दुचाकी ते चारचाकी : एक रम्य प्रवास
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ ‘मीना चंदावरकर’ यांनी आपल्या ‘उमलती मुले’ या पुस्तकात म्हटले आहे की, ‘ज्यांना झाडं, मोकळी जागा, अंगणं नसतात त्यांनी आपल्या २/४ वर्षाच्या मुलांसाठी महाग असली तरी तीनचाकी सायकल अवश्य घ्यावी. त्यांनी येणारी मजा व शारीरिक विकास अतुलनीय आहे’.
मला लहानपणी तीनचाकी सायकल मिळाली नव्हती. परंतु शालेय जीवनात दुचाकी सायकल मिळाली होती बरं का! भावंडांच्या मदतीने ती चालवायची कशी याचे प्रशिक्षण घेतले. एकदा शिकत असताना खड्डा पाहून ब्रेक दाबावा हे न सुचल्यामुळे सायकल उधळली. हँडलवरचे हात सुटले, पायडलवरचे पायही सुटले आणि भर चौकात जोरदार आपटले. दोन्ही पायांचे गुडघे व दोन्ही कोपरे चांगलेच खरचटले. ३/४ दिवस लंगडत चालल्याचे आठवते. असं म्हणतात, ‘पडल्याशिवाय सायकल शिकता येत नाही’. अशाप्रकारे माझ्यातला सायकल स्वार घडला.
इयत्ता पाचवीत घरापासून दूरदूरच्या शाळेत मी एकटी चालत जात असे. तीन वर्षे गेली. त्याकाळी जेन्टस सायकलीची दांडी कापून लेडीज सायकल केली जाई. आठवीत असताना वडिलांनी मला अशी सायकल उपलब्ध करून दिली. घर ते शाळा हा प्रवास थोडा सोयीचा झाला. परंतु सायकल नवीन दिसत असली तरी ती मुळात जुनीच असल्यामुळे वारंवार तिची देखभाल करावी लागे. अचानक कधी रुसून बसे. साहजिकच शाळेत जायला उशीर होई. उशीर झाला तर हातावर छडीचा प्रसाद मिळायचाच. पुढे दहावीच्या परीक्षेत छान दिवे लावले म्हणून वडिलांनी खुश होऊन नवी कोरी लेडीज सायकल घेऊन दिली. ही सायकल इतकी भन्नाट चालायची की अकरावीत असताना मला वार्षिक स्नेहसंमेलनात फिश-पॉंड मिळाला होता, ‘सुपर एक्सप्रेस डेपो फ्रॉम जयहिंद कॉलेज टू जुने धुळे’. अशी ही सायकल.
त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. एकदा माझी सायकल नादुरुस्त असल्याने बाकावरच्या शेजारच्या मैत्रिणीला विचारले, ‘मला घरी सोडतेस का’? तिच्या घराच्या रस्त्यावरच माझं घर होतं आणि तिची ‘लुना’ होती. तेव्हा ती म्हणाली, ‘मला डबल सीट घेता येत नाही. तुला घेता येत असेल तर घे’. मग काय अस्मादिकांनी लुनाचा ताबा घेतला. ब्रेक व एक्सिलेटरचं तंत्र समजून घेतलं आणि निघाली स्वारी घरी जायला. तेव्हापासून सवयच पडली. ती रोज मला घ्यायला यायची. मी तिला डबल सीट घेऊन कॉलेजला जाणार. मग मी कॉलेजपासून घरापर्यंत चालवत येणार. मला घरी सोडून ती पुढे तिच्या घरी जाणार. यामुळे आमची मैत्री दृढ झाली.
एकदा शेतामध्ये राजदूत चालवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात सातत्य राहिले नाही. गिअरची गाडी थोडी कठीणच होती.
