नमस्ते सदा वत्सले मातृभूमे! (कथा - भाग 2)

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे! (कथा - भाग 2)

भाग एक इथे वाचावा

गाडी फाटकातून आत घेताना ड्रायव्हरने त्याला आवाज दिला “साहेब आपण पोहचलो”…
त्याने मान वर उचलून काचेतून बघितलं,
सूर्यनमस्कार करतानाचे पुतळे बाउंड्रीला लावलेल्या हिरव्यागार मैदानाच्या बाजूने गाडी आत जात होती. इमारतीच्या मुख्य दाराजवळ ड्रायव्हरने गाडी थांबवली. धरमपाल वाट बघत उभाच होता.त्याने लगेच अदबीने गाडीचं दार उघडलं. “का हो धरमपाल? सब बढ़िया हावय?” गाडीतून उतरताना त्याने धरमपाल ला छत्तीसगढी भाषेत हालहवाल विचारले.
“आप मन के किरपा आय साब, पांव परथों” म्हणून धरमपाल नी त्याला वाकून नमस्कार केला.

“घोटुल मं सब ठीक-ठाक हावय का?”
(घोटुल मधे सगळं ठीक आहे?)

" जी साब, सब लइका-लइकी मन ला कल के कार्यक्रम बर तइयार करवा दीस"
(जी साहेब, सर्व मुला मुलींची उद्याच्या कार्यक्रम साठी तयारी करवून घेतली आहे)

" सोनबाई अउ ओकर परिवार सब ठीक हावय का?"
(सोनबाई आणि तिचा परिवार आता ठीक आहे का?)

“जी साब, वो मन घलो कल आहीं”
(जी साहेब ते लोकं पण उद्या येतील)

बोलता बोलता दोघेही त्याच्या खोली जवळ पोहचले. ड्रायव्हरने त्याचं सामान खोलीत ठेवलं. धरमपाल ने उद्याच्या गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमाचे डीटेल्स लिहिलेले कागद त्याला दिले आणि धरमपाल आणि ड्रायव्हर दोघेही गेले.
त्याने खिडकीतून बाहेर बघितले झेंडावंदनाची, सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि परेड ची
व्यवस्थित तयारी धरमपाल ने मैदानात करवून घेतली होती.
हे छत्तीसगड च्या बस्तर संभागातलं एक छोटसं आदिवासी गाव होतं. इथे आधी नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. ह्या सगळ्या आदिवासींना कधी फूस लावून कधी धमकावून नक्षलवादी, गिरोहात सामिल व्हायला लावायचे. पण श्रीधर ने आणि त्याच्या संस्थेने ह्या लोकांना त्यांचं भलं कशात आहे हे समजावून, त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या सोबत जंगलात राहून काम केलं. घोटुल हे आदिवासींच्या मुला मुलींना जीवनोपयोगी कला, त्यांच्या प्रथा शिकवण्याचं एक स्थान असतं. मुलं मुली 13,14 वर्षाचे झाले की घोटुल मधे राहायला जातात. सगळं शिकुन झालं की तिथेच आपले जीवनसाथी निवडतात आणि मग आई वडिल त्यांचं लग्न लावून देतात. ह्या नव्या पीढीला चांगले संस्कार आणि शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे हे श्रीधरने ओळखून त्यांना भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली 40 वर्षं सातत्याने प्रयत्न केला होता/करत होता. आता ह्या गावात एक शाळा, कॉलेज, छोटा दवाखाना आणि आदिवासींच्या घोटुल ला लागूनच हे श्रीधरच्या संस्थेचं मोठ्ठं मैदान असलेलं कार्यालय! इथे कुठल्याही गावकऱ्याला जी हवी ती मदत मिळायची. शेती चे नवनवीन प्रयोग, वेगवेगळे उद्योग शुरू करण्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, ट्रेनिंग दिल्या जाई.

त्याची ही संस्था संपूर्ण भारतात कार्यरत होती.भारतात तर होतंच परदेशांमधे देखिल त्याच्या कामांचं कौतुक होतं. परदेशी त्याच्या ह्या कार्याची पद्धत समजून घेण्यासाठी यायचे.
आदिवासींच्या उत्थानामुळे नक्षलवाद संपवण्यात शासनाला बरीच मदत होत होती.

उद्या माधवीला त्याने इथेच बोलावलं होतं. तिला आणि तिच्या सहकारी डॉक्टर्सना इथल्या गावांमधे वैद्यकीय क्षेत्रात काय करता येईल ह्याचा अभ्यास करायचा होता.

सकाळी झेंडावंदन, शाळा कॉलेजच्या मुलांची पीटी, परेड, घोटुलचा सांस्कृतिक कार्यक्रम सगळं श्रीधर, माधवी आणि तिच्या सोबत आलेल्या अमेरिकन डॉक्टर्स च्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. दुपारच्या जेवणात खास छत्तीसगढी प्रकार होते.. चौसेला, अंगाकर, फरा, आमट, चापडा, चिरपौटी, पपची, खीर असा सगळ्याचा आस्वाद घेऊन पाहुणे आपआपल्या खोलीत आराम करायला गेले. माधवीला घोटुल पण बघायचं होतं म्हणून धरमपाल ची वाट बघत श्रीधर आणि माधवी हॉल मधेच थांबले.

