आणि तिला माझी भाषा कळली

आणि तिला माझी भाषा कळली…

गोष्ट सांगते मांजरीची. आमच्या यांना मांजरीचं भारी वेड. आणि या उलट मला त्यांचा तिटकारा. अजिबात आवडत नाही मला हे कुत्रे-मांजर. लोक कसे काय त्यांच्या अंगावरून हात फिरवू शकतात. गावभर फिरून आलेल्या मांजरी या. जंतांचं माहेर घरच की. आमच्या यांना कुत्र्या-मांजरांची एलर्जी असल्याचे नुकतेच निदान झाले. तरीपण यांचे त्यांच्याविषयीचे प्रेम काही कमी होत नाही. यांच्या गाडीचा आवाज आला की लगेच एक काळा कुत्रा व मांजर धावत येते. तो कुत्रा गोंडस वगैरे अजिबात नाही बरं का! मांजर यांच्या पुढे पुढे जणू escort करत असते. तिसऱ्या मजल्यावर आमचा फ्लॅट. ही बया पायात घोटाळत म्याँव म्याँव करत थेट दारापर्यंत येते. हे कशासाठी असतंय ते एव्हाना लक्षात आलेच असणार? बशीभर दुधासाठी. तिला दारातच थांबायला सांगून हे घरात येतात. गार दूध असेल तर त्यात थोडे पाणी टाकून कोमट करतात. ते दूध डब्ब्यात ओतून उंबऱ्याच्या बाहेर ठेवतात. तिच्या बसण्याची जागा पण ठरवून दिलेली आहे. ती तिथे जाऊन बसते. दुधाचा डबा समोर आल्याबरोबर गटागटा दूध प्यायला सुरुवात करते. कधीतरी चुकून फ्रीजमधलं गार दूध दिलं गेलं तर या बाईसाहेब त्याला तोंड पण लावत नाही. काही वेळेस हे घरात आल्यावर विसरून जातात की मांजरीला दूध द्यायचे. जरा वेळाने आठवण आली आणि दार उघडून बघतो तेव्हा ही बया दारातच ठिय्या देऊन बसलेली असते. नाही म्हटले तरी मला वाईट वाटतेच. जास्त उशीर झाला तर काही वेळेस निघून जाते. सोसायटीत एक जण कधी कधी दूध देतात पण ही त्याला तोंड लावत नाही. कदाचित भांडं अस्वच्छ असते म्हणून असावं. आम्ही रोज तिला स्वच्छ भांड्यात दूध देत असतो. परवा तर कमालच केली. रात्री दीड वाजता हे बाहेर गावाहून परत आले तर ही बया त्यांच्या स्वागताला सज्ज होती. वरपर्यंत आली. यांचा उत्साहही बघा ना. तिच्यासाठी दूध ठेवलेच. पण सकाळी उठून बघते तर दूध तसेच. मग ती यांना फक्त घरापर्यंत सोडायला आली असावी का?
कधी दार उघडं दिसलं आणि मी समोर नसली तर घरात घुसायचा प्रयत्न करते. माझ्या दृष्टीपथात ती आली तर मग काय? माझा आवाज चढलाच समजा. ‘मने, जा. जा बाहेर जा. घरात अजिबात यायचं नाही’. पडत्या फळाची आज्ञा मान्य करत ती शेपूट आत घालून तुरुतुरु बाहेरचा रस्ता धरते.
कधी टेरेसचा दरवाजा उघडून वर गेलं की ही बया तिथं म्याँव म्याँव करत दारात उभी असते. आता तिथे पण दूध द्यायला मी काय रिकामी वाटली का हिला? झाडांना पाणी टाकायला गेलं तर एकदम बाहेर येते. आपण आपल्याच विचारात गढलेले असताना तिच्या अचानक बाहेर येण्याने दचकायला होते. आणि हो, माझ्या प्रिय पक्ष्यांना मारायला ती अशी दबा धरून बसलेली असते. कबुतरांना मारलं तर मला विशेष वाईट वाटत नाही. कदाचित तुम्ही म्हणाल किती निर्दयी आहे ही! त्याला कारणही तसंच आहे. त्यांची पैदास खूप आहे आणि त्यांचा आपल्याला काडीचाही उपयोग नाही. पण अस्थमा पसरविण्यात ते अग्रेसर आहेत.
