पुढच्या पिढीसाठी आपण समस्या निर्माण करत आहोत का?

आपल्याला मागच्या पिढीने व आपल्या मुलांना त्यांच्या मागच्या पिढीने काय दिले याचा विचार केला तर निश्चितच आपले पारडे जड आहे.

आपल्या पीढीला एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सुरक्षित बाल्यजीवन लाभले. हसत- खेळत शिस्तबद्ध शालेय शिक्षण मिळाले. वडिलोपार्जित चालत आलेली शेती किंवा व्यवसाय यावर चालणारा चरितार्थ होता. नोकरी असली तरी त्यात स्थैर्य होते.

आजी-आजोबांकडून लहानपणी झालेल्या अध्यात्मिक संस्कारांचे सिंचन, त्यामुळे निकोप मानसिक स्वास्थ्य लाभले.

परंतु आताच्या पिढीच्या नशिबात हे सुख वर्ज्यच दिसते. विभक्त कुटुंब पद्धती, त्यात आई-बाबा दोघं नोकरी करत असल्यामुळे पाळणा घरातील व्यावसायिक दृष्ट्या होणारे संगोपन व त्यातून येणारी असुरक्षितता भयावह आहे. आकलनापेक्षा गुणाधिक्याकडे कललेली शिक्षण पद्धती तर आहेच शिवाय जीवघेण्या स्पर्धेमुळे जीवनातून निखळ आनंद देणारा खेळच हरवला. या सगळ्याचा असह्य ताणतणावला तोंड देताना ही पिढी व्यसनाधीन झाली.

आपण अनुसरलेल्या जीवन पद्धतीमुळे पुढच्या पिढीला काय समस्या निर्माण होत आहेत किंवा होणार आहेत याचा थोडा आढावा घेऊ या.

१) कुटुंबामुळे शारीरिक, मानसिक व आर्थिक या तिन्ही अंगाने कसा परिणाम होतो ते बघू या. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी अन्नाची गरज मुख्यत्वे कुटुंबाकडून पुरविली जाते. आर्थिक संपन्नता लाभल्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा कल वाढला. नोकरदार स्त्रिया वेळेअभावी हा पर्याय जास्त आपलासा करू लागल्या. लहानपणापासून जंक फूड खाल्ल्यामुळे कमी वयातच लठ्ठपणा (obesity) ला आमंत्रण दिले गेले. तर कोणी बांधेसूद राहण्यासाठी diet च्या आहारी गेले.

आज मुलांना देण्यासाठी पालकांजवळ पैसा आहे पण वेळ नाही. तशात फक्त ‘एकच मूल पुरे’ ही संकल्पना आपलीशी केल्यामुळे काही मुले स्वकेंद्रित तर काही overconfident झालीत. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वास बाधक ठरत आहे.

आपल्याला मिळाले नाही ते मुलांना देण्यासाठी पालक झटत आहेत. मुलांना मागता क्षणी, प्रसंगी त्या अगोदरच सर्व काही मिळते, यामुळे या पिढीला पैशाची किंमतच राहिली नाही. पालकांकडून घेण्याचा अधिकार आहे ही भावना बळावत चालली आहे, परंतु त्यांच्या प्रती आपले काही कर्तव्य आहे याची जाणीव नाही. अर्थात सरसकट सगळीच पीढी तशी आहे असे अजिबात नाही, हे ही नमूद करते.

२) समाजाकडून या पीढीला काय मिळाले तर सर्वांत मोठा ठेवा 'प्रदूषणा’चा आहे. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनिप्रदूषण यांखेरीज प्रदूषित अन्न, प्रदूषित माती सर्वच प्रदूषित. बिचाऱ्यांना श्वास घेण्यासाठी आपण निकोप हवा सुद्धा ठेवली नाही.

प्लास्टिकचा भस्मासूर. प्रत्येक गोष्ट आकर्षक वेष्टणात विकली जाते. अगदी रोजच्या आहारातील भाज्या सुद्धा. स्वच्छ, संसर्ग विरहित (hygiene) देण्याच्या स्पर्धेपायी लग्न समारंभात, हॉटेलमध्ये प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी दिले जाते. अगदी काटेचमचे, स्ट्रॉ सुदधा कागदी वेष्टणात पुरवले जात आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा यक्ष प्रश्न आहे. वर्षानुवर्षे प्लास्टिकचे न होणारे विघटन हा मोठा शाप आहे. विकासाच्या अंतर्गत येणारे कारखाने, त्यातून बाहेर पडणारे रासायनिक पदार्थ सर्रास नदीत सोडले जात आहेत. परिणामी माणसाइतकेच जलचरही धोक्यात आले आहेत.

