आपण पूर्वार्धात देदीप्यमान रामजन्मसोहळ्याची अनुभूती घेतली. योगेश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी रामजन्माच्या मैफिलीत जो रंग भरला तो अवर्णनीय होता. संवादिनीवर असलेल्या वराडे नानांची व इलेक्ट्रॉनिक तालवाद्याचे मयूर गुरव यांची साथही तेवढीच पूरक होती.
यातली बरीचशी वादक मंडळी राममंदिराच्या गुरव गल्लीतच लहानाची मोठी झालेली. इथल्या जुन्याधुळ्यातील एकविरादेवीच्या व देवपूर भागातील नव्या एकविरादेवीच्या मंदिरातील देवीची पूजा-अर्चा करणारे हे साधक. याशिवाय मंगलप्रसंगी परंपरागत सनई चौघडा वाजवणारी ही मंडळी वादन कलेत पारंगत असलेली, जणू त्यांच्या रक्तातच कला भिनलेली. हा उत्तुंग कलेचा वारसा घेतलेली ही पाचवी पीढी असावी. परंपरागत चालत आलेल्या वाद्यांऐवजी मुकुंदाने तबल्यावर, मनोजने बासरीवर तर नेव्हीतल्या कुणालने व्हायोलिनवर मिळवलेले प्रभुत्व बघून अचंबित व्हायला होते. परंतु पुण्यातल्या रसिक श्रोत्यांसारख्या रसिक जाणकारांची इथे कमतरता जाणवली.
प्रख्यात सवाई गंधर्वांचे शिष्य पं. साळवेकर आमच्या जुन्याधुळ्यातील महादेवाच्या मंदिराच्यावर राहायचे. महादेवाची पूजा अर्चा करण्याचा मान त्यांचा होता. पं. भीमसेन जोशींचे ते ज्येष्ठ गुरु बंधू होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ते हजेरी लावत अशी आठवण येथील ज्येष्ठ संगीतकार विश्राम बिरारी काका सांगतात.
आम्ही लहान होतो तेव्हा त्यांचे महत्त्व कळले नव्हते, परंतु आज त्यांचा अभिमान वाटतो. तसेच आताच्या या पिढीतल्या वादकांचाही अभिमान वाटतो. त्यांच्या कलेचे मोल माझ्या मोठ्या भावाने जाणले व त्यांना आपली कला सादर करण्यासाठी रामजन्मोत्सवात दरवर्षी आमंत्रित करतो हे ही कौतुकास्पद आहे.
रामाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व कलाकार मंडळी व नातेवाईकांच्या समवेत घरी सहभोजन झाले. दोन प्रहराच्या विश्रांतीनंतर पावलांनी पुन्हा राममंदिराची वाट धरली.
भूषण शर्मा यांच्या संगीतमय ‘सुंदरकांड’ या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी.
सुंदरकांड हे रामायण महाकाव्यातील पाचवे कांड आहे. मूळ सुंदरकांड संस्कृत भाषेत वाल्मीकींनी रचले. ज्यात मुख्य पात्र श्रीराम नसून हनुमान आहेत. यांत हनुमानाचे साहस, शौर्य आणि त्याचा नि:स्वार्थीपणा त्याचबरोबर शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती सांगण्यात आली आहे.
१६ व्या शतकात ‘गोस्वामी तुलसीदास’ यांनी हेच रामायण ‘श्रीरामचरितमानस’ म्हणून ‘अवधी’ भाषेत लिहिले. अवधी भाषा हिंदीची उपभाषा, जी उत्तर प्रदेशातील अवध क्षेत्रात बोलली जाते. ‘तुलसी रामायण’ म्हणून लोकप्रिय असलेले हे रामायण भारतातील असंख्य घरांतून त्याचे नियमित पारायण होताना दिसते. आपणा सर्वांना परिचित असलेली 'हनुमान चालिसा’ही ‘अवधी’ भाषेतीलच आहे.
बरोबर संध्याकाळी ८ वाजता भूषणजी रामदरबारात मंचावर आपल्या वाद्यवृंदासहित आसनस्थ झाले. सुंदरकांड ऐकण्यासाठी समोर रसिक श्रोतागण असला तरी प्रभू रामचंद्रांना आमंत्रण देणे तर आवश्यक होते म्हणूनच
‘चले आना प्रभुजी चले आना’ असे आर्जवाचे सूर उमटले.
