माझे स्वानंदी माहेरपण

नुकतीच मी माहेरपणाला जाऊन आले. तुम्ही म्हणाल काय या वयात माहेरपण? अधिकमासात लेक जावयाला घरी बोलवतात आणि मी माझ्या माहेरपणाबद्दल बोलत आहे.
अहो, विषयच तसा आहे. माझं ‘स्वानंदी माहेरपण’.
आमच्या 'स्वानंद महिला मंडळा’च्या अध्यक्षा ‘रंजना लोढा’ (भाभी) यांच्या डोक्यातून भन्नाट कल्पना येत असतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी या कार्यक्रमाचे आमंत्रण आम्हा स्वानंदी सख्यांना दिले होते. या अगोदरही त्यांनी असं माहेरपण केले होते त्यामुळे आम्हीही सगळ्या जणी हा अनुभव घ्यायला उत्सुक असतो. प्रत्येक सखी १० जूनची वाट बघत होती. भाभीही ग्रुपवर नित्य नेमाने माहेरपणाला या असे आवर्जून सांगत होत्या.
माहेर. प्रत्येक सासुरवाशिणेच्या अंतर्मनातला एक हळवा, नाजूक कोपरा. नववधूपासून ते वृद्धावस्थेतील स्त्रीच्या संवेदना जागवणारा. प्रत्येक स्त्री माहेरपणाला आसुसलेली असते.
माहेरपण म्हणजे आई-वडिल, भाऊ-बहीण यांचा सहवास तर असतोच त्याबरोबर ती ज्या घरात लहानाची मोठी झाली त्या घरात राहण्याची पुनःश्च अनुभूती म्हणजे माहेरपण. ‘विवाह’ या संस्कारामुळे ती त्या घरापासून पासून दुरावते. माहेरपण म्हणजे नातेवाईक, शेजार- पाजार, मित्र - मैत्रिणी यांना भेटण्याची सुवर्णसंधी. त्यांच्याबरोबर गप्पा- गोष्टी, हास्य-विनोद, खेळ यांत रंगून निखळ आनंद घेण्याची संधी. माहेरपण म्हणजे आईच्या हातचे मनासारखे खाद्य-पदार्थ मनसोक्त खाण्याची संधी. प्रत्येक घराची खान-पान संस्कृती निराळी असते, त्यामुळे सासरी त्यांच्या पद्धतीने स्वयंपाक-पाणी होते. पण आईकडे आल्यावर तिच्या हातचं आयतं खायला मिळतं. माहेरपणात सासरच्या जबाबदारीतून मोकळीक मिळाल्याने एक स्वच्छंद पाखरू होऊन विहरता येते.
इथे मला ‘ओम शांती ओम’ सिनेमाच्या डायलॉगची आठवण झाली. ‘चुटकीभर सिंदूर की किमत तुम क्या जाने बाबू’ तसे ‘माहेरपणाची किंमत तुम क्या जाने बाबू’ असे म्हणणे वावगे होणार नाही.
माझं सासर व माहेर एकाच गावात असल्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे मला हे सुख भरभरून उपभोगताच आलं नाही याचं वैषम्य आजही वाटते.
नवीन लग्न झालेल्या स्त्रीला माहेरची ओढ नैसर्गिक आहे. मुलंबाळं झाल्यावर त्यांना उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत आजोळची, मामाच्या गावाची ओढ स्वाभाविक आहे. पाहिजे तर याला हवापालट म्हणू या. जो सर्वांनाच आवश्यक असतो.
आता वाढत्या वयानुसार आपण आपल्या घराला, घरातील व्यक्तींना प्राधान्य देतो. तिकडे माहेरी आई वडीलही वृद्ध झालेले असतात. आता त्यांचीच काळजी घ्यायची असते. त्यामुळे आता माहेरी गेलो तरीही ती अनुभूती मिळत नाही.
अशा पार्श्वभूमीवर कोणीतरी आपल्याला इतक्या प्रेमाने माहेरपणाला बोलावले तर निश्चितच आनंद होतो. म्हणूनच स्वानंदकडून होणाऱ्या माहेरपणाला आम्ही सर्वजणी आसुसलो होतो.