फॅशनच्या नावाखाली अनावश्यक कपड्यांचं उत्पादन, लोकांना निरनिराळ्या चवीचे खाद्यपदार्थ पुरवणारी व्यवसायिक यंत्रणा, Use & throw ची संस्कृती यांतून काय प्रदूषण करत आहे याची आपण सर्वसामान्य माणसाला कल्पना सुद्धा नसते. Circular economy चा अभाव दिसत आहे. एखादी वस्तू दुरुस्त करून तिचा वापर होताना दिसत नाही. एखाद्याने त्याचा वापर करायचे ठरवले तर दुरुस्त करणारे मनुष्यबळ उपलब्ध नाही, ही एक मोठी समस्या आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन हा सुद्धा मोठा ताप आहे. या कारखान्यांमध्ये निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा शांत करण्यासाठी जी cooling ची यंत्रणा असते, त्यात पाण्याचा प्रचंड वापर होतो. एकीकडे अशी उधळपट्टी तर दुसरीकडे लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. मध्यंतरी बेंगलोर शहरातील पाणीप्रश्न चव्हाट्यावर आला होता.

खरं तर सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी प्रयत्न होऊ शकतो. कुठे कुठे थोड्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. बऱ्याचदा परदेशवारी करून मंत्री लोक तेथील यंत्रणा इथे राबवू पाहतात. परंतु परदेशातील सांडपाणी आपल्या पाण्यापेक्षा खूप स्वच्छ असते. परिणामी त्या यंत्रणा इथे कुचकामी ठरतात. आपल्या देशातही या बाबतीत संशोधन चालू आहे. कमी पैशात परिणामी योजना उपलब्ध आहेत, परंतु त्यांना संधी दिली जात नाही. भ्रष्टाचाराची कीड तरुणाईच्या ज्ञानाचा वापर करून घेण्यात अनुत्साही असते. त्यामुळे बऱ्याचदा निराश होऊन बुद्धिमान तरुणाई परदेशाचा रस्ता धरते.

आपल्या पिढीने स्त्रियांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मुलगा- मुलगी समान ही उत्तम विचारधारा अमलात आणली. मुलांबरोबर मुलीही उच्च शिक्षण घेत आहेत. सर्व क्षेत्रात मुली किंबहुना मुलांपेक्षा जास्त पुढे जात आहेत. त्याचा परिणाम कळत नकळत विवाह संस्थेवर होताना दिसत आहे. मुलींना योग्य असा वर मिळण्यात अडचणी उभ्या राहत आहेत. लग्न झाले तरी ते निभावण्यात अडचणी येत आहेत. करियर घडविताना मुलांचा अडसर नको म्हणून मूल नकोच ही चुकीची विचारधारा तरुणाई करताना दिसते.

Live in relationship, DINK (Double Income No Kids) हा वर्ग वाढत चालला आहे. सुशिक्षित, बुद्धिमान लोकांनी मूल जन्माला घातले नाही तर उद्या अशिक्षितांची संख्या वाढणार हे कोणाच्या लक्षातही येत नाही. ‘मुलगी नको, वंशाला दिवा हवा’ या लालसेपोटी मुलींचे प्रमाण घटत आहे. परिणामी मुलांना बायको मिळणे कठीण झाले आहे.

३) तसेच राजकारण्यांच्या बेपर्वाईमुळे पुढील पीढीचे भवितव्य किती घातक झाले आहे, याकडे डोळेझाक करून चालणार नाही. पुढारी नेते आपलं सरकार रहावं यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रचारकार्यात बेरोजगार तरुणांचा वापर करून घेतात. कमी श्रमामध्ये त्यांना भरपूर पैसा मिळतो. खाणं-पिणं, मौज-मज्जा, नशा-पाणी या सगळ्याची चंगळ असते. त्यामुळे कष्ट करण्याला ही तरुणाई धजत नाही. आजकाल खेडोपाडी जी थोडीफार शेती आहे, तिथं शेती करण्यासाठी मजूर वर्ग मिळत नाही. कारण सरकारच्या अनेक योजनांमार्फत यांना घरबसल्या महिन्याला पुरेशी कमाई होत असते. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज भासत नाही. सरकार कर्जबाजारी असले तरी विविध योजनांमार्फत फुकट पैसा ठराविक गटाला देत असते. परिणामी कर भरणाऱ्या जनतेवर अन्याय होत आहे. उद्याच्या पिढीसाठी सरकारी तिजोरीत खडखडाट राहील ते वेगळेच, परंतु त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार सुद्धा राहणार आहे. न जाणो हा कर्जाचा भार चुकवण्यासाठी दुसऱ्या कोणाची गुलामी करण्याची वेळ त्यांच्यावर येईल.

राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी जातीयतेचे विष पेरून समाजात अस्वस्थता फैलावताना दिसतात. याचा पहिला बळी जाते तरुणाई म्हणजे उद्याची पिढी. जातीयवाद सांभाळताना ही पिढी माणुसकी हरवून बसणार आहे. सर्व सामान्याला आरक्षणाची भीक देऊन कुशाग्र बुध्दीमत्ता भिकेला लागताना दिसत आहे.

एक नाही, दोन नाही अशा अनेक समस्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करत आहोत.

आपला भारत देश एकेकाळी कृषिप्रधान देश म्हणून ज्ञात होता. परंतु आता ती शेती राहिली कुठे ? विकासाच्या नावाखाली गिरण्या, कारखाने उभे करण्यात, लोकसंख्या वाढीस लागल्यामुळे घरे उभारण्यात भराभर शेती विकली जाऊ लागली. गावाकडच्या लोकांजवळ शेती विकून भरपूर पैसा उपलब्ध आहे. त्यांची मुलं महागड्या गाड्या फिरवण्यात, मणभर सोनं- नाणं अंगावर घालून मिरवण्यात व्यस्त आहे. उद्या संपत्ती संपल्यावर ही तरुणाई कोणत्या मार्गाने भरकटेल याचा अंदाज घेऊन बघा. शेती विकून उंच उंच इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यातील फ्लॅटची गरज व उपलब्धता याचे प्रमाण देखील व्यस्त आहे. पुणे-मुंबई सारख्या शहरांमध्ये असंख्य फ्लॅट रिकामे पडून आहेत. यातली आर्थिक गुंतवणूक लक्षात घेण्यासारखी आहे.

अति विकास, अति सुविधा, अति संशोधन हे सुद्धा समाजाला कसे घातक आहे ते बघा. हातमागाची जागा यंत्रांनी घेतली तेव्हा अनेकांच्या पोटावर पाय पडला, हे अजूनही चालू आहे. आजही आयटी सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये केव्हा नोकरीवर गदा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. संगणक, रोबोट ह्या सुविधा सोयी बरोबर गैरसोयीच्या ठरणार आहेत. आता तर काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ह्या तंत्रज्ञानापुढे माणसाची कौशल्य क्षमता लयास जाणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे. संगीत, चित्रकला यासारख्या कला माणसाला वरदान होत्या. त्या नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही. एकेकाळी टेलिफोनचे नंबर आपले तोंडपाठ होते, परंतु आता मोबाईल आल्यामुळे आपल्या स्मरणशक्तीवर नांगर फिरलेला आहे. अशाप्रकारे शारीरिक, बौद्धिक निष्क्रियता माणसाला कुठे घेऊन जाणार आहे देव जाणे. असे नागरिक ज्या देशात असतील त्या देशाचे भवितव्य काय असेल?

बालदिनानिमित्त एक लेख वाचण्यात आला. त्यात म्हटले होते, 'भारतात जवळपास १.८ कोटी मुले रस्त्यावर राहतात. ही मुले कोणाच्या खिजगणतीतही नाहीत. कोण असतात ही मुले, ती कुठून येतात, त्यांचे पालक कुठे असतात? गुन्हेगारी कृत्यांमध्ये या मुलांचा वापर केला जातो व लैंगिक अत्याचाराचेही ते बळी ठरतात. पुढच्या पिढीचे भविष्य किती भयावह आहे हे बघून अंगावर काटा उभा राहतो.

अजूनही वेळ गेली नाही. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वांनीच सावरायला हवे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी एखाद्या अवताराची वाट न बघता आपणच आपल्यात परिवर्तन घडवून आणायला पाहिजे.

वंदना लोखंडे

१०/०५/२०२६