एकदा या मांजरीने माझ्या डोळ्यांसमोर दयाळच्या पिलाला मटकावलं होतं. जे आपल्या आईच्या देखरेखीखाली उडण्याचे शिक्षण घेत होतं. ते बघून खूप जीव कळवळला होता.‌ कितीतरी दिवस ती दयाळची जोडी आपल्या पिलासाठी आकांत करत होती. कबुतर खाल्ल्यावर त्याची उरलेली पिसे जिन्यात पडलेली असतात. कधी कधी जिन्यात, टेरेसवर शौचालय समजून घाण करून जाते. ते स्वच्छ करण्यासाठी बाईच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात.
बरं हे वेड नवऱ्याचं आत्ताचं नाही. कॉलेजला असल्यापासूनचं. तेव्हा तर एक मांजर चक्क बोटाला चावली होती. आम्ही कोथरूडच्या घरात राहत होतो, तिथे पण हेच प्रकार होते. आमच्या खालच्या कुलकर्णीकाकूंची मांजर रोज दारात दूध प्यायला यायची. मुख्यदार बंद असले तरी. ते कसं काय हा प्रश्न मनात आला असणारच. आमच्या हॉलला लागून टेरेस होता. तो दरवाजा उघडा असायचा. तर ही बया बाहेरून जिन्याजवळच्या भिंतीवरून उडी मारून टेरेसवर यायची. बऱ्याचदा कपड्यांच्या स्टॅन्डच्या खाली बसायची. कपडे काढायला गेले की एकदम बाहेर येणार. एकदा तर तिने माझ्या पायावर पंजा मारला होता. त्यामुळे मी तिचा खूप राग राग करायचे. एकदा काय झालं संध्याकाळची वेळ होती. तिला नुकतीच बाळं झाली होती. आणि ती बया आली ना तिच्या एका बाळाला घेऊन. हॉलमध्ये एका कोपऱ्यात हार्मोनियम ठेवण्याची पेटी होती. त्या कोपऱ्यामध्ये पिलाला सोडून गेली. आता काय करायचं? घरातली मंडळी त्या पिलाच्या दिमतीला. दूध दे, पाणी दे. सगळे लाड पुरवले. एका दिवसाचं ठीक आहे हो. रोज रोज कोण करणार? रात्रीतून दोन चार वेळा डोकावून गेले.. ती व्यवस्थित आहे ना हे बघण्यासाठी.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठली ते तिच्या काळजीनेच. मांजर तिच्या बाळाला मोठ्या विश्वासाने माझ्याकडे सोपवून गेली होती. त्याची काळजी घेणे आवश्यकच होते. हे ऑफिसला जायला निघाले. दार उघडंच होते. तर ही बया दारात उभी. मग मी तिला खडसावून सांगितलं, ‘मने, काही वाटतं का तुला? तुझ्या बाळाला खुशाल येथे सोडून गेली. मी तुझ्या बाळाला सांभाळणार नाही. घेऊन जा येथून त्याला’. तिने शांतपणे ऐकून घेतले व ती मुकाट्याने निघून गेली. मी पुन्हा चिंतेत या पिल्लाला घराबाहेर कसं काढायचं? दोन-पाच मिनिटांनी ती पुन्हा आली. टेरेसच्या दरवाजाने घरात प्रवेश केला आणि आपल्या बाळाला तोंडात उचलून गुपचूप निघून गेली. तिला माझी भाषा कळली होती. मला वाटतं त्या दोन पाच मिनिटात बाळाला कुठे ठेवायचं ते ठिकाण शोधून आली असणार. मला मात्र ह्या गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं, खरंच प्राण्यांना आपली भाषा कळत असेल का?

वंदना लोखंडे,
पुणे
२१/०१/२०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

1 Like