त्याचा सुरेल, मधाळ स्वर प्रथम ऐकला तो भावगीतातून. प.पू. पांडुरंग शास्त्रींच्या स्वाध्याय परिवारात. त्याच्या सुरेल, मधाळ स्वराइतकाच त्याचा स्वभावही सोज्वळ व शालीन. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा युवक काही दिवस एका खाजगी कॉलेजमध्ये शिक्षणदानाचे कार्य करून सरकारी नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर माझ्या वडिलांच्या लक्षात आला. आपल्या लाडक्या लेकीसाठी हा उत्तम सहचारी असल्याचे त्यांना त्यांच्या मनाने सांगितले. क्षणाचा विलंब न लावता त्यांनी त्या युवकाला विचारणा केली, “माझा जावई होशील का?”
त्याला काहीसा अपेक्षित असलेला हा प्रश्न अचानक अशा पद्धतीने समोर आल्यावर नाही म्हटलं तरी तो थोडा भांबावलाच. त्याच दिवशी काही कारणाने आमच्या घरी आलाही. परंतु या वेळचा ‘राजु लोखंडे’ मला निराळाच भासला. काहीसा अबोल, संकोचलेला, माझ्या मनाला संभ्रमित करणारा. अर्थात या अशा वागण्याचा उलगडा मला यानंतर काही दिवसांनी झाला.
त्याच्या आई-वडिलांच्या संमतीने माझ्या वडिलांनी विचारलेल्या त्या प्रश्नाला त्याने होकार दिला. मग रितसर आमंत्रण देऊन, मुलगी पाहण्याचा पारंपरिक सोपस्कार पार करून हो नाही करता हा विवाह ठरला.
राजुचा मित्र परिवारही त्याच्या सारखाच सोज्वळ, सुरेल. लग्नासाठी खास पुण्याहून आलेला. सुहास सोनावणे व त्याचे दोघे भाऊ आपली संगीत वाद्ये घेऊन धुळ्यात पोहोचले. लग्नाच्या पूर्व संध्येला त्यांनी आपल्या लाडक्या मित्राच्या लग्नघरी सुरेल मैफल रंगवली. त्या काळी आजच्या सारख्या नाच-गाण्यांनी युक्त अशा संगीत रजनीचा प्रघात नव्हता. या पार्श्वभूमीवर मला जेव्हा या मैफलीची माहिती मिळाली तेव्हा त्याचे अप्रूप वाटले. ही मैफल फक्त वराकडच्या वऱ्हाडींसाठी मर्यादित स्वरूपात असल्याने तेथे वधूपक्षाला प्रवेश नव्हता.
विवाहाचा दिवस उगवला. त्यावेळी माझे काका धुळे शहराचे नगराध्यक्ष असल्यामुळे आमचा विवाह सोहळा आमदार, खासदार व मंत्र्यांच्या उपस्थितीत खूपच थाटामाटात संपन्न झाला. विवाहाची पूर्व तयारी बघून यांच्या मित्राला तबला-पेटी च्या साथीने मंगलाष्टक गाण्याचा मोह अनावर झाला. धावत पळत घरी जाऊन, वाद्ये आणून त्यांनी आपल्या सुरेल स्वरात मंगलाष्टक गायले. अशा पद्धतीने आमच्या सहजीवनाची सुरेल सुरुवात झाली. ही माझ्यासाठी अनोखी विवाह-भेट ठरली.
विवाह, स्वागत समारंभ, कुलस्वामिनी दर्शन व सत्यनारायणाची पूजा हे सर्व विधी पार पडल्यानंतर ती रात्र आली. मधुमिलनाची रात्र. काहीशा धडधडत्या अंत:करणाने त्या खोलीत प्रवेश केला. राजु तसा परिचयाचा असला तरी नाते नवीन होते. एकमेकांच्या अपेक्षा विशद करत विवाह सोहळा, आदल्या दिवसाची संगीत मैफल या विषयांकडे गप्पांचा ओघ वळला. तेव्हा माझ्या आग्रहाखातर त्या पहिल्या रात्री नवऱ्याने त्याचे खास गाणे ऐकवले.
'ए जानेचमन तेरा गोरा बदन खिलता हुआ गुलाब’
आतापर्यंत ऐकलेला भावगीतातला सुरेल भक्तीसूर आज मात्र काहीसा रोमँटिक मूडचा होता. मी आतापर्यंत न ऐकलेल्या महेंद्र कपूर च्या या गाण्यानंतर लता दीदींच्या आवाजातील 'मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग’ या गीत स्वरांत दीप कधी मालवला ते कळलेच नाही. हा माझ्यासाठीचा पहिला वहिला ‘नजराना प्यार का’. मधुचंद्राच्या दिवसांत माऊथ ऑर्गन, बासरीशी याचे असलेले सख्य लक्षात आले. त्यांनी पहिल्या पगारातून घेतलेल्या संवादिनीशी माझी ओळख झाली.
