मुले व मोबाईल
‘ठेव तो मोबाईल. एकदा सांगितलेलं कळत नाही का? का देऊ दोन रट्टे?’
असे संवाद घराघरांतून आपल्याला ऐकायला मिळतात. आयांचा हा वैतागलेला सूर खरोखरच खूप चिंतेचा विषय आहे.
पण या मुलांच्या हातात मोबाईल दिला कुणी ? आपणच ना. एखादं खेळणं हातात सोपवावं इतक्या सहजतेने हा मोबाईल दिला.
आई-वडिल मुलांसाठी आदर्श असतात म्हणूनच मुले त्यांचे अनुकरण करतात. कामानिमित्त निरोपाची देवाण घेवाण करण्यासाठी सतत आपल्या हातात मोबाईल असतो. आपण मोबाईलवर काय बोलतो, कसे बोलतो, कशा पद्धतीने बोलतो, याचे बारीक निरीक्षण मुले करतात. त्यामुळे अगदी वर्षाच्या मुलांना सुद्धा मोबाईलची भुरळ पडते.
आई-वडिलांची नक्कल करत मुले मोबाईल कानाला लावून बोबड्या भाषेत बोलतात, तेव्हा आपल्याला फार अप्रूप वाटते. अशावेळी आप्त-मित्रांजवळ त्यांचे कौतुक करण्यास आपण थकत नाही. हे कौतुक ऐकून साहजिकच आपण काही तरी खास केल्याचे मुलांच्या मनावर ठसते.
नोकरदार आई वडील सकाळी ऑफिसला जाताना मुलांना शाळेत सोडतात. तिथून परस्पर ते मूल पाळणाघरात जाते. दिवसभराच्या दगदगीने कातावलेले आई-वडील संध्याकाळी मुलांना घेऊन घरी येतात. त्यांची उर्जा संपलेली असते तर मुलांची उर्जा दुप्पट झालेली असते.
दिवसभरात शाळेत काय काय घडले हे सांगण्याची त्यांना उत्सुकता असते तर पालकांना उद्याच्या कामाचे नियोजन करायचे असते. दुर्दैव असे की आपल्याला त्यांची बडबड निरर्थक वाटते. अशावेळी आपल्याला विसावा मिळावा म्हणून नाईलाजाने का होईना त्यांच्या हातात मोबाईल सोपवून, ‘घे हा मोबाईल आणि बस जरा शांत. आम्हालाही जरा सुखाने बसू दे’, असे म्हणत आपणही टी. व्ही.चा रिमोट हातात घेतो.
आजकाल हॉटेलमध्ये जेवायला गेलो अन् आजूबाजूला नजर टाकली तर कित्येक टेबलावर आई-बाबा मित्र परिवारासहित गप्पांमध्ये गुंग असतात आणि मुले कोको मिलान किंवा तत्सम कार्टून बघण्यात, गेम खेळण्यात मग्न असतात. खरं तर आपण मुलांना आपल्या गप्पांमधे सहभागी करून घेतले तर समाजात मिसळण्याचे बाळकडू त्यांना मिळेल हेच आपण विसरलो आहोत.
काही टेबलांवर त्रिकोणी कुटुंबातील आया मोबाईलवर कार्टून बघण्यात गुंग असणाऱ्या मुलांना भरवत असतात. जेवण म्हणजे ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हा एकेकाळी आपल्या आईवडिलांनी दिलेला संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देण्यास असमर्थ ठरत आहोत का?
पूर्वीच्या काळी दिवेलागणीला आजी-आजोबा ‘शुभं करोतु कल्याणम्’ हा आरोग्य मंत्र देताना गणिताचे पाढे पाठ करून घेत. रामरक्षा, गीतेचे अध्याय पाठ करून घेत. संस्कारक्षम गोष्टी सांगत. आजच्या कुटुंबातील आजी-आजोबा संध्याकाळी दूरदर्शनवरील लावालाव करणाऱ्या कौटुंबिक मालिकांमध्ये रममाण झालेले असतात. त्यांनाही नातवंडांची लुडबूड नको असते. स्वतःची स्पेस राखण्याच्या नादात कुटुंबातील आपली महत्त्वाची स्पेस ते हरवून बसतात.
अशावेळी मुलांना आपलेसे करतो तो मोबाईल. कार्टूनचे जग त्याला खुणावते. भरपूर जोश व उत्साह असणाऱ्या animated film च्या ते जाळ्यात ओढले जातात. परिणामी मुलांचा आपल्याशी संवाद कमी होतो. ते आपल्यापासून दुरावत चालले हे आपल्या लक्षातही येत नाही. ही मुले मोबाईच्या आभासी जगात इतकी समरस होतात की वास्तवात आपल्याशी कोणी संवाद साधतंय याचे त्यांना भान नसते. किंबहुना हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. अशावेळी त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेतला तर प्रचंड चिडचिड होते. हातपाय आपटतात. आक्रस्ताळेपणाने वागतात. घर डोक्यावर घेतात. मग अशा वेळी नकोच ती कटकट म्हणून आपण पुन्हा त्यांच्या हातात मोबाईल सोपवतो. आपण हरतो आणि मुले जिंकतात. मुलांना नवीन परिपाठ मिळतो, रडून-ओरडून सगळं काही साध्य होते.
