'३०दिवसांत३०' उपक्रमाचा लेखाजोखा

३०दिवसांत३० उपक्रमाचा लेखाजोखा

एका साहित्यिक ग्रुपवर नागपूरच्या ‘तुषार जोशी’ यांनी '३० दिवस ३० लेख’ लिहिण्याची संकल्पना विषद केली. मी थोडे घाबरत, थोड्या आत्मविश्वासाने होकार दर्शवला. १ जानेवारी २०२६ या दिवशी 'सुरपाखरांचा थवा’ या समूहावर आम्ही ४१ लेखकांनी ह्या संकल्पनेचा श्रीगणेशा केला.

विषय सुचणे व त्याला अनुसरून लिहिणे हे दिसते तितके सोपे नाही. सुदैवाने लिहित गेले व ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या ३० दिवसांत फेसबुकवर जवळजवळ दोन लाख वाचकांनी याची नोंद घेतली. उत्तम प्रतिसाद दिला. काही लेख फॉरवर्ड केले. यामुळे समाधान पावले. लिहिण्याचा आळस करणारी मी या निमित्ताने लिहिती झाले. पहाटे चार वाजता उठून लिहायला बसण्याचा परिपाठ सुरू केला. रात्रीच्या शांत झोपेनंतर डोळे उघडायचे ते नव्या लेखाचे मूळ घेऊनच. या उपक्रमाची माहिती मिळताच लिहिण्याला आरंभ केला होता त्यामुळे थोडे सुलभ झाले. सकाळी आठ वाजता लेख पोस्ट करण्याचा माझा प्रयत्न असायचा. सण-समारंभ, पहि-पाहुणे, नाटक-सिनेमा, व्यायाम या सगळ्या गोष्टी सांभाळून रोज लेख लिहित गेले. पद आख्यान (16000+) व चार पिढ्यांना जपणारी माझी मैत्रीण (13000) या लेखांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ‘माझ्या आईची व्रत-वैकल्ये’ यावरच्या लेखांनी तर प्रतिसादाचा उच्चांक गाठला. म्हणतात ना, आई वडिलांची पुण्याई कामास येते. तसेच काहीसे झाले. आईने केलेल्या व्रतवैकल्यांना मी केवळ शब्दबद्ध केल्याने लाखभर वाचकवर्ग त्या लेखाला लाभला. 'न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद मिळाला. अनेक वाचक आपल्या आईच्या आठवणीने हळवे झाले. कित्येकांनी माझ्या आई-वडिलांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माझेही गोडवे गायले. या लेखणीमुळे एका अदृश्य धाग्याने माणूस माणसाशी जोडला गेला. अनेक अपरिचितांंशी संवाद साधला गेला. ह्या ३० दिवस ३० लेख लिहिण्याच्या उपक्रमाची जवळजवळ दोन लाख वाचकांनी नोंद घेतली. याचे श्रेय ‘तुषार जोशींना’ जाते. त्यांच्यामुळे मी लिहिण्यास प्रवृत्त झाले. खरं सांगायचं तर त्यांची माझी प्रत्यक्ष भेट अजूनपर्यंत झालेली नाही. तरीही हे कार्य साध्य झाले.

‘माझी विठाई माझी शिवाई’ हा बाप्पाजींवरील लेख वाचून बाप्पाजींचे दोन्ही मुलं व दोन स्वाध्यायी कुठून कुठून मला भेटायला आले. खूप गप्पा झाल्या. खूप खूप आनंद वर्धित झाला. त्यांच्या भेटीने मी ३५ वर्षांपूर्वीच्या माहेरच्या वातावरणात जाऊन पोहोचले. https://forum.surpakharu.in लिंकवर या लेखाबरोबर इतरही लेखांना उत्तम प्रतिसाद मिळाला. लेखणीची ताकद काय असते हे लक्षात आले. कित्येक विषय डोक्यात नुसतेच घोळत होते. परंतु ते कागदावर उतरत नव्हते. या निमित्ताने ते शब्दबद्ध झाले हे विशेष. काही सुहृदांच्या प्रती भावना व्यक्त करण्याचे राहून गेले होते, ते या उपक्रमाच्या माध्यमातून साध्य झाले.

या 30 दिवसाच्या लेखात संगीत, अध्यात्म, आरोग्य, वैचारिक, माहितीपर, संवादात्मक, व्यक्तिचित्र, स्थित्यंतरे, प्रवास वर्णन असे वैविध्य राखण्याचा प्रयत्न केला. कधी विनोदी अंगाने, कधी भावनाप्रधान तर कधी चिंतायुक्त लेखन झाले. अजून अनेक विषय ऐरणीवर आहेत. 'जून २०२६’ ला पुन्हा हा अक्षरयज्ञ सुरू होणार आहे. देवी सरस्वतीच्या मनात असेल तर त्यात पुन्हा सहभागी होता येईल.

आपल्यातल्या लेखकाने, नवोदित असो की सिद्धहस्त असो त्यांनी या अक्षरयज्ञाचे यजमानपद जरूर स्विकारावे ही प्रांजल इच्छा व्यक्त करते.

आज हा लेख म्हणजे ३० दिवस चाललेल्या अक्षरयज्ञाची पूर्णाहुती आहे. माता सरस्वतीने हे पवित्र कार्य पूर्णत्वास नेले याचे समाधान आहे. मी अत्यंत सात्विक भावाने, शुचित अंत:करणाने 'नमो शारदे, नमो सरस्वत्यै:’ या मंत्रोच्चारात ३० लेखांच्या पवित्र समिधा अर्पण केल्या. देवी सरस्वतीच्या कृपेने त्या समिधांचा अक्षरसुगंध वाचकांच्या मनात दरवळत राहील हा विश्वास आहे.

आपल्यासारखे सरस्वतीचे उपासक, वाचक बनून या अक्षरयज्ञाचे साक्षीदार झालात. आपल्या प्रतिसादांच्या घृताची धार (तूपाची धार) सदैव त्यात पडत असल्यामुळे प्रचंड ऊर्जेने हा अक्षरयज्ञ तेवत राहिला. त्यासाठी आपणा सर्व सुजाण वाचकांना मनापासून वंदन करून आपल्या शुभेच्छांच्या अक्षतवर्षावात स्तब्ध उभी राहते.

वंदना लोखंडे

पुणे

३१/०१/२०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६