सक्षम की अपंग, अपंग की सक्षम ?
आजूबाजूला वावरणाऱ्या सक्षम लोकांमध्ये बऱ्याचदा अपंग व्यक्ती बघायला मिळतात. शरीर अपंग असले तरी मनाने ते खूप सक्षम असतात याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. याउलट सक्षम लोकांमध्ये कित्येकदा अपंगत्व बघायला मिळते. अशाच काही अनुभवांचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयत्न.
आमच्यासमोर राहणाऱ्या मनीषाचा भाचा जन्मांध होता. सुशिक्षित पालकांनी त्याला उच्च शिक्षण देऊन पायावर उभे केले. बसने एकटाच प्रवास करून कॉलेजला जात असे. अशावेळी पैशांच्या देवाणघेवाणीत बऱ्याच वेळा सक्षम लोक त्याची फसवणूक करत.
तळमजल्यावर राहणारा विनयचा पुतण्या. गणेशोत्सवातील त्याचे धृपद गायन ऐकून कान तृप्त झाले. अंध मुलाची ही कला ऐकून अचंबित झाले. शारीरिक वैगुण्यावर मात करत कसं काय आत्मसात केले असेल हे अवघड ज्ञान? आज त्याला उत्कृष्ट धृपदगायकीचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्याचा फार फार अभिमान वाटला. असं म्हणतात त्यांचा sixth sense विकसित झालेला असतो. ते काहीही असो पण त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे कष्ट अमर्याद असतात हे नक्की.
एक बॅंकेत नोकरी करणारी अंध मुलगी. आई- वडिलांनी एका होतकरू वाटणाऱ्या गरीब मुलाशी तिचा विवाह करून संसार थाटून दिला. पण छे! चार सहा महिन्यांतच मुलगी घरी आली. त्याला घरात बसून तिचा पगार हवा होता व सासूला घरकाम करणारी नोकरदार सून. का सहन करावं हे?
एकदा सोसायटीच्या आवारातच माझी गाडी सुरू होत नव्हती. प्रयत्न करून दमले. जवळून जाणाऱ्या एका तरुणाला गाडी चालू करून देण्यासाठी विनविले. परंतु तो जरासा आढ्यतेने ‘वेळ नाही’ म्हणत निघून गेला. या उलट एकदा रस्त्यात माझी गाडी बंद पडली म्हणून जवळच्या गॅरेजमध्ये नेली. तिथला कामगार गाडीजवळ येऊ लागला तेव्हा त्याचे अपंगत्व माझ्या लक्षात आले. परंतु त्याने क्षणात माझी गाडी चालू करून दिली. एका सक्षम व्यक्तीला अपंग व्यक्तीने केलेली ही मदत लक्षणीय आहे.
दुसरा अनुभव अगदी ताजा ताजा आहे. किराणा मालाच्या दुकानात खरेदीसाठी गेले होते तेव्हाचा. तिथे सामानाची ठेव-घेव करणाऱ्या अपंग तरुणाकडे बघून त्याच्या विषयी मनात करुणा उत्पन्न झाली. दोन्ही पाय फाकवत, वेडे-वाकडे टाकत, आपला तोल सांभाळत चालणारा हा तरुण येणाऱ्या ग्राहकाची मागणी पुरवत होता. एका वेळी तीन चार ग्राहकांना सेवा देत होता. परंतु तो सक्षम दुकानदार काउंटरवर बसून त्याच्यावर मालकी हक्क दाखवत अगदी कठोर शब्दात हुकूम सोडत होता. मालकाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी त्या तरुणाची जी धांदल उडत होती ते बघून मला कसेसेच वाटले. त्याला काम देऊन खूप मोठे उपकार केले आहेत अशी त्या दुकानदाराची भावना बघून मला त्याचा प्रचंड राग आला. माझी खरेदी पूर्ण झाली. सामानाने तीन-चार पिशव्या भरल्या. त्या गाडीपर्यंत पोहोचवून देण्यासाठी मदतनीस मिळेल का असे विचारता मालकाने अपंग तरुणालाच बोलावले. खरं तर त्या दुकानात अजून दोन-तीन मदतनीस होते. तो अपंग तरुण सामानाचे छोटेसे पोते घेऊन माझ्या गाडीजवळ आला. ते पाहून पुन्हा माझा जीव कळवळला. मी त्याला विचारले, ‘तुम्हाला चालताना खूप त्रास होत असेल ना?’. हळू आवाजात नाही म्हणत पुन्हा पिशव्या आणण्यासाठी वळला. तेवढ्यात मी धावतच दुकानात शिरले व उरलेल्या दोन पिशव्या घेऊन परत आले. तेव्हा त्याची नजर बरेच काही बोलून गेली. खरंच या अपंग लोकांकडून काम करून घेताना त्यांच्यावर दया दाखवू नका परंतु थोडे तरी ममत्व ठेवा.