आवोजी गजानन आवो
आप पधारो देवा | रिद्धी सिद्धी संग लावो
अशी गणपतीला विनवणी केली.
'मोरया रे बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरणात चैतन्य संचारले. गुरुवंदना झाली.
‘जैसे वायू के बिना हम जी नहीं सकते वैसे कण-कण में हनुमानजी विराजित है’ अशी भावना बाळगून हनुमानजींना आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाचे निवेदन भूषणजी कर्णमधुर हिंदी भाषेतून करत होते.
‘मंगल भवन अमंगल हारी’ |
‘द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी’ ||
या अयोध्याकांडातील चौपाईच्या स्वरातून मांगल्याची अनुभूती येत होती.
सुंदरकांडमध्ये हनुमानजी व मैया सिताजीची भेट झाली आहे म्हणून हे पर्व सुंदर आहे. तसेच लंकेतली अशोकवाटिका इंद्रलोकाचेही सौंदर्य त्याच्यापुढे फिके पडावे इतकी सुंदर होती. म्हणूनच ह्याचं नाव सुंदरकांड पडलंय. यामध्ये आठ वेळा ‘सुंदर’ ह्या शब्दाचा प्रयोग कुठे कुठे झाला आहे हे उलगडून सांगताना भूषणजी म्हणाले, ‘जिथे सुंदरकांडचा पाठ वाचला जातो तिथे हनुमानाची विशेष कृपा असते. घरातली नकारात्मक ऊर्जा जाऊन तेथे सकारात्मक ऊर्जा अस्तित्वात येते.’
प्रनवउॅं पवनकुमार खल बन पावक ग्यान घन| जासु हृदय आगार बसहिं राम सर चाप धर||
असे म्हणत किष्किंधाकांडाच्या २९ व्या दोह्याने सुरुवात झाली. त्यानंतर
‘शान्तं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाणशान्तिप्रदं’
या श्लोकाने सुंदरकांडाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण साठ दोहे आहेत.
भूषणजींनी प्रत्येक दोहा खूप सुंदर रीतीने गायला. कधी उंच स्वरात, तर कधी मध्यम स्वरात गातांना त्यांनी त्यात खूप वैविध्य राखले होते. काही दोहे गाताना प्रत्येक चरणाच्या मागे-पुढे कधी ‘राम’ तर कधी ‘जय जय सियाराम’ असे जपाचे शब्द जोडून त्यातील भाव वर्धित करत होते. त्यांच्या गायनातील आवेग हा उत्साहवर्धित करणारा होता.
अवधी भाषा वाकारान्त आहे असे वाचनात आले. वाकारान्त म्हणजे चरणाचा शेवट ‘वा’ अक्षराने होतो.
मास दिवस महुॅं नाथु न आवा |
तौ पुनि मोहि जिअत नहिं पावा ||
आवा, पावा, सुनावा, दिखावा, बुझावा अशा शब्दांनी चरण पूर्ण होते. या शब्दांमुळे अवधी भाषेची मिठास, गोडी वाढली आहे.
तसं पाहायला गेलं तर ह्या ओळींचा अर्थ समजणं आपल्यासारख्या मराठी भाषिकाला जरा जडच आहे. परंतु ज्या पद्धतीने भूषणजी ती रचना सादर करत होते, त्यात हर एक श्रोता रममाण झालेला दिसत होता. भक्तीला भाषेचे बंधन नसतं ह्याची प्रचिती येत होती. मधूनमधून होणारी ‘जय श्रीराम’ अशी उंच स्वरातली गर्जना मन प्रसन्न करत होती.
सलग ६० दोहे ऐकणे आपल्यासाठी एकसुरी होऊ नये म्हणून की काय भूषणजी मधून मधून कधी हिंदी, तर कधी मराठी भजनांची पखरण करत होते. त्यामुळे श्रोत्यातला उत्साह कायम टिकून होता.
