माझ्या आईची व्रतवैकल्ये (मध्यरंग)

माझ्या आईची व्रत-वैकल्ये (मध्यरंग)

कालच्या लेखात माझ्या आईची चातुर्मासातील अनेक व्रतं आपण बघितली. या व्रतातून तिने देव, पती, बालक, वृक्ष या सगळ्यांची पूजा केली. याचा अर्थ ती सगळ्यांत देव बघत होती. चातुर्मासातील व्रत आचरताना त्यातील सातत्य बघता तिची चिकाटी व भक्ती प्रशंसनीय आहे.

या व्रताचे दुसरे रूप म्हणजे ‘लाखोली’. आपल्याला ‘शिव्यांची लाखोली वाहणे’ हा वाक्प्रचार माहिती आहे. यात एखाद्या व्यक्तीविषयी रागाची भावना व्यक्त होते. पण माझ्या आईची ‘लाखोली’ ही भक्तीभावाने, अत्यंत लीन होऊन देवाला वाहिली गेलेली दिसते. एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक ‘लाखोल्या’ तिने वाहिल्या.

'पारिजातकाच्या फुलांची लाखोली’ - ज्यांच्या अंगणात पारिजातकाचे झाड आहे त्यांच्यासाठी ही लाखोली वाहणे सोपे आहे. परंतु आम्हाला ती सुविधा नव्हती. कुठून कुठून ही फुले मिळवावी लागत. या कामात आईला तिच्या भावांची मदत होत असे. आमचा दुग्धव्यवसाय होता तेव्हा दूध वाटपासाठी मामांचे सहकार्य होत असे. आमच्या एका गिऱ्हाईकाकडे पारिजातकाचे झाड होते. त्यांच्या घरी दूध द्यायला गेले की मामा तिथून फुले वेचून आणत. जमिनीवर पडलेली फुले मातीत न्हायलेली असायची. मग त्यावर तोडगा म्हणून मामा प्लास्टिकचा कागद झाडाखाली अंथरायचे. झाड हलवून त्यावर पडलेली पांढरी शुभ्र फुले पाहून मन प्रसन्न होई. घरी आलेल्या फुलांची मोजदाद केली जाई. आमच्या शाळेत जाण्याच्या सकाळच्या घाईत आम्ही हे काम करत असू. सगळी गृहकृत्ये आटोपल्यावर आई श्रीकृष्णाला एकेक फूल वाहत असे. अर्थात फूल वाहताना देवाच्या नावाचा उच्चार मोठ्या भक्तिभावाने करीत असे. विचार करा ज्या घरात हा ध्वनी गुंजत असेल तिथले वातावरण किती मंगलमय, पवित्र असेल.

'तुळशीदलाची लाखोली’ - आमच्या दारात तुळस होती परंतु ती कुंडीत. ओट्यावर टांगलेली. तिला फार तर ८/१० मंजिरी लागलेल्या असत. एक लाख मंजिरी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत. मला आठवते ‘तुळशीराम नगर’ मध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेलो की तिथून आम्ही तुळशीदल तोडून आणत. तुळशीरामनगर मधून तुळशी… काय योगायोग बघा ना! या नावाचा इतिहास तुम्हाला सांगायला आवडेल. आमच्या वडिलांनी त्यांच्या हिश्श्याला आलेल्या वडिलोपार्जित शेतीचे प्लॉट पाडले. तेव्हा त्या भागाला नाव काय द्यायचे हा मुद्दा पुढे आला. आमचे आजोबा ज्या घरात दत्तक म्हणून आले होते, त्या आधी त्यांचे वडील भाऊ त्या घरात दत्तक म्हणून आले होते. दुर्दैवाने ते काही दिवसांतच मरण पावले. त्यांचे लग्न झाले होते पण त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांचा वंश तिथेच खुंटला. त्यांचे नाव जर त्या भागाला दिले तर ते काका कायमस्वरूपी स्मरणात राहतील ह्या अनोख्या भावनेने त्यांचे नाव त्या वसाहतीस दिले… ‘तुळशीराम नगर’. शहराच्या बाहेर विकसित होणाऱ्या या वसाहतीत तुळस चांगलीच फोफावतांना दिसत होती. तिथून तोडलेली तुळस घरी आल्यावर आई धुवून, मोजून मग श्रीकृष्णाला वाहत असे. अशा वेळी विष्णू सहस्त्रनामाचा आधार घेतला जाई. अर्थात हे एका चातुर्मासात पूर्ण करणे शक्य नसायचे. काही वर्षं हे व्रत चालू राहायचे.

