वैशाख वणवा : सुखद अनुभुती

चहू बाजूला वणवा पेटलेला. हो वणवाच. वैशाख वणवा. जीवाची काहिली होत आहे. उन्हाचा पारा पार 41 डिग्रीच्या सीमारेषा ओलांडून मजेत उंडारत आहे. सकाळी सकाळी सुध्दा मी मी करत तो हवेत कोंदटपणा आणत आहे. स्वयंपाकघरात वावरणं मुश्कील होत आहे. संपूर्ण शरीर घर्मधारांनी चिंब भिजत आहे. अशावेळी हॉलमधील कुलरच्या पुढ्यात सपशेल नांगी टाकून स्वस्थ बसण्याशिवाय पर्याय नाही. कातरवेळ झाली की वेगळीच समस्या पुढ्यात उभी असते, नव्हे जमिनीवर सरपटत असते. न बोलवता आलेल्या, त्या येऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त केला असला तरी या रणरागिणी ‘पालुताई’ आपल्या घरात प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाल्याचे बघून मनावर भयंकर आघात झालेला आहे. त्यांना पकडण्यासाठी वॉचमनला हाक मारावी तर तो सोसायटीच्या आवारातून गुल झालेला. भयंकर तणावाखाली आपली ऊठबस चालू असते. अशातच लक्षात येते की आपल्या ‘पालुताई’ बाळंत झाल्या आहेत. त्यांची वाह्यात पिल्लावळ घरभर हैदोस घालत आहेत. Hit (black spray), कुंचा व सुपली ही स्वसंरक्षणासाठीची आयुधे वापरून एकीचा खिडकीतून कडेलोट करत नाही तोच दुसरे पिलू आपल्याला खिजवत पडद्यावर, भिंतीवर, जमिनीवर लपंडाव खेळत आहे. झोपताना आपल्या उशाशी काही नाही ना याची खातरजमा करून निद्राधीन होण्याच्या प्रयत्नात दिवस उगवतो. सकाळी उठल्यावर ‘फूंक फूंक पर कदम रखनेका’ हे भान ठेवून आपली दिनचर्या चालत आहे.
इतक्या दाहक, तणावयुक्त वातावरणात सकाळी दहा वाजता उत्तराभिमुख असलेल्या खिडकीत मी मोठी जोखीम घेऊन बसलेली आहे. का कोण जाणे पण आज हवेत कालपेक्षा थोडा गारवा जाणवत आहे. ही किमया म्हणावी का? असली तर कसली? समोरच्या हिरवाईची की पक्ष्यांची, की मी ज्या खिडकीत बसली आहे त्या खिडकीची?
समोर चतु:श्रुंगीच्या टेकडीचा शेवटचा कोपरा डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याचं अस्तित्व झाकून टाकण्याच्या विचारात असलेल्या चिंचेच्या झाडाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. एकेकाळी आपले अजस्त्र बाहू पसरून साऱ्या दुनियेला कवेत घेणाऱ्या या वृक्षाची काही कारणास्तव कत्तल झाली होती. परंतु हिरवट सुवर्णकांती चिंचाचं लेणं अंगावर मिरवत तो आजही दिमाखात उभा आहे. त्याच्या लाल-पिवळ्या फुलांचा तारुण्याचा बहर गळून पडल्याने जमिनीशी दोस्ती केली आहे. त्याच्या गळून पडण्यात ही एक सौंदर्य आहे. रस्त्यावर लालसर गुलाबी जाजम अंथरून तो तारुण्याने मुसमुसलेल्या चिंचाचे ओझे अंगा-खांद्यावर एखाद्या झुंबरासारखे घेऊन उभा आहे. तशातच उंच आकाशात तीन-चार घारी डौलाने विहरत आहेत. जणू तीन चार शाहजाद्या एखाद्या उद्यानात सैर करतात, तशी मिजास त्यांच्या विहरण्यात दिसत आहे. मधूनच त्यांच्याशी स्पर्धा करावयास धजलेल्या तीन-चार नाजूक साजूक 'पाकोळ्यां’चे साहस बघून स्तिमित व्हायला होते. नजरेनेच कौतुकाने त्यांना शाबासकी देते.
