पद-आख्यान
सेवानिवृत्तीनंतर नवऱ्याने नवीन चारचाकी वाहन खरेदी केले. मनसोक्त भ्रमंती करू असा मनोदय व्यक्त केला. परदेशात राहणाऱ्या लेक व नातीची पाठवणी केली. तोपर्यंत गणपती आले. विधीवत त्यांची पंचोपचारे पूजा करून दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर त्यांनाही रवाना केले. त्याच रात्री ठरवले आता आपण भटकंती करू. ते ही आपल्या पक्ष्यांना भेटण्यासाठी. मग काय सूर्यदयापूर्वीच पाबे घाटात पोहोचलो. पक्षी दर्शन झाले. दुपारचा एक वाजला. इतक्या लवकर घरी जाऊन काय करायचे म्हणून आम्ही सिंहगड पायथा गाठला. नेहमी सकाळी सकाळी बघितलेली व्हॅली सध्या दुथडी भरून वाहते हे ऐकले होते. ती कशी दिसते? तिथे कोणते पक्षी येतात हे बघायची इच्छा होती. मग काय निघालो आम्ही. नेहमी गजबजणाऱ्या रस्त्यावर एक दोन गाड्या पार्क केलेल्या होत्या. नवरा उजवीकडे गाडी पार्क करेल असे वाटत असताना त्यांनी डावीकडे महत्प्रयास करून गाडी लावली. गाडीचं दार उघडून बघते तर कडेला दगड-धोंड्यांची रास. खडतर वाट चालणारी मी विनातक्रार गाडीतून पायउतार झाले. गळ्यातला कॅमेरा फोटोग्राफीसाठी आतुर होता. तशातच उतारावरील गाडीच्या चाकांना अटकाव करण्यासाठी दगड शोधू लागले आणि घात झाला. डाव्या पावलाची मती फिरली अन् कडकड करत मुरडला. शरीरात जीवघेणी कळ उठली. पायाचे हाड मोडले हे समजायला वेळ लागला नाही. पावलाने शरीराचा भार उचलण्यास विरोध केला. नेहमी गजबजलेल्या त्या रस्त्यावर मदतीला कोणीही नव्हते. तशात एक लहान मुलगी दिसली. तिला हाक मारून तिचा आधार घेत गाडीत कशीबशी आसनस्थ झाले. नवऱ्याला गाडीतून उतरण्याची संधी न देता घराकडे कूच करायला सांगितले. अस्मादिकांचे दिसायला नाजूक तरीही काटक असलेले पाऊल टम्म फुगू लागले. त्याच्यावरचा बूट काढून त्याला मोकळा श्वास दिला, परंतु महाशयांनी अजून फुगायचे ठरवले होते. दवाखान्यात जाण्यावाचून पर्याय नव्हता म्हणून ‘सुबुध हॉस्पिटल’ गाठले. तिथल्या डॉक्टरांना तशी पूर्वकल्पना देण्यासाठी फोनवर संपर्क साधला. ‘मी दवाखान्यात नाही, परंतु तेथील सहायक डॉक्टर तपासतील’, याची त्यांनी ग्वाही दिली. दवाखान्याच्या पायरीशी गाडी लागण्याचा अवकाश तोच व्हीलचेअर घेऊन तिथला वॉर्डबॉय स्वागताला धावला. पाठोपाठ मला गाडीतून उतरवून घेण्यासाठी दोन सेविका हजर झाल्या. एखाद्या व्ही. आय. पी. च्या थाटात अस्मादिक गाडीतून पायउतार झाले. एवढे आगत स्वागत पहिल्यांदाच होत असल्यामुळे पाऊलही सुखावले. कधीतरी आपला फोटो काढला जावा ही त्याच्या मनातील सुप्त इच्छा डॉक्टरांनी पूर्ण केली. फोटो काढताना त्याने बरेच लाड करून घेतले व वेगवेगळ्या पोज देत फोटो सेशन पार पडले. फोटोमध्ये घोट्यावरचा टवका उडाल्याचे दिसत होते, म्हणून हे महाशय फुगत चालले होते. त्याचा रुसवा कमी करण्यासाठी त्याला नवीन पोशाख देण्याचे ठरवले. हिरव्यागार पोशाखात त्याचा देह बेढब दिसत असला तरी हे महाशय सुखावले. औषध-गोळ्यांचा भला मोठा खाऊ डॉक्टरांनी दिला होता. पुन्हा राजेशाही थाटात व्हीलचेअर वरून आम्हाला गाडीत बसवले. एव्हाना पोटात कावळे ओरडू लागले होते. रस्त्यात हॉटेलपाशी गाडी थांबवून जेवणाचे पार्सल घेऊन घराकडे प्रयाण केले. पार्किंगमध्ये गाडी लावली, परंतु दवाखान्यात ज्याप्रमाणे स्वागत झाले तसे स्वागत करण्यास इथे कोणी येणार नाही हे माहीत होते. नवऱ्याच्या मदतीने गाडीतून पायउतार झाले. आजपर्यंत नवऱ्याची वाट न बघता पुढे धावणारी मी आज नवऱ्याच्या आधाराशिवाय एक पाऊल पुढे टाकायला कचरत होते. लहानपणी खेळलेल्या खेळाची आठवण झाली. एका पायाने लंगडी घालून कशीबशी जिन्यापर्यंत पोहोचले. तेवढ्यात आमचा वॉचमन बाईंना काय झाले हे बघण्यासाठी डोकावला. एकंदरीत माझी ती दयनीय अवस्था बघून तो खूप हळहळला. आता आमच्यापुढे खरा पेच निर्माण झाला. तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घरात तीन जिने चढून जायचे कसे? आमच्या सोसायटीत लिफ्ट नाही हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असणारच. जाडजूड नवीन अंगरखा मिळाला म्हणून पाय आता आपला भार उचलेल या आशेवर त्यावर थोडासा दाब दिला, परंतु जोरदार कळ उठली त्यामुळे तो प्रयत्न विफल झाला. वॉचमनने मोफत सल्ला दिला, ‘साहेब, तुम्ही बाईसाहेबांना कडेवर उचलून घेऊन जा’. माझा जवळ जवळ सत्तर किलो वजनाचा देह वर उचलून नेताना नवऱ्याची काय अवस्था होईल हे डोळ्यासमोर येताच डोळे गरगरले. त्यामुळे पायरीवर उलटे बसून उजव्या पायाच्या रेट्याने एक एक पायरी वर चढण्याचा निर्णय घेतला. पायरीवर बसायला सोपे गेले परंतु आता घरात जायचं तर उठून उभे राहणे भाग होते. नवऱ्याने दारात खुर्ची आणली, तिच्या आधाराने उभी राहिले व घरात प्रवेश केला. सहा आठवड्यांसाठी मी माझ्याच घरात जणू स्थानबद्ध झाले होते. भिंगरीसारख्या गरगर फिरणाऱ्या माझ्या पावलांना सक्तिची विश्रांती मिळाली होती.
