‘तुका म्हणे कहे कबीरा’
प्रेक्षागृहात आसनस्थ होत नाही तोच पडदा उघडला… समोर भव्य मंचावर शास्त्रीय गायक आनंद भाटे, भुवनेश कोमकली, निरूपणकार धनश्री लेले वाद्यवृंदासह स्थानापन्न झालेले दिसत होते. Background ला उजवीकडे तुकाराम महाराजांचे अभंग चितारलेले उभे फ्लेक्स व डाव्या हाताला कबीराचे दोहे रेखाटलेले उंच फ्लेक्स. त्याच्या मध्यभागी ‘तुका म्हणे कहे कबीरा’ ही अक्षरे जणू भुर्जपत्रावर लिहिल्याचा भास व्हावा अशा प्रकारची backdrop ची सजावट… व्वा!
सकाळची दहा वाजेची वेळ… आनंद भाटेंनी लावलेला सूर… 'तुज सगुण म्हणो की निर्गुण रे’. त्याला जोडून आलेली पखवाजाची थाप ऐकताच देही चैतन्य सळसळले. तबल्यावर उमटलेला भजनी ठेका व त्यास मंजिरीची मधुर साद… त्यात 'स्थूल की सूक्ष्म’ म्हणत मिसळलेला भुवनेश कोमकलींचा स्वर, पुन्हा ‘दृश्य की अदृश्य’ म्हणणाऱ्या आनंद स्वरांनी मन द्विधा अवस्थेत नकळत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी स्थिर झाले. ‘गोंविंदु’, 'विठ्ठलु रे’ या शब्दांतून किती लाघव ओसंडून वाहत होते! खरंच माऊलीच ना ती!
कार्यक्रमाला नाव तुकोबांचे व अभंग मात्र माऊलींचा हा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न धनश्रीताईंनी बरोबर ओळखला. त्याचे त्यांनी अचूक निराकरणही केले.
सगुणोपासक तुकोबांना विठ्ठल जसा दिसला तसे त्याचे त्यांनी प्रांजळपणे वर्णन केले. 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ असे म्हणणारे तुकोबा जेव्हा 'अणुरेणिया थोकडा तुका आकाशाएवढा’ म्हणतात तेव्हा आनंद भाटेंच्या दीर्घ आलापीतून भगवंताचे विराट रूप बघितल्याचा भास होत होता. ‘पंचम मालकंस’ ह्या रागात आळवलेला हा अभंग श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला. त्यांच्या गायकीची प्रशंसा करताना धनश्रीताई म्हणाल्या, अभंग गायनामध्ये स्वरभास्करांचे तेज पसरले आहे. त्यांचा शिष्योत्तम जणू एखादा हिरा असावा तसा हा हिरा. हिरा काय करतो ते तेज आपल्यामध्ये घेतो आणि स्वप्रभेने स्वयंप्रकाशित झालेला दिसतो तसा हा ‘आनंद-स्वर आहे’.
सगुणाचे उपासक संत तुकाराम महाराज तर निर्गुणाचे उपासक संत कबीर. ‘राम नाम का मरम है आना’ असे म्हणणाऱ्या कबीरांना विचारले की राम नाम ही तर सगुणोपासना आहे तर तुम्ही निर्गुणी कसे? परंतु ‘राम’ या शब्दाचा मूळ धातू ‘रम म्हणजे रमविणारा’ आहे . मी ज्याच्यात ‘रमतो तो राम’ असे म्हणणारे कबीर कधी साई, कधी हरी तर कधी विठ्ठलात रमताना दिसतात.
भुवनेशजींनी गायलेली 'साई की नगरी परमसुंदर अतिसुंदर’ ही रचना पहिल्यांदाच ऐकत होते आणि कुमार गंधर्वांची आठवण झाली. त्याच पाठोपाठ माझ्या ह्रदयाच्या अगदी जवळच्या 'सुनता है गुरु ग्यानी’ या स्वरांचा उच्चार होताच मन तल्लीन झाले.
या देहरूपी झाडावर अनेक हिरव्या इच्छांची पाने लगडलेली होती. मोह, आसक्ती, लोभ या हिरव्याकंच पानांबरोबर राग, मत्सर आणि द्वेषाची काळवंडलेली पानेही घट्ट बिलगून बसलेली होती. निर्गुणी भजनाचा संग लागता मी-तू पणाची बोळवण झाली. तो आणि मी एकच आहे ही भावना जागृत झाली आणि माझा देह माझ्यासाठी उरलाच नाही. ह्या देहाला घट्ट बिलगलेली हिरवीकंच पाने क्षणात पिवळी होऊन या देहापासून विलग होऊन जमीनदोस्त झाली. नकळत डोळे मिटून घेतले.
'वाहासे आया पटा लिखाया तृष्णा तो उने बुझायी’
ह्या ओळी ऐकून बाह्य जगाशी जणू फारकत घेऊन अंतर्मनात डोकावयाला लावणारी भावावस्था प्राप्त झाली.