आमच्याकडे येणाऱ्या शिवजी बाप्पांनी (स्वाध्यायी) हे बघितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. तेव्हा ते निर्माल्य दिवसभर पाण्यात ठेवून त्याचे तीर्थ म्हणून प्राशन करावे व चहासाठी वापरावे असे त्यांनी सांगितले. तुळशीचे औषधी गुणधर्म सर्वश्रुत आहेच पण त्याबरोबर ते दल कृष्णनामाने संस्कारित होते.

'बिल्वपत्राची लाखोली’ - यासाठी लागणारे बिल्वपत्र मात्र आमच्या शेतात उपलब्ध होते. वडिल जेव्हा जेव्हा कुंडाण्याच्या शेतात जात तेव्हा तिथल्या सालदारांकडून बेलाच्या फांद्या तोडून घेत. कधी ही गडी-माणसे घरी येणार असतील तेव्हा पोतंभर बेल घेऊन येत. ‘ॐ नमः शिवाय’ ह्या मंत्राचा उच्चार करत महादेवाला एकेक बेलाचे पान आई वाहत असे. शेकडो पाना- फुलांखाली दबलेल्या देवाला बघून कधीतरी आम्ही आईला चेष्टेने म्हणत, 'अगं आई, देवांना श्वास घ्यायला तर जागा ठेव. बिचाऱ्यांचा जीव किती गुदमरत असणार! असो.

'गाईला सरकी खाऊ घालणे’- आमच्या लहानपणी मंदिरात येणाऱ्या जवळपास सर्वच बायका पोथी ऐकता ऐकता कापसापासून सूत काढत. आमची आई पण खूप छान सूत काढायची. बारीक व पक्के. सूत काढण्यासाठी कापसातून सरकी (बी) वेगळी करावी लागायची. या सरक्यांची लाखोली गाईला खाऊ घालण्याचे तिचे व्रत. आईच्या ह्या व्रताची सगळ्यांना माहिती असल्यामुळे आईला अनेकजणी सरकी आणून देत. आईची आई सुद्धा तिला आवर्जून सरकी पाठवायची. भूतदया ती हीच. आमच्या घरात गोगिरास काढण्याची पद्धत होती. गोगिरास म्हणजे तव्यावरची पहिली पोळी गाईसाठी तयार होई. त्यावर वरण-भात, भाजी वाढून ते गायीला खाऊ घालत. गायीलाही हे माहीत झालेलं असे. त्यामुळे ठराविक वेळी ती बरोबर दाराशी येत असे. ‘प्राणीमात्रावर दया करा’ हा शाळेतल्या फळ्यावरचा सुविचार घरी साकार होताना मी बघत असे.

पानं, फुलांव्यतिरिक्त आईने धान्याचीही पाच वर्ष लाखोली वाहिली आहे. तांदूळ, तीळ, जवस, मूग व हरभरा डाळ ही धान्ये त्यात होती. मला वाटतं श्रावण महिन्यातील सोमवारी शिवामूठ वाहतो त्या धान्याचा यात समावेश होता. धान्याचा एवढा बारीक दाणा मोजून वाहायचा म्हणजे कमाऽल. माझ्या लग्नानंतर आईने केलेली ही लाखोली.

याशिवाय १०८ प्रकारची १०८ फुलं तिने वेगवेगळ्या देवांना वाहिली आहेत.

अर्थात या व्रतपूर्तीसाठी कुटुंबातील सदस्यांइतकेच इतर सुहृदांचेही तितकेच योगदान होते हे विसरून चालणार नाही.

