लेखक परिचय: तुषार जोशी, नागपूर

नमस्कार!

मी तुषार जोशी.

मी नागपुरात राहतो. माझे भूल आणि मनाच्या कविता हे दोन कवितासंग्रह २०१२ मधे प्रकाशित झालेले आहेत.

सुरपाखरांचा थवा लेखक समुदाय

२०२२ पासून मी सुरपाखरांचा थवा नावाचा लेखकांचा व्हॉटसॅप गटाचे व्यवस्थापन करतोय. या लेखक गटाच्या अंतर्गत लेखनाविषयक वेगवेगळे उपक्रम आयोजित केलेत

कवींच्या समुदायाबाबत विचार

कवितेसाठी एकत्र येऊन काही करणारे म्हणून रविकिरण मंडळाबद्दल खूप उत्सुकता जागी झाली आणि त्या काळचा बराच इतिहास वाचनात आला. तसेच आताच्या काळातही काही करायला पाहिजे असे विचार माझ्या मनात अनेकदा आलेले आहेत.

तसेच एक मंडळ स्थापन करण्याचा एक प्रयत्न मी केला होता काव्यसंजिवन मंडळ तयार करताना. ते मंडळ सात कविंचे होते आणि त्या मंडळात आम्ही २ वर्षे घमासान चर्चा केल्या. त्या मंडळात आम्ही मेल च्या माध्यमातून चर्चा उपक्रम घेतले. ठरवून कवी वाचले, ठरवून बीज मनात ठेवून लिहायचा प्रयत्न केला. ते मंडळ पुढे चालू शकले नाही.

काव्यसंजिवन मंडळ प्रकल्प माझ्यासाठी महत्वाचा टप्पा होता आणि एक अपयशाचे उदाहरण पण होते. गट आणि अनेक लोक एकत्र आले की आपले एकट्याचे मत चालत नाही सगळ्यांनी ठरवून पुढे जावे लागते. एकाने दिशा बदलली आणि ईतर त्या दिशेने चालायला तयार नसतील तर गट उरतच नाही.

रचनात्मक प्रकल्प

कवी एक क्षणाचा सृजक आणि अनंत काळाचा कारकून असतो असे मी विनोदाने म्हणतो. आपल्याला कविता आवडतात आणि आपण कवितांना वाचून जतन करून ठेवू शकतो कवितांच्या जगात काय चाललेय याची पाठराखण करू शकतो हे भान आल्यावर कवितांसाठी आपण आपला वेळ द्यावा ही जाणीव झाली. व्यवसायाच्या शिक्षणाने प्रकल्प व्यवस्थापन शिकायला मिळत गेले तेव्हा आपले प्रकल्प व्यवस्थापनाचे कौशल्य कवितांच्या कामी यावे असे वाटत गेले त्यातुन मी दोन प्रकल्प उभे केले

मराठी कवी काळानुसार

हे मराठी वायकिपीडिया वर मी मेनटेन केलेले पान आहे. त्यात मी जसे जमेल तसे मराठी कवी काळानुसार जोडत असतो. मला माहित आहे की हे काम अनेक वर्षे असनेक अभ्यासकामना उपयोगी पडणार आहे. स्पृहा च्या टीम मधले उदय कर्वे बोलतांना हे बोलून गेले होते की आम्ही कविंच्या माहितीसाठी ते पान अनेकदा पाहतो हे एक उदाहरण. मला हे माझे एक योगदान आहे असे वाटते.

काव्यास्वाद

काव्यास्वाद हा दुसरा रचनात्मक प्रकल्प जिथे मुक्तप्रकाशन करणाऱ्या आंतरजालीय कवींच्या कवितांवर लेख प्रकाशित करण्याचा मानस मी बांधला आणि आजवर २० लेख प्रकाशित करून आणले. त्या लेखकांना मानधन देऊन फेसबुकवर असा प्रकल्प चालू शकतो याचे एक उदाहरण मी ठेवले याचे मला समाधान आहे.