‘गगन मण्डल में होय उजियाला बोले गुरुमुख वाणी’
या स्वरांत सहगायिका 'वर्षा बन्सीवार’च्या जाड पोताच्या स्वराची मिसळण अद्भुत होती. अभंग गायनात पहिल्यांदाच बासरीचा स्वर ऐकायला मिळाला. तो ही वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा होता. एखाद्या सावलीसारखी ह्या सुरांची संगत करणारा संवादिनीचा स्वर चित्तवेधक होता.
'ओहं - सोहं बाजा बजे, त्रिकुटी धाम सुहानी’
‘मी कोण? -मीच ब्रह्म’ अशा संभ्रमावस्थेत असताना टाळ, चिपळी, दिमडीचा नादझंकार स्वभान हरपवत होता.
'कबीर व गोरखनाथांची निर्गुणी भजने’ आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या 'कुमार गंधर्वां’ना वंदन करावयास नकळत हात जोडले गेले. तीच परंपरा, तो ध्वज तितक्याच समर्थतेने आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या 'भुवनेश कोमकलींपुढे नतमस्तक झाले.
'लय नाही लय नाही मागणं’ चा उत्तेजित करणारा आनंद-स्वर तर 'अवधूता कुदरत की गत न्यारी’ असे म्हणत अंतर्मनात अपूर्व शांती पसरवणारा भुवनेशजींचा स्वर. दोन्हीही कमाऽल.
'निर्भय निर्गुण गुण रे गाऊॅंगा’ यांसारख्या प्रथमच ऐकलेल्या रचनांबरोबर चिरपरिचित 'ज्ञानियांचा राजा’, ‘आता कोठे धावे मन’ या रचनांनी अंतर्मनाचा ठाव घेतला. ही अनुभूती पुन्हा मिळावी म्हणून प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ चा घोष लावला.
ही मैफल म्हणजे संत तुकाराम व संत कबीरांच्या रचनांचा पुष्पगुच्छ होता. त्या संतांच्या रचनांचे आकलन होणे आपल्यासारख्या पामराला सुलभ नव्हते. परंतु धनश्रीताईंनी गीतेचा, ज्ञानेश्वरीचा संदर्भ देत या रचनांची एक एक शब्दपाकळी हळुवार उलगडून दाखवत, त्यातले सौंदर्य विशद करत श्रोत्यांच्या मनावर चांगलीच पकड घेतली होती. तेव्हा एक स्वाभाविक विचार मनात तरळला. हे भगवद्-विचार त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला इतका आनंद होतोय तर जेव्हा प्रत्यक्ष धनश्रीताई त्या वाङ्मयाचा अभ्यास करत असतील तेव्हा त्यांना किती परमानंद होत असेल! हा विचार मनात तरळल्यावर, खरोखर त्यांचा हेवा वाटला व आपणही ती अनुभूती घ्यावी, त्यासाठी अभ्यास करायला हवा ह्या विचाराने मनात अलगद प्रवेश केला. धनश्रीताईंना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते.
कबीरांची भाषा सधुक्कडी तर तुकोबांची मराठी. संत तुकाराम महाराष्ट्रात, तर कबीर उत्तर भारतात. दोघांचा कालखंड निराळा. तरी दोघांचा विचार सारखा, रूपकं सारखी, बाणा सारखा. चुकला तर दंड तयार आहे. 'नाठाळाचे माथा हाणू काठी’.
कबीरांचे दोहे व तुकारामांच्या ओळीत बऱ्याचदा साम्य दिसते.
कबीर म्हणतात, 'निंदक निकट राखिए, अंगण कुटी बिछाए’ तर तुकाराम म्हणतात, 'निंदकाचे घर असावे शेजारी’ असे समान विचारांचे दोन तीन दाखले ताईंनी दिले तेव्हा श्रोते अवाक झाले.
‘कौन ठगवा नगरया लूटन हो’
ह्या रचनेत भुवनेशजींच्या सुरात बासरीचा मिसळलेला स्वर आनंद बहुगुणित करत होता. संवादिनी तर ‘कबीरवाणी’ चे खडे बोल ऐकवत होती.
आत्मा-परमात्म्याचं मीलन म्हणजे जीवा- शिवाचं मीलन. हे मीलन घडवून आणण्यासाठी त्या दोघांतील अंतरपाट म्हणजे पटल दूर करायला हवे. हाच विचार वधू-वर विवाहबद्ध होताना अपेक्षित आहे.
ऐकायला तर खूप आहे. परंतु आता घड्याळाचे काटे बोचायला लागले असे सांगून भैरवीची वेळ झाल्याचे त्यांनी सूचित केले.
भुवनेशजींनी गायलेली रचना
'धून सुनके मनवा मगन हुआ जी’
‘लागी समाधी गुरू चरणा जी’
प्रथमच ऐकत होते. क्षणाची उसंत न घेता त्यापाठोपाठ आनंद भाटेंची
'आहे भगवद् गीता पूर्ण सरिता’
‘एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत’
च्या सुरेल स्वरांनी कान तृप्त झाले. सगुण-निर्गुणाचा भेद मिटवून एक अलोलीक शांतीचे गाठोडे उराशी घेऊन पुन्हा या भवसागरात जन मार्गस्थ झाले.
वंदना लोखंडे
१३/०२/२०२६
_____________________
#अक्षरयात्री २०२६ सुरपाखरू