जर आपण मुलांना थोडा वेळ दिला तर घरा-घरातील हे चित्र निश्चितच बदलू शकेल. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला कसं वाढवलं ते जरा आठवून बघायला हवे.
अगदी मूल पाळण्यात असल्यापासून त्याच्याशी भरपूर गप्पा मारायला हव्या. भाषा कळत नसूनही मुले छान प्रतिसाद देतात. यांतूनच त्यांना भाषा अवगत होते. मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तके द्या. त्यांच्या जवळ बसून त्यातील चित्रे दाखवून पक्षी- प्राण्यांची, या जगाशी ओळख करून द्या. या वयातील मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी असते. तुम्ही त्यावर जे जे लिहाल, कोराल ते ते त्यांना चटकन आत्मसात होते व दीर्घकाळ टिकून राहते. रात्री झोपताना त्यांना मांडीवर घेऊन, कुशीत घेऊन दोन चार गोष्टी सांगितल्या तर मुलांचे रंजन तर होतेच पण त्याबरोबर आपला प्रेमळ स्पर्श मुलांना आश्वासक ठरतो. ते निर्भयपणे, आनंदाने झोपेच्या अधीन होतात. झोपेतही मुलांचा मेंदू विकसित होत असतो असे वाचले आहे. माझ्या मुली ११/१२ वीत होत्या तेव्हा त्या झोपलेल्या असताना मी त्यांच्या रूममध्ये mathematical formulae ची कॅसेट लावायची. अशा क्लिष्ट गोष्टी मुले झोपेत सहजपणे आत्मसात करतात असा विचार त्यांच्या फिजिक्सच्या ‘खके’ सरांनी सांगितल्याचे आजही आठवते.
सकाळी मुलांना उठवताना ’ उठ रे लवकर’ अशी यांत्रिक हाक न घालता, त्यांच्याजवळ जाऊन, त्यांना गोंजारून, केसांतून हळुवारपणे हात फिरवून, ‘उठा उठा चिऊताई’, ‘उठ मुला रे उठ मुला’ अशा काव्यपंक्ती गुणगुणत हाक मारून बघा. कशी उत्साहाने मुले जागे होतील ते बघाच. त्यांच्यासाठी थोडासा खर्च केलेला वेळ मुलांना आपलेसे करण्यात फलदायी ठरतो.
आजकाल ‘एकच मूल पुरे’ हा करिअर-केंद्रित तरुण जोडप्यांचा बळावलेला विचार मुलांच्या मानसिक जडणघडणीत घातक तर ठरत नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या मुलाला घरातल्या भावंडाचा सहवास मिळाला तर त्या मुलाला मोबाईलची आवश्यकता भासेल का? आपल्याला मिळालेली वस्तू वाटून घ्यायची असते हा संस्कार त्याच्यावर होईल. लहानग्याला जपताना त्याच्यातील ममता आपसूक जागृत होईल. जबाबदारीचं भान येईल. एकटे मूल एकलकोंडे, स्वमग्न, हट्टी तर होतेच परंतु मी मी, माझं माझं ही स्वार्थी भावना वाढीस लागते, जी पुढे जीवनात तापदायक ठरू शकते.
उद्या ही पिढी मामा- मावशी, काका-आत्या ह्या नात्यांचा अर्थ गुगलवर सर्च करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. उद्या या मुलांना सुख-दुःखात, काही बिकट परिस्थिती ओढवली तर कोणाचा आधार मिळणार ? काही मदत लागली तर ते कोणाकडे जातील? नात्यांच्या कोंदणात माणूस सर्वच दृष्टीने सुरक्षित असतो हे विसरून कसे चालेल?
मुलांना एखादं भावंडं तर द्याच पण त्याबरोबर समवयस्क मित्रही द्या. शेजारच्यांबरोबर, सोसायटीतल्या लोकांबरोबर स्नेह वाढवा. मुलांना मैदानावर खेळायला पाठवा. त्यामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहील. सांघिक खेळामुळे मानसिक व भावनिक आरोग्य पण सशक्त होईल.
मुलांना मैदानावर घेऊन गेलात तर आपल्यालाही चार मित्र-मैत्रिणी मिळतील. माझ्या एका मैत्रिणीने ग्राऊंडवर जाणाऱ्या मुलाबरोबर धावण्याचे प्रशिक्षण घेतले. आज ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये तिने चार विक्रम नोंदवले आहेत. मुलांबरोबर आपलाही विकास साधला.
आपल्या मुलांबरोबर त्यांच्या मित्रांमध्येही वाचनाचं बीज रुजवा. मुलांच्या आवडीची सुंदर सुंदर पुस्तके त्यांच्या मित्रांच्या वाढदिवसाला भेट द्या. पुस्तक खरेदीत आपले मत ग्राह्य धरले जाते याचाही मुलांना आनंद होईल. मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तक पाहून आपल्यालाही समाधान लाभेल.
वंदना लोखंडे
पुणे
२२/१२/२०२५