तेवढ्यात बांबूच्या गर्द राईतून ‘राखी वटवट्याची’ वटवट लक्ष वेधून घेत आहे. वरून करडा व बदामी पोटाचा हा वटवट्या सुर्रकन चिंचेच्या कुशीत दिसेनासा झाला तेव्हा हिरवेगार चाफ्याचे झाड नजरेत भरले. या ठेंगण्या ठुसक्या झाडाच्या मोठ्या मोठ्या गर्द हिरव्या पानांवरच्या ठळक समांतर रेषा दुरूनही नजरेत भरत आहेत. त्याचबरोबर त्याच्या असंख्य करकमलात असलेले पाच पाकळ्यांच्या फुलांचे सुवासिक गुच्छ भर उन्हात डोळ्यांना थंडावा देत आहेत. त्याचबरोबर उष्ण-शीतल वाऱ्यावर वाहत येणारा त्याचा मंद सुगंध सोनेरी उन्हात मन प्रफुल्लित करत आहे. तिथेच काळा पांढरा ‘दयाळ’ आपल्या मधुर आवाजात तानांची सुरेल आवर्तनं घेताना दिसत आहे. आपले घरकुल शाकारण्यासाठी मादीच्या शोधात, तिला आकृष्ट करण्यासाठीची त्याची ही लकब चांगलीच परिचित आहे. लवकर त्याचा हा शोध तपास थांबून त्याला साजेसी सहचारिणी मिळावी हा विचार मनात तरळला. वरच्या विजेच्या तारेवर अचानक ‘नारद बुलबुल’ येऊन बसला. गालावर लालचुटुक व पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांचा साज लेऊन मिरणाऱ्या या पक्ष्याच्या चोचीत इवलेसे फळ दिसले. टणटणीची असावे का? परंतु गेटजवळ असलेली ‘टणटणी’ अद्याप बहरासाठी आसुसलेली आहे. मधूनच पांढऱ्या शुभ्र पंखांच्या फुलपाखराची या झाडावरून त्या झाडावर लगबग चाललेली आहे. तेवढ्यात समोरच्या आंब्याच्या झाडावर पलीकडच्या सोसायटीतील गुलमोहोराने लाल- गर्द केशरी छत्र धरलेले दिसले. हिरव्याकंच आम्रवृक्षाने जणू प्रवाळ मुकूट परिधान केल्याचा भास होत आहे. त्याच सोसायटीच्या सोलर पॅनलवर मैनेची जोडी आपला केशसंभार उडवत तरातरा चालत आहे. दोन-तीन कावळे उचलेगिरी करत इकडे तिकडे टारगट पोरांसारखे फिरत आहेत. दूरवर ऐकू येणारी 'सुभग’ची शीळ ऐकून मन आनंदाने थुईथुई नाचत आहे.
तेव्हा मनाची खात्री पटली हा वैशाख वणवा वाटतो तितका वाईट नाही. त्याच्या असण्याने जीवाची काहिली होत असली तरीही त्याच्यावर त्यानेच रामबाण उपायही दिला आहे. उघड्या डोळ्यांनी सभोवताली नजर टाकली तर निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी बहरलेली झाडे, फळांनी लगडलेले वृक्ष व सोबतीला विणीच्या काळातील पक्ष्यांचे कूजन मनाला शीतलता प्रदान करत आहे.
आजच वैशाख संपून अधिक ज्येष्ठ मासाची चाहूल लागली. तो आता काय कमाल दाखवतो त्याची उत्कंठा लागली आहे.

वंदना लोखंडे
१७/०५/२०२६

1 Like