लग्न झाल्यावर पुण्यात आले. तेव्हा नवऱ्याची टीव्हीएस फिफ्टी होती. ती चालवल्याचे आठवत नाही. मुली के.जी.त असताना अचानक रिक्षांनी बेमुदत संप पुकारला. तेव्हा मुलींना शाळेत पाठवताना तारांबळ उडत होती. ऑफिसला जाताना हे सोडायचे परंतु आणण्यासाठी मी बसचा वापर करत होते. बरीच ससेहोलपट होत होती. त्या गैरसोयीतून दुचाकी घेण्याचा विचार मनात आला आणि टीव्हीएस स्कुटी घेतली. कुमारवयात लुना चालविण्याचा अनुभव असल्याने स्कुटी सहज चालवू लागले. परवाना नसतानाही मुलींना शाळेत, गायन क्लास, खेळण्याच्या मैदानावर ने-आण करण्याची जबाबदारी पार पाडू लागले. त्याच दरम्यान नवऱ्याचे छोटेसे ऑपरेशन झाले. कोथरूडहून वाकडेवाडीला बिनदिक्कत जाऊन येऊ शकत होते. एव्हाना मी रितसर परवाना घेतला होता.
नंतरच्या काळात मी कृत्रिम फुलं बनवण्याचा छंद जोपासत होते. त्याच दरम्यान नवऱ्याची साताऱ्याला बदली झाली. फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी एकटीलाच गर्दीतून वाट काढत वारंवार रविवार पेठेत जावे लागे. मुलींना शाळेत सोडले की तशीच पुढे निघायची. गाडीत पेट्रोल व गाठीला पैसे असले की मी एकटीही बिनधास्त फिरू शकते हा आत्मविश्वास गाडीने दिला. मला आठवतं माझ्या मैत्रिणीचा नवरा नोकरीनिमित्त परदेशी गेला होता. त्यावेळची तिची मनोवस्था बघून डॉक्टरांनी तिला गाडी चालवण्याचा सल्ला दिला होता. गाडी चालविण्याने आत्मविश्वास वाढेल असे तिला सांगितले. परंतु तिने ते मनावर घेतले नाही.
एकदा तुळशीबागेत खरेदीसाठी जायचे होते. माझ्या पाठीमागे पुतणी व नवऱ्यासोबत दोघी मुली अशी आमची यात्रा निघाली. परतताना पाऊस भरून आला. पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. मी जरा घाईनेच निघाले. अचानक स्कुटीचा तोल गेला आणि घसरून जोरात आपटले. माझ्या मागे येणाऱ्या गाड्यांची तीच अवस्था. एक दोन तीन… लोकांच्या मदतीने उठून उभी राहिले. गाडीला उभे केले. तोपर्यंत ह्यांची गाडी आली. आश्चर्य म्हणजे मागच्या चौकात त्यांच्यावर तीच परिस्थिती ओढवली होती. त्यांच्याबरोबर इतर गाड्यांची तीच दैना झाली होती. शिवजयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर ठिकठिकाणी थांबत होती. तरुण मंडळी नाचत होती. शिवाजी महाराजांना घेऊन जाणाऱ्या वाहनातून तेल गळत होते. त्यावर पावसाच्या पाण्याचे थेंब पडले. त्यामुळे त्यावरून चालणारी वाहने घसरून लोटांगण घालत होती. स्कुटीवरून जातानाची एक दोन वेळा झालेली किरकोळ दुखापत सोडली तर गाडीने मला उत्तम साथ दिली. आम्ही गमतीने तिला ‘धन्नो’ नाव दिले होते. शोले चित्रपटातील बसंतीप्रमाणे ‘चल मेरी धन्नो’ असे म्हणत तिच्यावर टुणकन स्वार होत अनेक वर्षे प्रवास केला.
