विचारलेच नाही म्हणून माहित नसलेल्या कहाण्या

साने काकूंनी एक महत्वाचा मुद्दा समोर आणला की जेष्ठ नागरीकांना परिस्थितीमुळे, तब्येतीमुळे आणि साधनांच्या अभावाने फार फिरणे होत नाही पण कुणी भेटायला यावं असं वाटत राहतं. आपण त्यांना भेटायला गेलो तर निरोप घेतांना ते आवर्जून पुन्हा कधी भेटणार विचारतात.

याच अनुषंगाने विचार करत असताना मी असे काही शोधत होतो ज्याने

  • माझ्या माहितीतल्या काही जेष्ठ नागरीकांची ही इच्छा पण पूर्ण होईल
  • मला भेटायला आणि बोलायला कारण मिळेल
  • आणि तसे करताना इतक्यातच तर भेटलो पुन्हा काय भेटायचे असा प्रश्नही पडणार नाही.

याच दिशेने विचार करत असताना मला एक मनात राहून गेलेली गोष्ट आठवली, ती अशी की आपल्या आयुष्यात येणारे जेष्ठ नागरिक यांच्याजवळ त्यांच्या त्यांच्या काळात घडलेल्या अनेक गोष्टी असतात कहाण्या असतात ज्या आपल्याला माहित नसतात.
त्याची अनेक कारणे असू शकतात जशी:

  • त्या गोष्टी कधी कुणी त्यांना विचारल्याच नाहीत
  • त्यांना त्या स्वतःहून सांगण्याइतक्या महत्वाच्या वाटल्या नाहीत
  • त्यांना सांगायची कधी संधिच मिळाली नाही
  • त्यांनी आपल्याला त्याचे महत्व नसणार समजून सांगायचे टाळले

एक लेखक म्हणून मला असे वाटते की ही एक संधी आहे त्या गोष्टी समजून घेण्याची. त्यांचे काळात जे काही त्यांनी अनुभवले ते प्रत्यक्ष त्यांच्याच शब्दात समजून घेणे आणि शब्दबद्ध करणे हे त्यांना जमले नसेल कदाचित पण माझ्यासारख्या साहित्यप्रीय व्यक्तीला नक्कीच जमण्यासारखे आहे.

याच विचाराने माझ्या मनात एक प्रकल्प तयार झाला की ठरवून काही लोकांना असे भेटायचे, त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ऐकायच्या त्यांना शब्दबद्ध करायचे. तसे करण्यासाठी अनेक भेटी घ्याव्या लागतील त्या ठराविक काळाच्या अंतराने नियोजित करायच्या. याने भेटण्याचे एक सुंदर कारण मिळेल, आणि अनेक मौलिक घटना ज्या आपल्याला माहित नाहीत त्यांची माहिती घेता येईल आणि शिकायला मिळेल.

अश्या बऱ्याच गोष्टी अगदी आपल्या घरातल्या जेष्ठ नागरिकांजवळ देखील असतील ज्या आपण कधी विचारल्याच नाहीत म्हणून त्यांनी सांगितल्या नाही. त्या सगळ्यांचे जीवनानुभव टिपून ठेवता आले आणि ते नियोजनबद्ध पद्धतीने करता आले तर त्यात मला दुग्धशर्करा योग दिसतोय.

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२५

तुषार जोशी
नागपूर, मंगळवार २१ जानेवारी २०२५