अशाप्रकारे सुरेल सुरावटीने आमच्या सहजीवनाला प्रारंभ झाला होता. नाटक, सिनेमा या व्यतिरिक्त मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आम्ही घेत होतो. अनुराधा मराठे, अनुपमा सहस्त्रबुद्धे, त्यागराज खाडिलकर, मुकुंद फणसाळकर यांना ऐकल्याचे आठवते. अनुराधा पौंडवाल व अरुण पौंडवाल यांची मुलाखतही टिळक स्मारकला ऐकल्याचे आठवते. नवऱ्याची आवड मी सहजगत्या आपलीशी केली.
कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय, गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय यांना लाभलेला इतका मधुर सुरेल सुस्वर म्हणजे जणू ईश्वर देणगीच होती. सुदैवाने जनुकांतून हा वारसा दोघी मुलींनाही लाभला. नंतरच्या काळात संदीप खरे, सलील कुलकर्णी, विभावरी आपटे, ऋषिकेश बडवे यासारख्या प्रस्थापित लोकांचे गायन ऐकत होतो.
पुढे मुलींबरोबर त्यांनी ‘सारंग संगीत विद्यालयात’ पाऊल ठेवले. पं. राजन कुलकर्णींच्या शास्त्रीय संगीत संस्कारांनी हा स्वर अधिकच खुलला. एव्हाना पुण्यातल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात सहकुटुंब हजेरी लावू लागलो. सकाळी देवपूजा करता करता यांच्याकडून विविध रागांतील स्वरांची आळवणी करत स्वरपूजाही बांधली जात होती. माझ्यासाठी राजु म्हणजे चालता बोलता रेडिओच होता.
ह्या आवाजाला व्यासपीठ मिळावे म्हणून माझे प्रयत्न सुरू झाले. त्यांची प्रतिभा लोकांसमोर यावी हा ध्यास मी घेतला. सोसायटीतील गणेशोत्सवात सर्वांना सहभागी करून गाण्याचा कार्यक्रम आयोजित करू लागले. त्याची संहिता व निवेदन माझेच असायचे.
आप्तेष्टांच्या लग्न समारंभात स्वतःहून पुढाकार घेऊन नवरा व दोघी मुलींच्या सोबत संगीतरजनीचा कार्यक्रम आखू लागले. आमच्या ‘वाणी कलाकार संघटन’ ग्रुप वर दिवाळी पहाट कार्यक्रमाची मला निवेदनाची संधी मिळत गेली, तशी त्या कार्यक्रमांमध्ये मी यांना गाण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांच्या आवाजाचे गानरसिकांकडून कौतुक होत होते.
नोकरीचा व्याप सांभाळून रियाज करणे तसे कठीणच होते. लॉकडाऊनच्या काळात मात्र मुलीबरोबर यांचे गाणे थोडे बहरात आले. मुलीने युट्युब वर या गाण्यांचे व्हिडिओ प्रसारित करायला सुरुवात केली. यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर काही व्हिडिओ शेअर केले. तिथे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत गेला.
ऑफिसच्या स्नेहसंमेलनात गायलेल्या गाण्यांमुळे सर्व खात्यांतील क्लास वन ऑफिसर पासून ते सर्व कर्मचारी वृंद सगळे यांना नावानिशी ओळखू लागले.
मी जेव्हा मुलीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला गेले तेव्हा यांनी त्या एकटेपणाचा सदुपयोग करून घेतला. बासरीवादन व गायन यामध्ये त्यांची संध्याकाळ व्यतीत होऊ लागली. बासरीचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सेवानिवृत्तीनंतरही कार्यरत राहणाऱ्या वडिलांना मोठ्या मुलीने निवृत्ती घेणे भाग पाडले व अमेरिकेला बोलावले. तिथल्या सहा महिन्यातच्या दीर्घ काळात यांनी नियमित बासरीचा सराव केला.
