ताडोबा: जंगल भ्रमंती रात्रीची
पक्षी बघायला अनेक स्थळांना भेटी दिल्या आहेत. आता प्राणी बघण्याची उत्सुकता होती. तो ही वाघोबा. मग काय ताडोबाला जायचे ठरवले. यांच्या मित्राच्या ओळखीच्या एका ग्रुपसोबत दिवाळीनंतर जायचे ठरवले. पैसेही भरले.
ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सापडलो. या दिव्यातून बाहेर पडलो आणि नाही नाही म्हणत असताना यांच्या आग्रहाखातर ताडोबाची वाट धरली. विमान प्रवास करून नागपूर गाठले. तिथून पुढे कारने ताडोबाला पोहोचलो.
आराम करून पहिल्या जंगल सफारीला निघालो. एका पाणवठ्यावर ‘छोटी तारा’ व तिची ‘बच्ची’ अंग स्वच्छ करताना दिसले.
खूप वर्षांपूर्वी हे रणथंबोरला गेले होते आणि वाघ न बघताच परतले होते. तो अनुभव बघता इथे ताडोबाच्या अभयारण्यातील पहिल्याच सफरीत वाघोबाचे दर्शन… दिल खुश हो गया. दुसऱ्या दिवशी दिसली ताडोबा अभयारण्याची महाराणी ‘माया’ वाघीण. अगदी आमच्या पुढ्यातून गेली. Territory marking (सीमा आखणी) करताना दिसली. तिला पाहताच मनात थोडी भीति दाटली. कारण आठच दिवसांपूर्वी तिने एका स्त्री वनकर्मचाऱ्यावर हल्ला केला होता आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता, अशा बातम्या वृत्तपत्रात झळकत होत्या. खरं पाहिलं तर अशी कुठल्याही प्रकारची हिंसकता तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली नाही. तिची बछडं ज्या वाटेवर खेळत होती त्या वाटेवर त्या स्त्री वनकर्मचारीला पाहून आपल्या बाळांना ही इजा करेल या भीतीने तिने तिच्यावर तो हल्ला केला होता. मात्र पिलांवरील मायेमुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली ‘माया’ वाघीण बदनाम झाली. आम्ही मात्र नशीबवान. आम्हाला तर तिचे तीन वेळा अगदी जवळून मनसोक्त दर्शन झाले. एकदा तर full headon मिळाला. आमच्या गाडीच्या मागे मागे ती चालत होती. पाच पंचवीस गाड्यांच्या गराड्यात. 'अजब ही माया!’
त्यानंतरच्या सफारीत लहान 'मोगली’चे ‘एम वन’ व ‘एम टू’ बछडे वामकुक्षी घेताना दिसले. त्यांच्या घरात आमचे स्वागत आहे असे म्हणत त्यातल्या एकाने तर आमच्या (८/१० जीपचा ताफा) अगदी शेजारून जाण्याचे साहस दाखवले. दुसऱ्या दिवशी दूर कुरणात ‘बबली’ उभी होती. नाश्ता करण्यासाठी गवे, सांबर यांची वाट बघत. परंतु ते बदमाश पसार झाले आणि बिचारी ‘बबली’ उपाशीच राहिली. जंगलात चरणाऱ्या गुरांवर बांबूवनात लपून बसलेला वाघोबाही पाहिला. ‘दडियाल’ व ‘कोटपाटील’ यांचा तो लाडला असल्याचे कळले. हरिण आणि चौसिंगे आम्हाला बघून भेदरले. आम्ही त्यांची छवि टिपण्याच्या आत त्यांनी धूम ठोकली. नाही म्हटले तरी ‘नीलगाय’ नि ‘अस्वल’ यांनी क्षणिक दर्शन दिले. मात्र आजकाल आपल्या पुणे शहरात व गावोगावी धुडगूस घालणारा ‘बिबट्या’ काही दिसला नाही. त्याने आमची निराशाच केली.