‘हाथ मे लड्डू मुख में नाम’
‘बारह बरस के वीर हनुमान’
धीर गंभीर आवाजातील हे भजन शेवटाकडे जाताना
‘सिताराम सिताराम भज प्यारे तू सिताराम’
‘रघुपति राघव राजाराम पतित पावन सिताराम’
च्या नाम-जल्लोषात रंगले. त्यावेळचा कोरस, ढोलकी, तालवाद्य व बॅंजोच्या साथीने तर बहार आली.
भूषणजींनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सुंदरकांड या पुस्तकाच्या प्रतींचे पूजन करून श्रोत्यांना या प्रती पठण करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे श्रोतेगण भूषणजींबरोबर पठणात सहज जोडले गेले होते.
‘हे भोळ्या शंकरा’ असा सुंदर आलाप घेत
‘आवड तुला बेलाची, बेलाच्या पानांची’
ही साध्या सोप्या शब्दातील रचना कोरस व तालवाद्यांच्या साथीने लक्षवेधक ठरली. त्यांच्या मधुर आलापी गायनाने नकळत मन शंकराच्या पायाशी लीन होत असल्याची अनुभूती येत होती. 'हर हर महादेव’चा घोष करत शंकराला आळवणी करत 'हरी ओम’च्या नादात ही रचना पूर्ण झाली.
सकल चरित तिन्ह देखे धरें कपट कपि देह।
प्रभु गुन हृदयँ सराहहिं सरनागत पर नेह।।
५१ व्या दोह्याला सुरुवात झाली. वानरांच्या रूपात आलेल्या दुष्ट राक्षसांना ओळखून वानरांनी त्यांचा समाचार घेतला. परंतु लक्ष्मणाने दया दाखवून त्या राक्षसांची सुटका केली आणि त्यांच्यासोबत रावणाला अंतिम चेतावणी देणारा संदेश पाठवला.
सुनि लछिमन सब निकट बोलाए।
दया लागि हॅंसि तुरत छोड़ाए।।
रावन कर दीजहु यह पाती ।
लछिमन बचन बाचु कुलघाती ।।
जे लोक भगवंताला शरण येतात त्यांच्यावर प्रभू राम नि:सीम प्रेम करतात व बंधू लक्ष्मण त्यांच्याप्रती दया दाखवतात हा पाठ यांतून मिळाला.
उत्तरार्धाकडे वाटचाल करत आहोत असे वाटत असतानाच भूषणजींनी अवकाश घेतला. आता वेळ होती बजरंगबलींचा झेंडा फडकवण्याची.
‘लहर लहर लहराये झंडा बजरंग बलीका’
‘भगवान के आगे जो नाचता है, उसे किसी और के सामने नाचने की जरूरत नही पडती है| जो पेट पालने के लिए घोडी नचाता है उसे संसार के आगे नाचना पडता है | जो भक्त यह झेंडा लहरायेगा उसके उपर हनुमान की कृपा बरसेगी’|
असे म्हणत त्यांनी सर्व माता-भगिनी, बंधूंना झेंडा फडकवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
‘इस झंडे मे क्या गुण है| सीताजी का पता लगाए||’
‘रावण की लंका जलाए| झंडा बजरंग बली का||’
झेंड्याचे गुणगान करणाऱ्या या भजनास श्रोत्यांची टाळ्यांची दाद, बॅंजोची साथ तर होतीच पण माझ्या लेकीने स्वयंस्फूर्तीने दिलेली टाळांची (मंजिरी) साथ मला कौतुकास्पद वाटली. ‘जय जय श्रीराम’ हा तार सप्तकातील होणारा गजर उपस्थितांच्या तन- मनात चैतन्य भरत होता.
जवळ जवळ १० मिनीटे चाललेल्या या भजनात प्रत्येक रामभक्त ध्वज हातात घेऊन नाचत होता. खरंच एका अद्भुत चैतन्याने भारलेल्या पवित्र वातावरणाचा मी सुद्धा एक भाग झाले होते.
बंदि राम पद बारहिं बारा |
मुनि निज आश्रम कहुॅं पगु धारा ||
‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की’ अशा जयघोषात ५६ वा दोहा पूर्ण झाला.