आता भारतात परत गेल्यावर जाहीर कार्यक्रमात गाण्याची त्यांची इच्छा जागृत झाली. पुण्यातले निवृत्त हौशी गायक एकत्र येऊन असे जाहीर कार्यक्रम करत असल्याचे ऐकिवात होते. माझी मैत्रीण ‘रिता’ हिने एक दोन कॉन्टॅक्ट उपलब्ध करून दिले. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पूर्वीचे गाण्याचे व्हिडिओ पाठवले. यांचे गाणे त्या आयोजकांच्या पसंतीस सहज उतरले. ‘आशुतोष उमराणी’ यांनी वाद्यवृंदासोबत गाण्याची संधी उपलब्ध करून दिली. थोडाफार सरावही सुरू झाला, परंतु आवाजाने असहकार नोंदवला. आतापर्यंत फारसा सराव नसलेल्या आवाजाला हा सततचा रियाज सहन झाला नाही. त्यांच्या स्वरयंत्राला सूज आली. गाताना घसा दुखू लागला. डॉक्टरांनी विविध चाचण्या करून रिपोर्ट तपासल्यानंतर काही दिवस मौन स्वीकारायला सांगितले. कधीही व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीने अचानक व्यायाम सुरू केला तर त्याला जसा त्रास होतो, तसेच काहीसे स्वरयंत्राबाबत झाले होते. थोडे फार औषधोपचार सुरू केले. परंतु गाण्याची उर्मी स्वस्थ बसू देईना. आम्ही मायलेकी सतत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याची आठवण करून देत होतो. प्रसंगी त्यांची नाराजी पण ओढवून घेत होतो.
साधारण एक महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पुन्हा सरावाला प्रारंभ झाला. आशुतोष उमराणींच्या स्टुडिओत दर बुधवारी जायला सुरुवात केली. आपण तयार केलेले गाणे स्टुडिओत जाऊन सादर करणे व त्यांनी दिलेल्या बारीक सारीक सूचना अंमलात आणून बिनचूक सादरीकरण करण्याकडे लक्ष केंद्रित केले.
मागच्या वेळी हुकलेली संधी पुन्हा चालून आली. पुण्याच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा’त ‘फिर वही श्याम’ या कार्यक्रमात चार गाणी सादर करण्याचे ठरले.
आणि आज तो दिवस उगवला. ती श्याम प्रसन्नतेने अवतरली. त्या भव्य मंचावर गणेश वंदनेनंतर राजुचे आगमन झाले. सुटा-बुटातला राजु तमाम प्रेक्षक व माझ्यासाठी खास नजराना घेऊन आला होता. त्याच्या मधाळ स्वरातील स्वर-नजराना स्वीकारायला आसुसले होते. ‘नजराना भेजा किसीने प्यार का’ म्हणताना त्या आवाजात आत्मविश्वास ठासून भरलेला होता. रंगमंचावरील सहजतेने, प्रसन्न मुद्रेने केलेला वावर मन वेधून घेत होता. किशोर कुमारच्या आवाजातील अमित खन्ना लिखित व राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला 'अहों’नी उत्तम न्याय दिला होता. परवाच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मला मिळालेला हा नजराना बहुमोलाचा होता. खूप दिवसांपासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार होत होते. हर्षभरीत मन त्यांना कौतुकाने न्याहाळत होते. त्या मधाळ सुरेल स्वरांना दाद देत होते. पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांनी वन्स मोअर दिला होता.
त्या पाठोपाठ ‘अभिमान’ चित्रपटातील 'तेरी बिंदिया रे, रे आय हाय’ या द्वंद्व गीताच्या सुरुवातीच्या humming नेच दिल काबीज केले. त्या हळुवार, कोमल स्वरास अमृताच्या योग्य सुरेल साथीने बहरलेल्या गीताला प्रेक्षकांची जबरदस्त दाद मिळाली. यांची गाण्यांची निवडही जरा हटके असते. रफी व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील ‘ठहरिए होश में आओ’ हे गीत तितक्याच नजाकतीने सादर केले. या गीताला ललिताने उत्तम साथ दिली. आतापर्यंत सादर केलेले प्रत्येक गीत यशाची एकेक पायरी वर चढत होते.
आता शेवटच्या गीताची उत्सुकता लागली होती. अशा कार्यक्रमात सहसा सादर न होणारे हे एकल गीत बाजी मारणार याची खात्री होतीच.
'धीरे से जाना खटियन में ओ खटमल’ आगळे वेगळे गीत.
कधी तार सप्तकात तर कधी खर्जातला स्वर लावत, आवाजाचा पोत बदलवत, मध्ये मध्ये गद्य शब्दातली पेरणी करत हे गाणे प्रेक्षकांना लुब्ध करत होते. या गाण्याने कळस गाठला होता. अनेक अपरिचित प्रेक्षकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळत होते. मन भरून पावले. कित्येक दिवसांपासून पाहिलेले स्वप्न साकार झाले होते. ‘असेच तुझ्या गायनाने रसिकांचे कान तृप्त होवो’ ही सदिच्छा अस्मादिकांनी व्यक्त केली.
आज २२ तारखेच्या ‘बेमिसाल रफी’ या कार्यक्रमासाठी माझ्या या सहचाऱ्याला शुभेच्छा देताना ३७ वर्षाचा आमचा हा जीवन प्रवास असाच पुढे सुरेल होत राहो, ही सरस्वतीचरणी प्रार्थना करते.
वंदना लोखंडे, पुणे
२२/०२/२०२६
#अक्षरयात्री सुरपाखरू
