|| श्री ||
२९/०३/२०२६
रविवार
पुणे
प्रिय मनास,
वंदनाचा सस्नेह नमस्कार.
कधीपासून तुला पत्र लिहिण्याचे ठरवते, पण तुझा पत्ताच मिळत नव्हता. तू कधी एका ठिकाणी राहशील तर शपथ! सारखी भिरभिर चालते तुझी. बहिणाबाई म्हणतात तेच खरं,
मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
प्रकाशालाही लाजवेल असा तुझा वेग. इतक्या वेगाने धावताना थकवा येत नाही का तुला? येतो ना? नाही म्हणू नकोस. जऽऽरा स्थिर राहायला शीक.
सतत तुला त्या नवरसांच्या वेढ्यात बघते. प्रत्येक जण तुला आपल्या तालावर नाचवत असतो. सतत तुला आपल्या कह्यात ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.
मला तुझ्या वागण्याचं नेहमीच कोड पडतं. तुला किती चटकन वश करून घेतात ते सगळे रस! तुझ्या इच्छेने काही घडतच नाही का? मला माहिती आहे,
‘मागते मन एक काही दैव दुसरे घडवते’
तू ज्याची इच्छा धरली ते पूर्ण झाले नाही की तुला भयंकर ‘राग’ येतो. याउलट लहानग्यांमध्ये रमताना तुझे ‘प्रेम’ पाझरू लागते. राणी लक्ष्मीबाईचे चरित्र वाचताना तुझ्यात 'वीर’श्री संचारते. परवा दयाळच्या पिलांना मांजरीने मटकावले तेव्हा किती ‘करुणा’ दिसत होती तुझ्या डोळ्यात! माझाही जीव कळवळला होता. तारांगणाचा अभ्यास करताना सारखा ‘अद्भुत अद्भुत’ चा जप सुरू असतो. आणि तो चित्रपट बघताना त्यातली मारामारी बघून तुला किती ‘घृणा’ वाटत होती! त्यालाच तर बिभत्सता म्हणतात. मात्र देवपूजा करताना तुझ्या चेहऱ्यावर खरोखर ‘शांती’ नांदते. तुझं ते रूप मला फार फार आवडते. आणि हो तुला अंधाराची ‘भीति’ का वाटते? तुझा चेहरा बघून जीव तुटतो माझा अन् तुला पोटाशी धरावेसे वाटते. अशा छोट्या मोठ्या संकटांना घाबरून कसं चालेल? नीडर होऊन तोंड द्यायलाच हवे. त्यालाच ‘जीवन ऐसे नाव’. त्यादिवशी तुझ्या बालमित्रांमध्ये तुला खळखळून 'हस’ताना पाहून मीच आनंदले. असंच नेहमी आनंदी रहावं.
यासाठी नियमित प्राणायाम करत जा. पतंजली मुनींनी त्यांच्या योगशास्त्रात सांगितलंय प्राणायाम म्हणजे श्वासाची ये -जा. ती स्थिर ठेवली तर मन स्थिर होतं. किती साधा सोपा उपाय हा! करून तर बघ.
अरे हो, मला कळले तू आताच त्या योगाचा क्लास जॉईन केला ते. नियमित प्राणायामाबरोबर हसतही जा. आठवड्यातून दर गुरुवारी शिकवतात ना… तसं. नाही तर एखादा हास्य योग क्लब जॉईन कर. परवा सारसबागेत त्या स्वानंदच्या महिलांबरोबर तुला वेगवेगळ्या पद्धतीने हसताना पाहून किती बरे वाटले मला! सुरुवातीला नाटकी वाटणारं हसू केव्हा खरं होतं ते कळतही नाही.
तुझी जीवनशैली बघता हसत रहाणं तसं कठीणच आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. सतत तो ताणतणाव कुरवाळत रहाण्यापेक्षा फेकून दे ते ओझे आणि मस्त कलंदर होऊन कधी तरी निसर्गात भ्रमंती करायला जात जा. तिथे तुला पंखवाले अनेक दोस्त भेटतील. त्यांच्याशी दोस्ती कर. त्यांचं नाचणं - बागडणं बघून तुला खूप समाधान मिळेल. आपण समाधानी असलं की सगळी सुखं हात जोडून आपल्या पायाशी उभी राहतात.
वाचून कंटाळा तर नाही ना आला?
तू म्हणत असशील किती ज्ञान पाजते ही? पण तसं नाही हं, तू मला अगदीच हृदयस्थ. तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार?
आशा आहे एव्हाना तुझं सैरभैर धावणं कमी झालं असणार आणि तू एकाच जागी स्थिर असशील. आता माझं पत्र तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल.
या पत्राला उत्तर म्हणून तू फक्त आनंदाने एक शीळ घाल. बस! मला दुसरं काही नको. तू आनंदी तर मी आनंदी. लवकरच भेटू पुन्हा. तेव्हा बोलूच.
तुझ्या त्या नवरस मित्र-मंडळींना शुभ आशीर्वाद.
तुझी सखी,
वंदना