“कसा आहेस?” सकाळ पासून सगळे सोबत असल्याने दोघांमधे कामासंबधीच चर्चा झाल्या होत्या. आता दोघे निवांत आहेत बघून माधवीने हळव्या आवाजात विचारले.
“समाधानी!..मला समाजातले जे दुःख दिसत होते ते बऱ्यापैकी कमी झाले आहेत. अजूनही बरंच काम आहे ह्या क्षेत्रात, पण 40 वर्षापूर्वी जे चित्र होतं त्यापेक्षा आता खूप बदलली आहे परिस्थिती.”
“आधी पेक्षा खूप रोड झालास”
"भारतभर फिरावं लागतं बाई… वजनासोबत फिरणं तब्येतीला परवडणार नाही " म्हणून हसला…
" मध्यंतरी तुला बरं नाही कळलं होतं.दोन मोठी ऑपरेशन्स झालीत… आता काही त्रास नाही नं? "
" माझ्या मागे ही कामं आहेत तो पर्यंत मला काही होणार नाही गं… काळजी करू नकोस… तुझं सांग.. नवरा काय करतो? मुलं किती मोठी? काय करतात? "
ती फक्त हसली…
“काय झालं?” तिचं स्मित हास्य बघून त्याने विचारलं.

" काटे कुंपणे तोडून उडण्याचे बळ मला
अडकवू पहात नसशील तर सोबत चल…

आठवतं? तू पाठवलेल्या शेवटच्या पत्रात हे लिहिलं होतंस…तुला नं अडकवता तुझ्या सोबत चालले आहे… मी पण लग्न केलं नाही…समाजकार्यात झोकून दिलंय मी पण स्वतःला. फक्त भारतात थांबले नाही. इथे तुझ्या सोबत कार्य केलं असतं तर एकमेकात गुरफटण्याची भिती होती. तुला अडकवायचं नव्हतं म्हणून बोस्टनहून MSW ची डिग्री घेऊन तिथेच वैद्यकीय क्षेत्रात काम सुरू केलं… "

तिचे हे वाक्य ऐकून त्याला काय बोलावे सुचेना. किती मोठा त्याग केला होता तिने त्याच्या साठी…तिच्या पत्रात तिने जे लिहिलं होतं “माझं तुझ्यावरचं प्रेम जाणीवनेणीवेच्या पलीकडचं आहे” त्याचा अर्थ त्याला आत्ता कळला होता. त्याचा जीव कळवळला… पण तो त्याच्या प्रतिज्ञेनी बांधल्या गेला होता.बराच काळ निघून गेला होता त्याने तिची साधी विचारपूसही इतक्या वर्षात केली नव्हती. काही क्षण दोघेही शांत बसून होते.
" काका काकू कसे आहेत? " तिने शांतता तोडायचा प्रयत्न केला.
“दोघेही नाहीत”
“कधी?”
“बाबा चार वर्षा पुर्वी आणि आई गेल्या वर्षी…”
आधीच माधवी बद्दल कळल्याने हळवा झालेला श्रीधर आई वडिलांच्या आठवणीने अजूनच हळवा झाला.. त्याचे डोळे पाणावले… “आई गेली तेव्हा मी मणीपुरच्या जंगलांमधे होतो… ती अचानक सीरियस झाली आणि गेली… मी तिला भेटू सुद्धा शकलो नाही” म्हणत त्याने मान खाली घातली. दोन्ही तळवे डोळ्यांवर ठेवत त्याने अश्रू लपवायचा प्रयत्न केला.
तिने टेबलावरचा पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. ती कायच समजवू शकणार होती…असं आयुष्य त्याने स्वतःच निवडलं होतं. आज समाजाच्या तळागाळात त्याच्या कार्याच्या पाऊलखुणा होत्या… त्याच्या संस्थे अंतर्गत अनेक संस्था, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय क्षेत्रात कार्यरत होत्या किती तरी मोठ-मोठी हॉस्पिटल्स त्याने बांधली होती. पण समाजाच्या ह्या उत्थानात त्याने स्वतःच्या पारिवारिक जीवनाचा खूप मोठा त्याग केला होता. शेवटी तो ही माणूसच होता कधी तरी भावना उचंबळून येणं साहाजिकच होतं… त्याने पाणी पीलं आणि क्षणभर डोकं मागे टेकवलं. तीने फक्त शांत बसून त्याला साथ दिली. काही संवाद शब्दाशिवाय जास्त प्रभावी, बोलके असतात…
तितक्यात धरमपाल आला… “चलो साब” ऐकताच दोघेही उठून उभे झाले, आणि श्रीधर घोटुल कडे वळला… माधवीने पण त्याने दाखवलेल्या पायवाटे वर पावलं टाकली!

आज गणतंत्र दिवसाच्या सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा! भारतात दोन संस्था अश्या आहेत ज्यांचे कार्यकर्ता असेच तळागाळात जाऊन समाज उत्थानाचं कार्य निःस्वार्थपणे सतत करत राहतात. त्या संस्था आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिति ! त्यातही प्रचारक संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित करतात. आजची ही गोष्टं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि राष्ट्र सेविका समिति ला समर्पित आहे.

सई देशपांडे
26.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026

1 Like