आता माझ्याबरोबर गाडीचंही वय झालं होतं. मुलींसाठी स्वतंत्र गाड्या होत्या. गाडींच्या ताफ्यात चारचाकी तर कधीचीच दाखल झाली होती. परंतु ती चालवण्याचे धाडस केले नव्हते. आरामात नवऱ्याशेजारी बसून मैलोनमैल प्रवास करत होते. हे सुख अनुभवत असताना खूप वर्षांनी नवऱ्याला पदोन्नती मिळाली व जळगावातील एरंडोल या गावी ते रुजू झाले. त्या काळात चारचाकी मोठ्या आशेने माझ्याकडे पहात होती. कधी मी तिला बाहेर काढते याची. मी ही तिचे ऐकले आणि ड्रायव्हिंग स्कूलला प्रवेश घेतला. गाडी शिकण्यासाठीचा परवाना मिळाला. प्रशिक्षण चालू झाले. कायमस्वरुपी परवाना काढण्याची वेळ आली. परंतु आपल्याला अजून सराव आवश्यक आहे असे वाटून मी माघार घेतली व गाडी चालवण्याला खीळ बसली. नंतर यांच्या मदतीने कधी कधी विद्यापीठात जाऊन सराव करत होते. क्लच, गिअर, ब्रेक व एक्सिलेटर यांच्याशी सांगड घालताना कस लागत होता. एकदा भर चौकात गर्दी पाहून कच खाल्ला व तिथेच गाडीतून पायउतार झाले. त्यानंतर स्टेंअरीग काही हातात घेतले नाही.
जवळ जवळ दहा वर्षाचा काळ लोटला. मी सहा महिन्यांसाठी परदेशात गेले. तिकडून आल्यावर लक्षात आले की आपल्या दुचाकी चालवण्याच्या परवान्याची मुदत संपली आहे. मग त्याच्या नुतनीकरणासाठी आर.टी.ओ. ऑफिसला गेलो. तेव्हा नवऱ्याने चारचाकी गाडी चालवण्याचा परवाना पण घे असा आग्रह धरला. लेक परदेशात गेल्यामुळे लेकीची चारचाकी तशीच पडून होती. तिलाही फिरायला न्यावे या हेतूने मी गाडी शिकण्याचे मनावर घेतले. दहा वर्षांपूर्वी प्रशिक्षण घेतले होतेच. पुन्हा विद्यापीठात मुख्य इमारतीच्या समोरच्या मैदानावर नवऱ्यासोबत मी सराव चालू केला. दोन दिवस व्यवस्थित चाललंय. तिसऱ्या दिवशी मात्र तिथल्या महिला रखवालदाराने मनाई केली. तिने चक्क हाकलून लावले. गाडी शिकण्याचा मनोदय अपूर्ण राहील की काय असे वाटू लागले. शिकाऊ परवाना संपायला केवळ महिना राहिला होता. खडबडून जागी झाले. परवाना काढण्यासाठी एजंटला बरेच पैसे मोजले होते. ते वाया जायला नको म्हणून पुन्हा गाडी चालवण्यास प्रवृत्त झाले. यावेळी मात्र गिअरची गाडी न घेता स्वयंचलित वाहनास पसंती दिली. या गाडीत क्लच, गिअर ही भानगडच नव्हती. फक्त ब्रेक व एक्सिलेटर. अगदी ‘धन्नो’ प्रमाणेच. धन्नो चालवण्याचा जवळ जवळ २५ वर्षाचा अनुभव होता. त्यामुळे ही गाडी चालवण्यास आत्मविश्वास आला. रोज जेवण झाल्यावर वामकुक्षीला तिलांजली देत सराव चालू केला. सुरूवातीला विद्यापीठात ३/४ दिवस चालवल्यावर मुख्य रस्त्यावर आले. दुपारी, रात्री, कमी गर्दीत वेगवेगळ्या रस्त्यांवर न कचरता धावू लागले. आता कायमस्वरूपी परवाना मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडून कधी बोलावणे येते या प्रतिक्षेत आहे.
वंदना लोखंडे
पुणे
७ जानेवारी २०२६
