स्वयंपाकघराच्या खिडकीतून डोकावणाऱ्या औदुंबराच्या पर्णहीन फांद्यांवर कोकीळ आपल्या सहचारिणीबरोबर विसावू लागला अन् सुरेल पंचम लावत सुमधुर कूजन करू लागला, तेव्हाच आपल्या लाडक्या ऋतू वसंताचे आगमन झाल्याचे लक्षात आले. त्याच्या बोटास धरून त्याच्या पावलांत घोटाळत येणाऱ्या चैत्राने नवीन वर्ष सुरू झाल्याची ग्वाही दिली. उष्ण गंधित लहरींवर विहरणाऱ्या गुढीने साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या पाडव्यावर आपली मोहोर उमटवली आणि तेव्हाच माझ्या मनात रामजन्माचे वारे वाहू लागले.
पणजीने बांधलेल्या माहेरच्या जुन्या धुळ्यातील राममंदिरातील उत्सव खुणावू लागला. माझ्याइतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लेकीलाही रामनवमीचे वेध लागले. प्रभू रामचरणी आपली गानसेवा रुजू करण्याच्या इच्छेने तिच्या मनात मूळ धरले. त्यासाठी गाण्यांची निवड करून रोज सायंकाळी हार्मोनियमच्या साथीने रियाज सुरू झाला. माझ्या ‘मंजिरी’ संग्रहातील ‘का धाडिला राम वनी’ या रचनेला स्वरसाज देण्याचा मनोदय तिने पूर्णत्वास नेला. ‘कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम’ म्हणत त्यांच्याच ‘सुनता हे गुरु ग्यानी’ या कुमार गंधर्वांनी गायलेल्या भजनाची सुरावट मन प्रसन्न करीत होती.
उत्सवाच्या दोन दिवस आधीच पुण्याहून ३५० कि. मी. चा प्रवास करत धुळे शहर गाठले.
अखेर तो दिवस उगवला. आमच्या मंदिरातल्या पुरोहितांनी उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने दारावर दस्तक दिली. रामाच्या महाअभिषेकाची सामग्री त्यांच्या हवाली केली. पांझरेच्या पाण्यात पवित्र गंगेचे जल मिसळून रामाच्या शिरोभागावर कलशातल्या जलधारांनी अभिषेकास सुरुवात केली. दही, दूध, मध, तूप, साखर मिश्रित पंचामृताने गणपती, राम, लक्ष्मण, सीता व हनुमान या पंचायतनाला मंत्रोच्चारात स्नान घातले. त्यानंतर नूतन वस्त्र प्रावरण चढविले. साजशृंगार, दागदागिन्यांनी देवाचे रूप खुलत होते. मोगरा, ऑर्किडच्या फुलांची सजावट वातावरणात सुगंध पसरवत होती.
एव्हाना सोन्याच्या पाळण्यातून उतरून हळूहळू रांगत जाणारी सकाळ पोरवयात आली होती. त्याचवेळी बरोबर दहा वाजता योगेश जगताप व त्यांचे सहकारी रामाच्या दरबारात भव्य मंचावर वाद्यांसहित आसनस्थ झाले. तबला, पेटी, बासरी, व्हायोलिन, इलेक्ट्रॉनिक तालवाद्य व टाळ सगळी वाद्ये सूर व तालाला कवेत घेऊन उल्लासित होऊन बसली होती.
‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’
च्या स्वरांनी प्रारंभ झाला. सहगायकाच्या म्हणजे आपल्या मुलाच्या धीरजच्या साथीने योगेशजींनी सुंदर आलापी युक्त अभंग सादर केला.
राम द्यावा राम घ्यावा
राम जीविचा विसावा
असा अत्युच्च विचार रुजवणारी बागेश्री रागातील रचना सादर करताना त्यांच्या आवाजाला असलेली फिरत लक्षात आली. त्यांनी घेतलेल्या दीर्घ तानांना मनोज गुरव यांच्या बासरीची सुरेल साथ लाभली. ‘राम’ केवळ दोनच शब्द, पण ते प्रत्येक वेळी उच्चारताना त्यातील वैविध्य मनास शांती प्रदान करत होते. अचानक ‘बैरी कोयलीया कूक सुनाए, याद पियाकी आये’ ही बंदिश त्यात बेमालूमपणे मिसळून श्रोत्यांना चकित केले. मुकुंद गुरव यांच्या तबल्याची दमदार साथ मैफलीत रंग भरत होती.
सहसा भक्तीगीतात व्हायोलिनचा वापर केला जात नाही. परंतु कुणाल गुरव यांच्या व्हायोलिनच्या दर्दभऱ्या सुरांना ‘राम कैवल्याचा राम’ या रचनेचा खर्जातला स्वर पूरक ठरला. बासरीचा स्पष्ट व स्वच्छ टिपेला भिडलेला स्वर अंगावर रोमांच उभे करत होता. भजनी ठेक्याच्या नादाशी आपोआप चित्त रेंगाळत होते. त्यातील वैविध्य वेधक व वेचक होते. व्हायोलिनवर वाजणाऱ्या दीर्घ तानांच्या सुरावटीत मन गुंग असताना केव्हा 'इंद्रायणी काठी देवाच्या आळंदी’त येऊन पोहोचले ते कळलेच नाही.
