नमस्ते सदा वत्सले मातृभूमे!

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे!

आकाशाच्या व्यापक निळाई चा ध्यास मला,
पंखात बळ असेल तर सोबत चल…

उत्तुंग शिखरांचं वेड मला,
रानसावली सोडू शकत असशील तर सोबत चल…

दरी खोऱ्यात स्वच्छंद गात फिरण्याचा नाद मला,
सखे सोबती सोडू शकत असशील तर सोबत चल…

मुसळधार पावसात भिजत उडण्याची जिद्द मला,
घरट्याची ऊब सोडू शकत असशील तर सोबत चल…

नदी सोबत उडून समुद्राच्या अथांगतेला अनुभवायचं उद्दिष्ट मला,
स्वत्व विसरू शकत असशील तर सोबत चल…

काटे कुंपणे तोडून उडण्याचे बळ मला
अडकवू पहात नसशील तर सोबत चल…

डायरी ची पानं चाळताना 40 वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता त्याच्या नजरेस पडली… त्याने तिला पाठवलेल्या शेवटच्या पत्रात ही कविता पाठवली होती…
दोघेही कॉलेज मधली सगळ्यांची आवडती नावं! श्रीधर आणि माधवी! अभ्यासात, सांस्कृतिक कार्यक्रमां मधे,खेळात, वादविवाद स्पर्धा असोत की एनसीसीचे कार्यक्रम असोत दोघेही नेहमी हिरीरीने भाग घ्यायचे. नॅशनल लेव्हल पर्यंत कॉलेज साठी बरीच पदकं, ट्रॉफीज त्यांनी जिंकून आणली होती… तो काळ त्याच्या नजरे समोर उभा राहिला… ती अतिशय नाजुक, अबोल, स्त्रीसुलभसौंदर्याने समृद्ध! तो तिच्या पूर्ण पणे उलट.. तितकाच फटकळ, रांगडा, मस्ती करण्याच्या सगळ्या सीमा गाठणारा. अर्थात सीमे पलीकडे जात नसे कारण त्यावर घरचे मिडल क्लास पठडीतले पण मजबूत संस्कार होते. तो ज्याही क्षेत्रात कार्य करायचा त्यात स्वतःला झोकून देणे ही त्याची जगण्याची पद्धत होती…
आज तिचा चाळीस वर्षांनंतर फोन आला… ती भारतात येणार होती आणि काही कामाने ह्याची तिला भेट घ्यायची होती…पण आज त्याच्या मनात त्या कॉलेज च्या दिवसातल्या भावनांचा लवलेश ही नव्हता… ‘किती बदललो मी!’ त्याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं…
तो दिवस त्याला अजूनही स्पष्ट पणे आठवत होता ज्या दिवशी त्याने देशप्रेमाखातर पूर्ण पणे समाजकार्या साठी स्वतःला झोकून देण्याची प्रतिज्ञा घेतली.
आई वर त्याचं अतूट प्रेम होतं… तिनी किती समजावलं, बाबांनी त्याचा निर्णय बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करून बघितला पण व्यर्थ… माधवीच्या मनातल्या भावना देखिल त्याला कळत होत्या पण त्याने नेहमी तिच्या कडे दुर्लक्षच केलं कारण त्याला संसार थाटायचाच नव्हता. शेवटी माधवीनेच एक दिवस पत्रात मनातलं लिहून पाठवलं त्यावर त्याने ही कविता तिला उत्तर म्हणून पाठवली आणि तिच्या लक्षात आलं हे प्रकरणच काही वेगळं आहे. त्या नंतर मात्र तिने कधीच त्याला कॉन्टॅक्ट केला नाही.
'आज 40 वर्षांनंतर असं काय काम पडलं असेल तिला? ’ ह्या विचारातच त्याने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली.
सूर्य पश्चिमेला झुकला होता… रम्य संध्याकाळ होती… जसजशी गाडी पुढे जात होती, आसपासची झाडं दाट दाट होत होती… चारी कडे उंचं डोंगरं, खोल दऱ्या दिसायला लागल्या होत्या…

तो कुठे जात होता?
श्रीधर कुठलं समाजकार्य करत होता?
माधवी ला काय काम होतं?
जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग वाचायला विसरू नका.

वाचा भाग दोन

सई देशपांडे
25.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026