाती घेऊनी
लिहुया मनातिल भावना
सुखदुःख दडलेले लिहू
शब्दांमधे सहवेदना
आनंद जगण्याचा स्मरू
सुरपाखरू सुरपाखरू
.
जगलो जसे त्याचे ठसे
शब्दात कोरुन जायचे
स्वप्नातले जग आपले
रुजण्यास पेरून द्यायचे
साहित्य दिंडी अनुसरू
सुरपाखरू सुरपाखरू
.
तुष्की नागपुरी
.
३० दिवसात ३० हा २०२५ मधला प्रयोग जानेवारीत पूर्णत्वास आला असे असले तरीही सुरपाखरू गटासाठी ही एक नवी सुरवात आहे. येत्या काळात नवीन कल्पना आणि नवे प्रकल्प सुचणार आहेत आणि सुरपाखरे उत्तुंग भरारी घेत राहणार आहेत याचा मला विश्वास आहे.
.
तुषार जोशी
नागपूर, शनिवार १ फेब्रुवारी २०२५
.
नॅनोव्रिमो – नॅशनल नोवेल राईटिंग डे ↩︎