ऐका ऐका ऐका
पुणेकरांसाठी खास खबर
‘खानदेशच्या पाटवड्या थेट आपल्या ताटात’
काय म्हणालात? रेसिपी हवी.
देते की, ती सुध्दा हात राखून न ठेवता.
साहित्य?
फार काही नाही हो.
तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात असतं तेच.
वाडगाभर बेसनपीठ, एक मोठा चमचा कणीक. आणि नेहमीचं तेच.. तेच हो…
तिखट, मीठ, हिंग, तेल
आणि हो, ‘खसखस व खोबर्याचा किस’ पाहिजे म्हणजे पाहिजेच.
आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करू या.
चकचकीत गॅसच्या शेगडीवर काळ्या तुकतुकीत हंडीत सव्वा ते दीड वाडगाभर पाणी ओता. हंडीखालची प्रकाशज्योत लाइटर नामक वस्तूने प्रज्वलित करा. त्या पाण्यात पुणेकरांना रुचत नसले तरी जरा जास्तच तिखट घाला. तुमच्या आवडीप्रमाणे मीठ, हळद, हिंग व दोन पळ्या तेल घाला. थोडी जिरे पूड, धने पूड टाकायला अजिबात विसरू नका.
आता पाण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सियस इतके झाले का बघा. अहो, म्हणजेच पाण्याला उकळी फुटली का ते बघा. मग त्यातले अर्धा वाडगा पाणी बाजूला काढा.
कशाला म्हणजे काय? शास्त्र आहे ते.
इथेच तर खरी कसोटी आहे. पीठाला थोडीसुद्धा चुनी पडता कामा नये, म्हणजेच तुमच्या भाषेत गुठळी हो. त्यासाठी ही खबरदारी घ्यावी लागते.
मंद आच करा.
चाळलेले बेसन पीठ व कणिक त्यात घालून दोन मिनिटे झाकण ठेवा. आता गृहिणीचे हत्यार घेऊन सज्ज व्हा. हे हत्यार घेऊन कोणी कोणी मोर्चे वगैरे काढतात ना, तेच ते लाटणे. याचे एक टोक तेलात बुडवून घ्या. त्याने हंडीतले पीठ गरागरा घोटायला सुरुवात करा. तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तांदळाची उकड घेतात ना त्याप्रमाणे हे घेरायचे. इतकं सोपं आहे ते.
बाजूला काढलेले पाणी थोडे थोडे मिश्रणाला पाजत रहा व घोटत राहा. सैलसर उपम्यासारखे मिश्रण व्हायला हवे, म्हणजे ‘पाटवड्या’ बारीक थापता येतात. या मिश्रणाची कांती तुकतुकीत झाली की गॅस बंद करून हंडी खाली उतरवा. दुसऱ्या गॅसवर एका छोट्या कढईत भरपूर तेल घाला. तेल कोमट झाले की त्यात भरपूर तिखट घाला. तिखट जळायला नको तेवढी काळजी घ्या.
आता टेबलावर प्लास्टिकचा कागद अंथरा. प्लास्टिकवर बंदी असली तरी यासाठी घरा-घरात प्लास्टिकचा कागद जपून ठेवायला हवा. त्याला तेल लावून त्यावर हा गोळा गरम असतानाच थापा. मग लाटण्याने त्याची बारीक पोळी लाटा. त्यावर कढईतले तिखट-तेल यथेच्छ ओता. खसखस व खोबर्याच्या किसाची दाट पखरण करा. उभे-आडवे छेद देऊन चौकोनी तुकडे करा.
एका छानशा ताटलीत घालून त्यावर परत तिखटाचे तेल, खसखस व खोबरे पसरवून खवय्यांपुढे ठेवा. किती ते तेल! असा विचार अजिबात करू नका.
सकाळच्या नाश्त्यासाठी प्रोटीनयुक्त उत्तम पदार्थ आहे. पुरणपोळी व आमरस याच्या जोडीला ‘पाटवड्यांची’ गोडी जरा अवीटच. लग्नकार्यातही हा पदार्थ मिरवून घेतो बरं का!
नागपूरातलं याचं जुळं भावंडं म्हणजे ‘मासवड्या’. थोडा फार फरक असणारच.
अरेच्च्या! सांगायचं राहिलंच की, ही सासूबाईंची परंपरा आमच्याकडे वारसाहक्काने आली आहे. सासूबाई गरम गरम पाटवड्या आम्हा सुनांना आग्रह करून वाढत. त्या करायच्या तेव्हा पूर्वतयारीची जबाबदारी मी घेत असे आणि करत असताना व्यवस्थित निरीक्षण करत असे. जेव्हा मी त्यांना माझ्या हातच्या पाटवड्या खाऊ घातल्या तेव्हा मला काय आनंद झाला म्हणून सांगू! खूप समाधान मिळाले. आता त्यांनी स्वयंपाकघरातून निवृत्ती घेतली आहे. पण मी आता माझ्या कुटुंबाला चविष्ट पाटवड्या खाऊ घालते.
म्हणूनच म्हणते, ‘आता पाटवड्यांवर तुम्ही सुद्धा मनसोक्त ताव मारा. कोणी हावरट, खादाड म्हटले तरी अजिबात वाईट वाटून घेऊ नका’.
पुणेकरांनो, रेसिपी आवडली तर पदार्थ करायला घ्या. केला तर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे फेसबुकवर फोटो टाका आणि मला टॅग करायला अजिबात विसरू नका.
धन्यवाद.
वंदना लोखंडे
०३/०५/२०२६
~~~~~~~~~~~~~~~