आणि तो दिवस उजाडला. सकाळी ७ वाजताच अगदी घराजवळच घ्यायला गाडी आली. सगळ्या जणी ठरलेल्या वेळेपूर्वीच हजर असल्यामुळे गाडी चटकन पुणे सातारा रस्त्यावरील भोरच्या दिशेने धावली. नवकार मंत्र, आरत्या, स्तोत्रे म्हणत सकाळची छान सुरुवात झाली. खाण्याचे लाड पुरवायला साधना होतीच. तासाभरातच रिव्हरवुड रिसॉर्टमध्ये आमच्या गाड्या येऊन थांबल्या. पुण्यातल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच गाड्यांमधून अठ्ठ्याण्णव सासुरवाशिणी माहेरपणाला आल्या होत्या. रंजना भाभी आईच्या मायेने आमची वाट बघत उभ्या होत्या. आलेली प्रत्येक सखी त्यांची गळाभेट घेत होती. त्यांच्याबरोबर उभ्या असलेल्या संगीता, अनिता म्हणजे जणू त्यांच्या सावल्याच. दारात औक्षण झाले तेव्हा दाराशी पाण्याचा तांब्या ओवाळून औक्षण करणारी माय- माऊली आठवली. फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करणाऱ्यांमध्ये नजरेनेच स्वागत करणारे वडील व भावांची आठवण झाली. माहेरच्या घरात आल्यावर आपण सर्वप्रथम संपूर्ण घरात चक्कर मारतो त्याप्रमाणेच आजूबाजूला एक चक्कर टाकून सगळा परिसर नजरेत भरून घेतला. भोजनकक्षात गेल्यावर गरमागरम नाश्त्याचे ताट समोर आले. ज्यामध्ये माझा आवडता इडली सांबार, पोहे, खाकरा, ब्रेड लोणी पोटात जाण्यासाठी अधीर झाले होते. यथेच्छ ताव मारून तिथले खेळ खेळण्यासाठी धाव घेतली. बालपणी चालवलेली सायकल इथे तारेवर उभी होती. काहींनी धिटाईने त्यावर बसून चक्कर मारली.‌ मनसोक्त झोके खेळलो. घसरगुंडीवर घसरण्याचा आनंद घेतला. तेवढ्यात जांभळांनी लगडलेले झाड दृष्टीपथात आले. मग काय विचारतात आमच्या स्वानंद सख्यांची वानरसेना तिकडे धावली. कोणी फांद्या हलवू लागले, कोणी दगडं मारत होते. उरलेल्या सख्या खाली पडलेली जांभळं वेचून खाण्यात मग्न झाल्या. आंब्याच्या झाडावर झुलणाऱ्या कैऱ्या हाताशी नव्हत्या म्हणून नुसतेच नजरसुख घेतले. परंतु तिथल्या घरगड्यांनी आमच्यासाठी जांभळं व कैऱ्या कालच तोडून ठेवल्याचे सांगितले.
थोड्या अंतरावर फोटोसाठी काही पॉइंट्स होते. तिथे जाऊन एकमेकींचे फोटो काढण्यात सगळ्याजणी व्यग्र झाल्या. कोणी गॉगल लावून, तर कोणी डोक्यावर कॅप घालून, वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढून घेत होत्या. तेव्हा प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा बाल आनंद, अल्लड भाव, अवखळपणा ओसंडून वाहत होता. भाभींबरोबर फोटो काढून घेण्यात अहमहमिका लागली होती. अतिउत्साही सख्या रील्स बनविण्यात मग्न होत्या. ते बघून उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र येऊन मजा करणाऱ्या आते, चुलत सर्व भावंडांची आठवण झाली. आमच्या लहानपणी आम्हा लहान भावंडांची नजर चुकवून आमच्या मोठ्या बहिणी सिनेमा बघायला किंवा कुठेतरी फिरायला जायच्या. अगदी तसंच मी व साधना आम्ही दोघींनी तिथल्या नदीकाठाकडे जाणाऱ्या एकांत वाटेने जायचे ठरवले. तेव्हा नदीच्या पात्रातल्या टिटवीने आमचे स्वागत केले. खडकावर बसलेला पाणकावळा आमची चाहूल लागताच पसार झाला. पाण्यात पोहोणाऱ्या ‘हळदी कुंकू’ बदकांची जोडी नजरेआड गेली. मात्र काठावरच्या झुडुपांवर सुगरण, मुनिया, वेडा राघू मनसोक्त हुंदडत होते. परतीच्या वाटेवर नाचणची जोडी प्रणयात मश्गूल दिसली तर उंच शेंड्यावरचा सुभग शिटी मारून लक्ष वेधून घेत होता.
तेवढ्यात स्विमिंग पूलवरच्या स्पिकरवर भन्नाट गाण्यांच्या सुरांनी पाण्यात उतरण्याचे आमंत्रण दिले. बऱ्याच जणी अगोदरच तिथे पोहोचल्या होत्या. एक दोन जणी पोहत होत्या तर काही जणी नुसताच दंगा करत होत्या. काहींना आपल्या गावाकडच्या विहिरीत, नदीच्या पाण्यात कसे पोहायला शिकलो त्याची आठवण झाली.
ओले कपडे बदलून एका प्रशस्त हॉलमध्ये जमा झालो. तिथे सागरगोट्या व कॅरम वाट बघत होते. ते पाहून बालपणी मैत्रिणींसोबत केलेली हुल्लडबाजी आठवली.
