अर्ध्या वाटेवर : अरुणा ढेरे

एका कार्यक्रमात भेट मिळालेलं पुस्तक. घरी आल्यावर रंगीत कागदाच्या वेष्टनातून बाहेर काढलं आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर हास्य तरळलं. आतापर्यंत मी न वाचलेल्या लेखिकेचं, यवतमाळच्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडले त्यांचं हे पुस्तक, ‘अर्ध्या वाटेवर’. हो, बरोबर ओळखलं. त्याच त्या ‘अरुणा ढेरे’.
प्रथमतः मुखपृष्ठावर चितारलेली नवी पालवी मनाला सुखावून गेली. परंतु ‘अर्ध्या वाटेवर’चा अर्थबोध काही होईना. तो पुस्तकात अगदी शेवटी झाला आहे.
32 ललित लेखांचा हा संग्रह. काय नाही त्यात? शाळा, ग्रंथालय, मंदिर, पुस्तक, शिल्प, व्यक्तिचित्र या सर्वांचे अनोखे मिश्रण.
या लेखिकेचं बोट धरून, त्यांच्या नजरेतून युरोपातील मंदिरं पाहताना तिथल्या जनआंदोलनाची माहिती मिळते. लंडनमधील शारदेचे मंदिर (ग्रंथालय) पाहताना ह्या वाचनप्रिय लेखिकेच्या अचाट हुशारीचे कौतुक वाटले. ‘र. धो. कर्वे’, ‘शांता शेळके’ यांसारख्या आदरणीय व्यक्ती डोळ्यासमोर जिवंत झाल्या. ‘शाकुंतल’, ‘गाथासप्तशती’ यांसारख्या प्राचीन साहित्याची तोंडओळख झाली. ’ ऍगाथा ख्रिस्ती’, ‘हॅर्टा’ यांच्यासारखी विदेशी चरित्रे समोर आली. पुराणातल्या सीतेची, रुसलेल्या रुक्मिणीची, विठ्ठल भक्त कान्होपात्राची शोकांतिकाही समजली. दगडी भिंतीच्या मागे राजकीय कैदी असताना तिथल्या स्त्रियांच्या मुखवट्या मागील चेहऱ्यांचे दर्शनही त्यांनी घडवले. त्यांच्या नजरेतून पाहिलेली ‘शिल्पांकित सृष्टी’ अवाक करणारी आहे. विशेष वेड लागले ते ‘जीवन मृत्यूचा दोलोत्सव’ पाहताना. होळीच्या सणाचा संबंध कुठेतरी सुफलनाशी आहे, असं त्या सणाच्या विधीविधानातून त्यांनी दाखवून दिले. नव्यानेच पाहत असलेल्या होळीच्या रूपाने मी अक्षरशः भारावले. आसाम, अरुणाचलच्या वाटेवरून फिरतांना ब्रह्मपुत्रा, पाताळगंगा या नद्यांचं विराट दर्शन झालं. श्रीशैलची महती कळली.
जसं जसं वाचत गेली तसं तसं त्या शब्दांचे गारूड मनावर पडत गेले आणि उत्तरोत्तर त्यात मी गुंतत गेली, रंगत गेली.
त्यांच्या भाषेची नजाकत, भावनांची गुंतवणूक, विषयाचं समग्र ज्ञान अचंबित करणारं आहे. त्यातून घडलेले सात्विकतेचे दर्शन मनाला सुखावत होते.
‘पंचेंद्रियांच्या संवेदना जाग्या ठेवून अनुभव घेण्यासाठी लागणारी अलिप्त तल्लीनता त्यांच्याजवळ आहे. सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि बहरती रसिकता आहे. भावना आणि विचार यांचा औचित्यपूर्ण मेळ सहज साधण्याची कला अवगत आहे. परिसर, माणसे, पुस्तके आणि संस्कृती यांचे चैतन्यपूर्ण दर्शन घडवणारे हे ललित लेखन दर्जेदार आहे.’ मलपृष्ठावरील ह्या ओळी किती सार्थ आहेत याचा वाचून प्रत्यय आला.
एखाद्या गोष्टीकडे कसं बघावं, कसं लिहावं आणि काय लिहावं याचा आदर्शपाठ म्हणजे हे पुस्तक.
हे पुस्तक वाचून झाल्यावर मी एका वेगळ्याच भावविश्वात तरंगत होते. तीच अनुभूती पुन्हा पुन्हा घ्यावी असा मी मनोमनी निश्चय केला.
मी जे वाचलं ते तुमच्यापर्यंत अचूक शब्दात पोहोचवण्यात कितपत यशस्वी झाले हे मला माहीत नाही, म्हणून तुम्ही हे पुस्तक वाचून त्याची अनुभूती घ्याच.

वंदना लोखंडे
३१/०५/२०२६


1 Like