सकाळी साखर झोपेतून जाग येताच नकळत हात शेजारच्या बटनावर जातो. घड्याळात पाहते, पहाटेचे चार वाजलेले असतात. कोणताही अलार्म न लावता शरीर व मन दोन्ही जागे होते. तेवढ्यात शरीर बांग देते, प्रात:र्विधीची वेळ झाली. डोळे मिटलेल्या अवस्थेतच ते कार्य पार पडते. डाव्या हाताने टुथब्रश उचलून उजव्या हाताने त्यावर टुथपेस्ट घेते व मुखमार्जन आटोपते. बेडवर विसावताच, मोबाईल हातात घेते. व्हाट्सअपचे मेसेजेस स्क्रोल करते. लोकांचे स्टेटस शून्यात नजर लावून एकापाठोपाठ ते सरकताना बघते. यात वेळ घालवायचा नाही, शहाणे मन वॉर्निंग देते. रिमोट उचलून एसी बंद करते. खिडकीचा पडदा वर उचलते. खिडकी उघडते. बाहेर चांगलेच अंधारलेले असते. उशीजवळचे पुस्तक उचलून बुकमार्क ठेवलेले पेज उघडते. वाचायला सुरुवात करते. मोबाईलवर टिपण काढते. लेख लिहायला घेते.
चहा करू या. पण नको. व्यायाम करायचा आहे. सव्वा सहा वाजले. योगा मॅट पसरवते. सौरभ सांगेल तसा व्यायाम करते. सव्वा सात झाले. मुख्य दरवाजा उघडून दुधाची पिशवी आत आणते. एका पातेल्यात थोडे पाणी घेऊन दूध ओतते व पातेले गॅसवर ठेवते. ‘चला, उठा’ म्हणून घरातल्या मंडळींना आवाज देते. दुसऱ्या शेगडीवर चहाला आधण ठेवते. कपात चहा गाळते. बिनसाखरेचा चहा गळ्याखाली कसातरी रिचवते. आंघोळीला जायचं म्हटलं तर बाथरूमला आतून कडी असते. तेव्हा मुख्य बेडरुमधील पांघरुणांची घडी घालून ट्रॉलीत ठेवते. बेडवरच्या उशांची मांडणी, आदल्या दिवसाचा ड्रेसिंग टेबलवरचा पसारा, साईड टेबलवरचा पुस्तकांचा पसारा सगळं जागच्या जागी ठेवते.
स्वयंपाकघरात येताच मुकाट्याने भांडी लावायला घेते. आता नाश्त्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ करायला हवा. सर्वांना नाश्ता देऊन स्वतःची प्लेट घाईघाईने रिकामी करते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. कचरावालीला ओला व सुका कचरा देते.
पाच मिनिटात आंघोळ आटोपून देवपूजेला बसते. रामरक्षा, द्वादश ज्योतिर्लिंग, गायत्री मंत्र, गीतेची प्रार्थना म्हणता म्हणता देवपूजा पूर्ण करते. तुळशीला पाणी घालते.
आता वेळ पेपर वाचण्याची. पहिल्या पानापासून शेवटच्या पानावरील हेडलाईन्स वाचून पेपर घडी करून ठेवते. हॉलमध्ये सोफ्यावर, टिपॉयवर भरपूर पसारा बघते. शांततेने जागच्या जागी ठेवते. छोट्याशा बादलीत पाणी घेऊन सगळे फर्निचर पुसून लख्ख करते. उंबरठ्यावर, दारापाशी रांगोळी काढते.
तेवढ्यात फोन खणाणतो. पळत पळत भाजीवाल्याचा फोन घेते. खिडकीतून पिशवी खाली फेकते व तेथे बसून कोणत्या भाज्या हव्या ते सांगते. डोअरबेल वाजताच भाजीची पिशवी घेते, पैसे देते. लगोलग भाज्या स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवते.
भाजी घेण्यासाठी बेडरुम १ च्या खिडकीत बसलेली असते तेव्हा तिथला पसारा नजरेत भरतो. कॅमेरा , दुर्बीण, लॅपटॉप, बासरी, पुस्तकं, बॅगा वगैरे वगैरे. ते जागच्या जागी ठेवते. एखादे ड्रॉवर, कपाटाचा खण वेळच्या वेळी आवरून घेते.
एव्हाना साडेबारा होतात. दुपारी दीड वाजता जेवायला येणार म्हणून स्वयंपाक करायला सुरुवात करते. बरोबर दीड वाजता डायनिंग टेबल स्वच्छ पुसून ताटं लावते. जेवण आटोपताच काढ-घाल करून किचन ओटा, गॅस, सिंक, डायनिंग टेबल सगळं लख्ख करते.
कामवाली बाई येणार नाही हे कळताच भांडी विसळून डिश वॉशरला लावते. व्हॅक्यूम क्लीनर हातात घेऊन सगळ्या खोल्या चकाचक करते. कपड्यांची बादली घेऊन टेरेसवर जाते. वॉशिंग मशिनला कपडे लावते. झाडांना पाणी घालते. कुंडीतील गवत काढते. झाडांना खत घालते. पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवते. त्या अगोदर ती मातीची भांडी स्वच्छ करते. स्टॅंडवरच्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालते. ऑफिसमधील धूळ खात पडलेल्या वस्तूंची दखल घेऊन पुनर्मांडणी करते. नको असलेल्या वस्तूंना कचरा पेटी दाखवते.
स्वतःसोबत कामवालीचा चहा ठेवते. खिडकीतून पक्ष्यांची लगबग न्याहाळते. शक्य असेल तेव्हा किचन ओट्यावर बसून भराभरा पक्ष्यांचे फोटो क्लिक करते. त्यांचा पाठलाग करत बेडरुम २ मध्ये पोहोचते.
बेडशीट, पिलो कव्हर बदलायला घेते.
इस्त्रीच्या कपड्यांची चळत बघून लॉंड्रीवाल्याला फोन करते. लगोलग मेंटेनन्स साठीचे फोन, किराणा मालाची यादी देण्यासाठी, नातलगांची चौकशी करण्यासाठीचे २-३ फोन करते. या मधल्या वेळात सतत येणारे फोन घेते, डोअर बेल वाजली की दार उघडते.
महिन्यातून १-२ वेळा कधी लायब्ररीत जाते तर कधी साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहते. कार्यक्रम आटोपला की वेळ न दवडता घरी धावत येते.
आता संध्याकाळ झाली. दिवेलागणीची वेळ झाली. देवांजवळ, तुळशीजवळ दिवा लावते. रात्रीच्या जेवणाची तयारी करते. सर्वांचे जेवण झाल्यावर पुन्हा किचन स्वच्छ करून दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यासाठीची पूर्वतयारी करते.
रात्री ११ वाजता या रोबोटची बॅटरी डाउन झालेली असते. त्यास चार्जिंग करण्यासाठी बेडवर पहुडते. पाच तास चार्जिंग झाल्यावर पुन्हा हा रोबोट न कुरकुरता दुसऱ्या दिवसाची कामं करावयास सुसज्ज असतो.
(सर्व स्त्रियांना समर्पित)
वंदना लोखंडे
२४/०५/२०२६