सृजनात्मक प्रकल्प

आपण कविता लिखाणाच्या आवडीलाच थोडे वळण देऊन काही भरीव काम करू शकतो अश्या विचाराने मी काही प्रकल्प सुरू केले होते, त्यांचा कवितांच्या प्रांतात कुठेतरी ठसा उमटेल आणि कुठेतरी त्याची नोंद होईल असे वाटते त्यातले काही तुम्हाला सांगतो.

सावळ्या मुलीची गाणी

गोरी गोरी पान, किंवा गोऱ्या गाली चढवा जाळी अश्या शब्दांमध्ये गोऱ्या रंगाचा गोडवा गाणारे काव्य मी अनेकदा वाचलेय आणि आपल्या भारतात ८० टक्के सावळे आणि काळ्या रंगाचे प्राधान्य असताना सावळ्या रंगावर कमी लिखाण होतेय असे वाटलेने आपण एक कवी म्हणून या क्षेत्रात काही लिखाण करत राहीले पाहिजे या उर्मिने मी अनेक कवितांमध्ये सावळ्या रंगाचा गोडवा माझी आवड मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सावळ्या मुलीची गाणी नावाने माझे एक पुस्तक इसाहित्य प्रकाशनाने काढले होते. हा विचार माझ्या मनात कायम असतो आणि मी सावळ्या रंगावर काळ्या रंगावर लिखाण करत असतो ते हे रंग स्वतंत्र अस्तित्व असलेले जगणे आहे हे मांडण्यासाठी. तुलनेसाठी नाही आणि मी तुलना करत नाही तर मला जे आवडते ते लिहित राहतो असे माझे मत आहे.

रोहितची डायरी

माधवराव पटवर्धनांच्या छंदोरचनेचा अभ्यास सुरू झाला तेव्हा पासून आजच्या मराठीत त्या छंदांची उदाहरणे असावित असे मला नेहमी वाटायचे त्या विचाराने प्रेरित होऊन मी ही लेख माला सुरू केली. आता याचे फेसबुक वर एक पान आहे, आणि एक ब्लाग. प्रत्येक नव्या पानावर एक छंद त्याचे आजच्या मराठीत एक उदाहरण आणि सामयिक विषयांवर थोडे भाष्य असा या प्रकल्पाचा विस्तार आहे आणि मला खूप आनंद देणारा हा प्रकल्प ठरला आहे.

सख्या सजणा

स्त्रिच्या मनातून पुरूषांच्या अनेक पैलूंचे वर्णन आणि स्तुती या कविता शृंखलेतून मी करायचा प्रयत्न केला आणि तो जमेल तसा सुरू ठेवायचा माझा विचार आहे. त्यासाठी मी एक सख्या सजणा नावाचे पेज चालवतोय.

येताजाता

आपल्यावर कुणीतरी कविता केली ही भावना खूप प्रेरक आणि आशादायी असते असे माझे मत आहे. इंटरनेट वर भेटलेल्या अनेक चेहऱ्यांचा असा विचार करून माझ्यावर एक कविता आहे असे म्हणता यावे या दृष्टीने फोटोतले चेहरे पाहून त्यावर कविता लिहिणे हा प्रकल्प मी अनेक वर्षांपासून करतोय. यात मला अनेक लोकांचा संचय करता येतो आणि माझ्या परिने आनंदाची पखरण करता येते याचे मला समाधान आहे. समोर फोटोत असलेला चेहरा ज्या व्यक्तीला प्रिय असेल असा प्रियकर किंवा प्रेयसी काय विचार करेल त्या पात्रात मी प्रवेश करायचा प्रयत्न करतो आणि फोटोवर स्तुतीपर कविता लिहिणे होते. अनेक कविता इथल्या एकसारख्याच आहेत पण त्या फोटोतल्या व्यक्तीसाठी ती एक उपलब्धी असते आणि आनंदाचे कारणही.

मराठी अनुवाद

प्रसिद्ध इतर भाषेतल्या कवितांचे मराठी अनुवाद आपण करावेत या हेतूने मी अनेक आवडलेल्या हिंदी आणि इंग्रजी कवितांचे मराठी अनुवाद करायचा प्रयत्न या ब्लाग वर करत असतो.

3 Likes