३ तासांपासून भूषणजी सलग गात होते. परंतु त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. ज्याप्रमाणे आपली रामरक्षा पाठ असते त्याप्रमाणे त्यांचे संपूर्ण सुंदरकांड मुखोद्गत होते. या पूर्ण कालावधीत त्यांना दम लागला नाही की त्यांनी पाण्याचा घोट घेतला नाही, हे विशेष होते. त्यांच्या सुमधुर melodious आवाजाने श्रोते भारावले होते. सुंदरकांड संपल्यानंतर जोगवा व २-४ भजनं घेऊ असे जाहीर करताच भाविकांचा उत्साह दुणावला.
सकल सुमंगल दायक रघुनायक गुन गान |
सादर सुनहिं ते तरहिं भवज्ञसिंधु बिना जलजान ||
आणि कलियुगाच्या सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्रीरामचरितमानसचा पाचवा सोपान (काण्ड) समाप्त झाला.
यानंतर ‘मिठापिठाचा जोगवा’ ही पारंपरिक चालीतील रचना तुळजापूरच्या शक्तिपीठात घेऊन गेली. काही महिला भक्तगण पदर पसरून, गाण्याच्या ठेक्यावर मनमोहक पदन्यास करत होते. त्याला जोडून ‘दे बाई दे, जोगवा दे, आई अंबाबाईचा जोगवा दे’ चा स्वर सभामंडपात निनादू लागला.
जोगव्याची आलेली दक्षिणा भूषणजींनी मोठ्या विनम्र भावाने अव्हेरून प्रभुरामचरणी अर्पण करावयास सांगितली. यातून त्यांच्या नि:स्पृहतेची ओळख झाली.
अजि देना हो तो दीजिए जनम जनम का साथ |
मेरे सिर पर रख दो रघुवर अपने ये दोनो हाथ ||
या वेळी भाविक उत्स्फूर्ततेने रामासमोर नाचण्यासाठी येत होते. कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता भजनाच्या ठेक्यावर चाललेला पदन्यास व हातवारे खूप मनोहर भासत होते. सहसा व्यक्त न होणारा माझा भाऊही 'जय जय श्रीराम’च्या जल्लोषात लीन झाला होता.
खरोखर Stress management (तणाव मुक्ती) म्हणतात ते हेच याची खात्री पटली. समर्पित होऊन केलेल्या रामनामजपाची ताकद काही वेगळीच असते. नुसते देवावर उपकार म्हणून दर्शनासाठी आलेल्या पामराला त्याची कल्पनाही करता येणार नाही.
‘रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी’
त्याच्यापाठोपाठ
‘मच गया शोर सारी नगरी में’
अशा धुंदफुंद भक्तीगीतांमधून भक्तीरंगाची उधळण होत होती आणि प्रत्येक भाविक त्यामध्ये चिंब भिजत होता. ‘आत्मानंद’ काय असतो याची प्रचिती प्रत्येक भाविकाला येत होती.
जवळ जवळ पावणेचार तास चाललेल्या या गानयज्ञात सहस्त्र रामनामाच्या समिधा निश्चितच पडल्या असतील. शेवटपर्यंत भूषणजींची ऊर्जा टिकून राहण्यात देवी सरस्वतीची कृपा तर होतीच, परंतु त्यांची ईश्वराच्या प्रती असलेली भक्ती व समर्पित होण्याची वृत्ती यामुळे ते शक्य झाले होते. स्वतः बरोबर ते दुसऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत होते. सकारात्मक ऊर्जेचे जणू धनीच ते.
गायकांच्या कंठातून निघालेला सूर, विभिन्न वाद्यांचा नाद व कोरस यांचा एकत्रित मेळ साधून तो स्वर-किरण विनाव्यत्यय श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय देवी एकविरेचे. एकविरा साऊंड सर्व्हिसचे किरण माळी यांनी ही ध्वनी ऊर्जा भाविकांच्या हृदयात परावर्तित केली.
रामजन्मानिमित्त मिळालेल्या या ऊर्जेतून आपल्या देहगुढीतील चैतन्य वर्षभर सळसळत राहील याची शाश्वती आली आणि दरवर्षी रामजन्मोत्सवासाठी उपस्थित राहण्याचा मानस प्रभूरामचरणी व्यक्त करून सगळ्यांचा निरोप घेतला.
वंदना लोखंडे
०९/०४/२०२६
