ईंग्रजीमध्ये राईट इन पब्लिक या नावाने आजकाल अनेक लोक लिखाण करतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे जेम्स क्लियर या लेखकाने त्याच्या ब्लाग वर अनेक वर्षे लिहिलेले पोस्ट नंतर संकलित करून ऍटोमिक हॅबिट्स हे पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे.
मराठीत वाचकांच्या साक्षीने क्रमश: मुख्य पुस्तक नव्हे पण त्या पुस्तकाच्या जडण घडणीची माहिती, अनुसंधान करताना आलेले अनुभव आणि गमती जमती क्रमशः जाहिर पोस्ट करण्याचे काम फेसबुकवर एका लेखकांनी केले आणि त्या प्रवासात ते कितेक लेखकांना प्रेरणा देऊन गेले आणि बरेच काही शिकवून गेले.
त्यांनी त्यांच्या कादंबरीच्या संशोधनासाठी आलेले अनुभव आणि कथानक, कथा कादंबरी कशी लिहावी, मराठी आणि इंग्रजी मधले लेखक सुरवात आणि शेवट यांची कोणती शैली वापरतात, असे अनेक रोचक आणि महत्वपूर्ण माहिती त्यांच्या त्या क्रमश: नोंदींमधून मिळत होती.
फेसबुकवर असण्याचे जे काही फायदे आहेत त्यात अश्या नोंदी लिहिल्या जात असताना वाचायला मिळणे ही एक महत्वाची उपलब्धी आहे. सूज्ञ वाचकांना मी कोणाबद्दल बोलतोय हे लक्षात आले असेलच. दुर्दैवाने ते लेखक आता आपल्यात नाहीत आणि त्यांनी सुरू केलेले ते फेसबुक वरचे पान सुद्धा आता रद्द झालेले आहे, त्यांच्या प्रोफाईल वरच जे काही उरलेले पोस्ट आणि नोंदी आहेत त्याच सध्या शोध घेतला तर उपलब्ध आहेत, आणि फेसबुक चा काही भरवसा नाही हे नक्की आहे त्यामुळे त्या नोंदी कधी फेसबुक वरून बेपत्ता होतील काही सांगता येत नाही.
शोध ही कादंबरी लिहून मुरलीधर खैरनार मराठीला एक अफलातून ऐतिहासिक रहस्य कादंबरी देऊन गेले. त्यांनी ही कादंबरी लिहितांना फेसबुकवर shodhnovel या नावाने एक नोंदींचे पान तयार केले होते. त्यात त्यांनी ९३ नोंदी लिहिल्या. त्या नोंदींवर अनेक वाचकांने अभिप्राय, सल्ले, आणि चर्चा घडल्या. त्या चर्चांमधे सहभागी होणे आणि त्या अनुषंगाने विचारांची एक वैठक तयार होणे हा एक अविस्मरणीय सोहळा होता.
सातत्याने एक वर्ष क्रमशः नोंदी लिहून वाचकांना बामधून ठेवणे कसे करायचे याचा मास्टरक्लास म्हणजे त्या शोध नावाच्या नोंदी. त्या नोंदींचाही प्रिंटाऊट त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान ला सुपूर्त केला आहे असे त्यांच्या नोंदीत त्यांनी लिहिले आहे. त्या नोंदीमचे देखील एक पुस्तक व्हावे ही उत्कट इच्छा आहे. हे वाचणाऱ्या कुणाला संबंधित व्यक्तींपर्यंत ही विनंती पोहोचवता आली तर नक्की मला मदत करा.
सध्या मी ज्या नोंदी https://www.facebook.com/search/posts?q=shodhnovel या लिंक मधे उपलब्ध आहेत त्याच्या माझ्याकडे बॅअप करून ठेवतो आहे. पण त्यांच्या अधिकृत ९३ नोंदी असलेले पुस्तक छापले जावे कारण त्यामुळे देखील अनेकांना लिखाणाचे नवे आयाम शिकता येतील. खऱ्या अर्थाने मेटा राइटिंग, कसे लिहावे याबाबतीत लिहिलेले लिखाण असे मराठीटले ते एक उदाहरण तयार होईल.
शोध कादंबरी छापून आली तेव्हा मुरली सरांनी फेसबुक वर झालेल्या त्या निंदींवरच्या चर्चांचा आवर्जून उल्लेख पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेला आहे. ते पुस्तक हातात आले तेव्हा आपलेच नाव सुरवातीला त्यांनी केलेल्या उल्लेखात वाचून खूप आनंद झाला होता.
त्यांच्या एका नोंदीमध्ये ते म्हणतात:
थोडा गंमतीचा आणि आनंदाचा भाग असा की मी हे असं लिहितोय हे पाहून नव्याने लिहिणारे काही लेखक जवळ आले. चॅटबॉक्समध्ये, फोनवर तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांच्या लिखाणातल्या अडचणींवर चर्चा करु लागले. मी काही कुणी अनुभवी लेखक नव्हे, नामवंत तर नव्हेच नव्हे. फार तर लेखनप्रक्रिया या विषयावर मी बरेच वाचले आहे, एवढेच. मी माझ्या परीने त्या सार्यांशी प्रामाणिकपणे बोललो. त्यांना त्याचा काही उपयोग झाला की नाही हे त्यांचे लेखन बाहेर आल्यावरच कळेल.
कितीतरी लेखकांनी त्या नोंदींवरून चर्चांवरून बरेच काही घेतले असेल पण ते सगळे वाचायला मुरली सर आपल्यात नाहीत. ही खरच मोठ्ठी पोकळी ठेवून गेलात मुरली सर.
(मुरलीसरांच्या आठवणीत)
तुषार
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
नागपूर, शनिवार ४ जानेवारी २०२५