पिता-पुत्रांची जोडी मैफलीत रंग भरत होती. तशातच ‘श्रीरामचंद्र कृपाळू भजुमन’ च्या श्रीराम स्तुतीत बासरीची सुरेल साथ चित्तवेधक होती. दोन ओळींमधला अवकाश भरून काढणारे, व्हायोलिनवर वाजणाऱ्या सुरावटींचे गुच्छ संगीत सुगंध पसरवत होते.
जागृती साळुंखे यांच्या साथीने योगेशजींनी ‘राम राम जय राजाराम | राम राम जय सीताराम’
चा जयघोष
‘नादातून या नाद निर्मितो’
या रचनेद्वारे उत्तरोत्तर रंगत गेला. व्हायोलिन व तबल्याची जुगलबंदी हा मैफलीचा कळस होता. प्रत्यक्ष राम मैफिलीत अवतरल्याचा भास होत होता.
अस्मादिकांची रचना, त्यास लेकीने चढवलेला स्वरसाज व सहचाऱ्याच्या मधुर आवाजात ‘हे रघुनाथा, हे यदुनाथा’ तली आर्तता दिग्ङमूढ करत गेली.
एव्हाना माध्यान्हीचा सूर्य रामजन्माची वेळ झाल्याचे सांगू लागला होता. तेव्हाच श्वेताने संवादिनीवर सारंग रागातील
‘चैत्र शुद्ध नवमी आज माध्यान्हीचा प्रहर’
‘प्रभुराम जन्मा आले उजळ झाले चराचर’
या माझ्याच रचनेचा सूर छेडला. रामाचे गुणगान गात 'श्रीराम जय राम जय जय राम’चा जल्लोष सुरू असताना गाभाऱ्याचा पडदा हळूहळू दूर होत गेला आणि प्रत्यक्ष प्रभूरामचंद्राचे मोहक रूप दृष्टीस पडताच मन अगदी प्रफुल्लित झाले. आनंदाच्या हिंदोळ्यावर मन रामलल्ला सोबत झुलत होते.
'मेरी चौखट पे चल के आज, चारो धाम आये है
‘बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आये है’
सर्वोच्च आनंदाचा हा क्षण अनुभवत होते.
वेदपाठशाळेतील शिष्यांनी रामजन्माआधीचा केलेला शांतीपाठाचा मंत्रोच्चार व नंतरचा १०८ वेळा केलेला रामनामाचा दृगोच्चार अनाहताच्या वाटेवर घेऊन चालला होता. तिथे फक्त रामाचीच संगत होती. अद्वैताशी भेट झाल्याची अनुभूती होती. मूक होऊन मी राम, लक्ष्मण व सीतेशी संवाद साधत होते. नकळत दोन्ही हात जोडून त्यांना वंदन केले. त्यावेळी दोन्ही डोळ्यांतून माझ्याही नकळत अश्रूधारा वाहत असल्याचे जाणवले.
रामाला पाळण्यात जोजवतानाचा आनंद सुखद होता. त्याच आनंदात आरती, मंत्रपुष्पांजलीला सुरुवात झाली. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी लोटली. गुरुजींनी प्रसादासाठी हात पुढे करायला सांगितल्यावर चित्त भानावर आले. पंचामृत व सुंठवड्याच्या प्रसादासोबत ओंजळीत घातलेले रामफळ रामाचा आशीर्वाद म्हणून स्विकारले.
आता वेळ होती ती अहोंच्या बासरीची. काळी चारच्या सुमधुर स्वरातील ‘श्रीरामचंद्र कृपाळू भजुमन’ ही रचना उपस्थितांची दाद मिळवून गेली. त्यानंतर योगेशजींनी भैरवीचे सूर आळवायला सुरुवात केली.
‘भज मन रामचरण सुखदायी’
कोमल, शुद्ध व तीव्र अशा बारा स्वरांना छेडणाऱ्या स्वरात धीरजचा ‘सजल नयन नितधार बरसती’ हा हळुवार स्वर पुढे जागृतीच्या ‘रामा रघुनंदनात’ सहज मिसळला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ म्हणत
'जगण्याचा पाया चालण्याचे बळ
विचारांची कळ तुकाराम’
या तुकारामांच्या अभंगावर स्थिरावला.
श्वास घेण्याचाही विसर पडावा असे कुणालचे व्हायोलिन वादन त्यात तुका म्हणे,
न लगे मुक्ती धनसंपदा
संतसंग देई सदा
या आर्जवी स्वरानंतर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ यावर विसावला. जवळ जवळ बावीस मिनिटे चाललेल्या या भैरवी गायन-वादनात श्रोते निश:ब्द झाले होते.
तेच सूर मनात साठवून संध्याकाळी होणाऱ्या 'सुंदरकांडा’त पुनःश्च ही अनुभूती घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त होणार ह्या विचाराने आनंद द्विगुणित झाला. राम जन्माचा सोहळा हा एक चैतन्यदायी सोहळा ठरला. त्या भारावलेल्या अवस्थेतच प्रभु रामचंद्रांचा निरोप घेतला.
वंदना लोखंडे