या उलट एक अनुभव. सक्षम तरुणाचा. औंध परिसरात खरेदी करण्यासाठी गेले होते. कपडे खरेदी झाली व शेजारच्या चाट भांडारपाशी थांबले. पाणीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. तिथे जाऊन पाणीपुरीची मागणी करत नाही, तोच बाजूला एक तरुण येऊन उभा राहिला. त्याच्या जवळच्या प्लास्टिकच्या पिशव्या मी विकत घ्याव्या यासाठी आग्रह करू लागला. परंतु मला त्याची गरज नव्हती म्हणून मी ते टाळले. परंतु तो हलेचना. आपण खात असताना तो अधाशीपणे आशाळभूत नजरेने बघत राहील म्हणून यांनी त्याच्याकडून पिशव्या विकत घेण्याचे ठरवले. तो भीक न मागता कष्ट करतो हा विचार त्यांनी बोलून दाखवला व त्याच्याजवळ गेले. माझी पाणीपुरी खाऊन झाली तर हे कॅश काऊंटर जवळ पैसे देताना दिसले. पिशवी खरेदी झालीच नव्हती. चौकशी केली तेव्हा कळले, त्या तरुणाने ‘मी उपाशी आहे, मला काहीतरी खायला द्या’. अशी इच्छा व्यक्त केली होती. खरंच एवढे धडधाकड, सक्षम लोक जेव्हा पोटाची भूक भागवण्यासाठी हात पसरतात तेव्हा त्यांची कीव कराविशी वाटते. अपंग असूनही मोठ्या कष्टाने पोट भरणाऱ्या त्या दुकानातल्या तरुणाची आठवण झाली.
मध्यंतरी एका सुहृदांकडे जाण्याचा योग आला. त्या काकांचे ८८+ व काकू ८०+ च्या आसपास. दोघेही थकलेले. खूप वर्ष परदेशात राहिलेले. परंतु आई थकल्यावर बहिणींची काळजी घेण्यासाठी पुण्यात परत आले. दोघी बहिणी मूक-बधिर ८०+ वयाच्या होत्या. मूक बधिर असल्या तरी खूप हुशार. दोघी नोकरी करणाऱ्या. एक तर चित्रकलेची शिक्षिका होती. दिवाणखान्यातील भिंतीवरचे चित्र तिच्या उत्तम कलेची ग्वाही देत होते. मोठी बहीण घरात पडल्यामुळे तिला कमरेला फ्रॅक्चर झाल्यामुळे बेडवर पडून तर दुसरी उच्च रक्तदाबाने त्रस्त. तिला काका दवाखान्यात घेऊन गेलेले. नव्वदीच्या उंबरठ्यावर उभे असलेले काका व त्यांना साथ देणाऱ्या काकू.. मूक बधिर बहिणींची काळजी घेत होत्या हे बघून गलबलून आले. किती सक्षम, कर्तव्यनिष्ठ आहे ना आधीची पिढी ! परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द म्हणावी की मजबुरी? हा प्रश्न नकळत मनात डोकावून गेला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला साष्टांग नमन करावेसे वाटले व त्यांच्याविषयीचा आदर दुणावला.
याउलट काहीही न करता विनासायास मिळालेल्या वडिलोपार्जित संपत्तीवर ऐष करणारे असंख्य महाभाग पाहायला मिळतात. किरकोळ दुखण्याचा मोठा बाऊ करून इतरांकडून सेवेची अपेक्षा ठेवणारेही पावलोपावली दिसतात. काही घरात तर बायकोकडून सगळं हातात मिळाले पाहिजे असे सक्षम परंतु अपंग मनोवृत्तीचे नवरे पाहायला मिळतात. अशा वेळी कोणाला अपंग म्हणावे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. बदलत चाललेली अपंगत्वाची व्याख्या बघून मन व्यथित होणारच ना ?
वंदना लोखंडे
पुणे
२४/०१/२०२६