सात व्याघ्र दर्शनाचे पुण्य पदरात पडले होते. तरीही रात्रीचे जंगल पाहण्याची मनीषा बाकी होती . आमच्या सहलीत त्याचे नियोजन नव्हते, तरी ऐनवेळी प्रत्येकी तीन हजार रुपये भरून रात्रीची सफारी बुक केली.
दुपारची सफारी आटोपून जंगलातून बाहेर यायला आम्हाला संध्याकाळ झाली. हॉटेलवर न जाता आम्ही लगोलग प्रवेशद्वाराजवळच दुसऱ्या जीपमध्ये बसत नाही तोच निरोप आला, ‘वाघ आला, वाघ आला’. परंतु फ्रेश होण्यासाठी गेलेल्या सहप्रवाशाची वाट बघत बसल्यामुळे थोडा उशीर झाला आणि वाघोबाच्या भेटीचा योग टळला. जंगलात प्रवेश केल्यावर त्याच्या एका नजरभेटीसाठी जंग जंग पछाडले परंतु त्याने गुंगारा दिला. मला या गाईड लोकांचे कौतुक वाटते, पावलांच्या ठशावरून ते त्याचा माग काढतात. बराच वेळ जंगलाची अंधारी वाट तुडवून आमची गाडी एका तळ्याजवळ येऊन पोहोचली. पाणी प्यायला कोणी तरी येईल ही आशा. पण छे! कोणीही तहानलेले नव्हते. मात्र आकाशातला चंद्र आमचे स्वागत करत होता. त्याचे शुभ्र तेजस्वी रूप बघून त्याच्या प्रेमातच पडले. तो ही आमच्या प्रेमात पडला म्हणून की काय अलगद तळ्यात उतरला. त्याला वर बघू की खाली बघू या संभ्रमात असतानाच गाडीवानाने गाडी सुरू केली. दुपारी हिरव्या चैतन्याने भरलेलं हे जंगल रात्री काहीसं गूढ अनामिक शांततेत वावरत होतं. नाही म्हटलं तरी रातकिड्यांची किर्र दूर कुठे तरी ऐकायला येत होती. चंद्रप्रकाशाच्या कवडशात जंगल लोभस दिसत असलं तरीही भयावह भासत होतं.
आता वेध लागले होते निशाचर पक्ष्यांचे.
एका झाडाखाली ३/४ च्या घोळक्याने ‘Thick -nee’ बसलेले दिसले. जाड गुडघ्याचे व मोठ्या डोळ्याचे हे पक्षी मातीच्या रंगाशी साधर्म्य राखतात. त्यामुळे गाईडने दाखवल्यावरही नजर त्यांना शोधत होती. सर्व साधारणपणे जमिनीवर बसलेला ‘रातवा’ मात्र झाडावर बसलेला दिसला. बॅटरीच्या झोतात त्याची छबी पाहायला मिळाली. लक्ष्मीचे वाहन असलेल्या घुबडाचा शोध घेत होतो. परंतु ते ही गवसले नाही. बहुधा लक्ष्मीच्या सेवेसी गेले असावे.
नुकतीच रात्र उदयास येत असल्यामुळे असेल कदाचित जंगलास तेवढी जाग नव्हती. दूर कुठे तरी गाडीच्या प्रकाशात झर्रकन धावणारे ससे तर दूर पानोळ्यात लकाकणारे हरणांचे निरागस डोळे दृष्टीस पडत होते.
दिवसभराचा थकवा डोळ्यांवर येत होता. कॅमेराचाही डोळा असहकार नोंदवत होता. त्यामुळे सर्वानुमते परतीची वाट धरली.
परतीच्या वाटेवर ठिक-ठिकाणी बांबूच्या मोळ्या बांधून पडलेल्या दिसत होत्या. त्यांची विक्री होते असे गाईडकडून कळले. अधिकृत वा अनधिकृत या भानगडीत न पडता आम्ही जंगलाची वेस ओलांडून बाहेर पडलो. जंगलाविषयीचे न उकललेले गूढ सोबत घेऊन.
वंदना लोखंडे
पुणे
२३/०१/२०२६
सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६
_________________________