आता पोटात कावळे ओरडू लागले होते. पुन्हा पावले भोजन कक्षाकडे वळली. माहेरवाशिणीचा मुख्य पाहुणचार वाट बघत होता. गरम गरम पुरणाची पोळी, आंब्याचा रस, चटकदार भज्या, तळलेले कुरडाया पापड आईच्या हातच्या स्वयंपाकाची आठवण करून देत होते. जेवतानाची माझी तृप्त, प्रसन्न मुद्रा भाभींनी मोबाईल मध्ये कैद केली.
गोडाचे जेवण करून वातानुकूलित हॉलमध्ये बसल्यावर डोळ्यांवर पेंग तर येणारच. परंतु नव्या सख्यांचे मनोगत, त्यांची गाणी ऐकून मन प्रसन्न झाले. माहेर म्हटले म्हणजे मेहंदी काढायलाच हवी. त्याचे आधुनिक रूप म्हणजे टॅटू. कोणी हातावर तर कोणी चेहऱ्यावर निरनिराळ्या आकाराचे टॅटू काढून घेतले. त्यानंतर वेळ आली झुंबा डान्सची. सगळ्या माहेरवाशिणींचा उत्साह काय वर्णावा! वय, व्याधी विसरून सगळ्याजणी सूर-तालावर थिरकत होत्या. जणू षोडशाच.
दिवसभरच्या मौज मस्ती नंतर आता माहेरचा निरोप घेण्याची वेळ आली. माहेरपणाची सांगता. हा प्रसंग हृद्य असला तरी तो रोचक होता. अधिक मासात माहेरवाशिणीची ओटी भरण्याचा. दोन-दोन जणींना खुर्चीवर मानाने बसवून तिच्या गळ्यात मोत्यांची माळ घातली. डोक्यावर पगडी व अंगावर भरजरी शेला घातला. पैठणीच्या कापडाच्या पिशवीत तांब्याचा कलश, ओटी, काचेच्या बांगड्या तर होत्याच पण त्यात भाभींनी सगळ्यांना वैशिष्ट्यपूर्ण भेटकार्ड दिले. आणि हो, माहेरवाशिणीला खाऊ तर द्यायलाच हवा. तो सोपस्कारही चितळेंची बाकरवडी देऊन पार पडला. ‘पुढच्या अधिकमासात रात्रभर माहेरपणाला या’, असे सांगून भाभींनी सद्गगदित होऊन निरोप दिला. एक सकारात्मक उर्जा सोबत घेऊन आम्ही घरात सातच्या आत प्रवेश केला.
माझा माहेरपणाचा अनुभव तसा जेमतेमच. परंतु एक दोन वेळा उन्हाळ्याच्या सुटीत मोठ्या बहिणीकडे म्हणजे कल्पनाताई कडे जाण्याचा प्रसंग पडला. तेव्हाचा आनंद माहेरपणाला साजेसा होता असे म्हणायला हरकत नाही. आईसारखेच ताईने पुरवलेले जिभेचे चोचले, मेव्हण्यांनी मोठ्या प्रेमाने आणलेला खाऊ, माझ्या इतकाच मुलींच्या स्मरणात आहे. त्याबरोबर शेतातली मौजमजा, गावातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी, गौताळा अभयारण्यातील पाटणादेवीचे दर्शन सर्वच कायम स्मरणात राहील असेच आहे. आता तर जो तो ज्याच्या त्याच्या व्यापात व्यग्र असल्यामुळे या माहेरपणाला वर्षे लोटली.
अजून एका माहेरपणाचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. तो म्हणजे आमच्या भिशी ग्रुपच्या विमला लिमयेकडचा. पानशेत परिसरात विमलाचे ‘गुलमोहर रिसॉर्ट’ आहे. तिथे दरवर्षी भिशीच्या निमित्ताने आम्ही रात्रभर मुक्कामाला जातो. किती मजा असते आमची काय सांगू! कुक असला तरी स्वतः विमला स्वयंपाक घरात जाऊन आमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करत असते. विशेषतः केरळी पदार्थांची मागणी तर करतोच. दुपारचे जेवण, संध्याकाळचा हाय टी, रात्रीचे जेवण व दुसऱ्या दिवसाचा नाश्ता करूनच आम्ही तिचा निरोप घेतो. आख्खी रात्र पत्ते, डम्ब शेरस, अंताक्षरी असे विविध खेळ खेळण्यात जागवतो. एकमेकींचे सुख-दुःख एकमेकींना सांगून मन हलके करतो व उर्जित मनाने घरी पोहोचतो.
असे हे माझे विविधरंगी माहेरपण. आवडले ना तुम्हाला? विविध रूपात मला लाभले तसेच सर्व वाचक स्त्रियांना लाभो ही सदिच्छा व्यक्त करते.

वंदना लोखंडे
१४/०६/२०२६