ह्या सर्व सामग्रीची वेळोवेळी केलेली मोजदाद आई एका कागदावर व्यवस्थित नोंदून ठेवत असे. आईचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झाले होते, परंतु ती लाखाच्या बेरजा करण्यात तरबेज होती. तिचे वाचनही दांडगे होते. त्यामुळे पोथ्या पुराणातील संदर्भ चांगलाच लक्षात राही. स्त्रीगीते, भक्तीगीते, जात्यावरच्या ओव्या, कानबाईची गाणी तिने तिच्या वह्यांमध्ये लिहून ठेवली आहेत. ती गाणी आजही तिला तोंडपाठ आहेत. परवाच नातसूनेला दोन डोहाळगीते ऐकवली.

या सगळ्या व्रतांतून मला ती नामजप करतांना दिसली. या लाखोली वाहण्याच्या व्रतांतून जवळजवळ दहा लक्ष नाम तिने जपले आहे. याशिवाय रोज एक माळ जपण्याची सवय ती वेगळीच.

खरं तर माझ्या खिडकीतून दोन पारिजातकाच्या फुलांचा सडा बघण्याचे भाग्य मला लाभले आहे. पण लाखोली वाहण्याचं साहस होत नाही. कधीतरी ती फुले वेचून आणली तरी एकदम देवाला अर्पण करते. आईइतका एकेक फूल वाहण्याचा patience (संयम) माझ्याजवळ अजिबात नाही. एकदा माझ्या टेरेसवरच्या तुळशीला खूप मंजिरी आल्या होत्या. त्या मात्र मी एकेक करून कृष्णाला वाहिल्या होत्या. देवाला श्वास घेता यावा यासाठी त्याचा चेहरा मोकळा ठेवायला विसरले नाही. त्या जांभळट गुलाबी कृष्णतुळशीत बसलेला माझा बाळकृष्ण खूपच सुंदर दिसत होता. त्याच्या गळ्यात जणू हिरव्या पानांची माला असल्याचा भास होत होता.

आजकाल अशी व्रत- वैकल्ये करणारी भक्तमंडळी दुरापास्त झाली आहेत. कधी कधी चातुर्मासात चप्पल न घालणारे, एक वेळ जेवणारे श्रद्धाळू बघावयास मिळतात.

परंतु आजची तरुण पिढी चातुर्मासात नाही तर नवीन वर्षात काही संकल्प करताना दिसते. त्याचे स्वरूपही बदलले आहे. रोज फिरायला जाणार, दैनंदिनी लिहिणार, जिमला जाणार, विशिष्ट डाएट करणार वगैरे वगैरे… हे संकल्प स्वतः पुरते सिमीत दिसतात आणि चार -आठ दिवसांत त्याची सांगता होताना दिसते.

मी सुद्धा २०२६ या नवीन वर्षात एक व्रत घेतले आहे. आईकडून वारसा मिळाला आहे ना! व्रताचं स्वरूप जरासं निराळं. देवी सरस्वतीची आराधना करताना ३० दिवस ३० लेख लिहिण्याचे. 'सुरपाखरांचा थवा’ या गटासमवेत. या गटात माझ्याबरोबर ४१ लोकांनी हे व्रत अंगिकारले आहेत. अक्षरयज्ञच म्हणा ना. महिनाभर रोज एका लेखाची समिधा त्यात आम्ही टाकत आहोत. आजचा लेख म्हणजे २८वी समिधा आहे. देवी सरस्वती हे व्रत पूर्ण करण्यास शक्ती, बुद्धी देत आहे. तिच्याप्रती मी आईसारखीच श्रद्धा बाळगून आहे. अशी श्रद्धा असली तरच घेतलेले व्रत सिद्धीस जाते हे सांगायला नकोच. त्याशिवाय आई-वडिलांचा आशीर्वाद व आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या शुभेच्छा पाठिशी आहेत.

त्यासाठी खूप खूप धन्यवाद. :folded_hands:

वंदना लोखंडे

पुणे

२८/०१/२०२६

सुरपाखरू #३०दिवस३०लेख प्रयोग२०२६