नाही म्हटलं तरी या काळात काही चांगल्या गोष्टी घडत होत्या. नवऱ्याकडून सकाळचा चहा आयता मिळत होता. बऱ्याच वर्षांनी स्वयंपाकीण मावशीच्या हातचं गरम गरम, पहिल्या वाफेचं जेवण जेवत होते. पक्षी निरीक्षणासाठी कुठे जाऊ शकत नव्हते, परंतु तेच पक्षी माझ्या भेटीसाठी येत होते. कधीही न पाहिलेला भारतातील सर्वांत लहान ‘फुलटोचा’ आला. ‘चष्मेवाला’ व ‘नाचरा’ आपल्या बाळांसहीत भेटीस आले. सिंहगड व्हॅलीतील छोट्याशा प्रवाहात धुणे धुणारा ‘राखी धोबी’ समोरच्या झाडावर येऊन बसला. चार-साडेचारच्या सुमारास बेडरूमच्या खिडकीत बसून मी त्यांचे फोटो काढायचे.
नवरात्रात नियमित देवीची पूजा करणारी मी देवांच्या पुढ्यात बसू शकत नव्हते. मग काय देव्हाऱ्यातल्या देवांना देव्हाऱ्यावर बसवून साग्रसंगीत पूजा करू लागले.
६ आठवड्यांनी पुन्हा तेच दिव्य कर्म करत जिना उतरून दवाखाना गाठला. पायाचा अंगरखा उतरावयाचा होता ना! तो कापण्यासाठी छोटीशी करवत आली. तिला बघताच माझी पाचावर धारण बसली. न जाणो आपल्या लाडक्या पायाला इजा झाली तर या भीतीने मी जरासा गोंधळ घातला. परंतु तसे काही होणार नाही अशी शाश्वती देत संबंधितांनी आपले कार्य पूर्ण केले. बोजड अंगरखा उतरला होता. हुश्श झाले. पुन्हा पावलाला फोटो काढण्याची संधी मिळाली. हत्तीच्या पायासारखा दिसणारा पाय आता थोड्या फार मूळ स्वरूपात आला होता. त्याला गुंडाळण्यासाठी गुलाबी पट्टा दिला. हलक्या हाताने डाव्याला कुरवाळत उजव्या पावलाला शाबासकी देत होते. गेले सहा आठवडे बिचारा युद्धपातळीवर एकटाच कार्यरत होता. वॉकर घेऊन चालण्याच्या सवयीने दोन्ही हात आणि खांदेही कुरबुर करू लागले होते.
दोन- अडीच महिने होत आले तरीही पाऊल उचलण्यास आढेवेढे घेत होते. उजवा पायही भार उचलण्यास असमर्थता दर्शवू लागला होता. काय करावे या विचारात असतानाच आई-वडिलांच्या सोबत त्यांच्या अस्थिरोगतज्ज्ञाकडे जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा त्यांना पाय दाखवण्याचा मोह मला आवरला नाही. जुजबी चौकशी करून त्यांनी फिजिओथेरपी सांगितली. प्लास्टरमुळे घट्ट झालेले स्नायू व्यायामाने सैल होण्यास मदत होईल असे सांगितले. एक दोन वेळा जवळच्या दवाखान्यात जाऊन हा सोपस्कार पार पाडला. परंतु होणाऱ्या दगदगीने फिजिओथेरपिस्टलाच घरी बोलवण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक भेटीत तिला ५००/१००० रुपयाचा आहेर करत होते.
पुन्हा पंधरा दिवसांनी दवाखान्याची वारी झाली. आता डॉक्टरांनी MRI करावयास सांगितले. ५/१० हजाराचा भुर्दंड सोसत हे ही लाड पुरवले. त्या तपासणीत ligament फाटल्याचे दिसून आले. फिजिओथेरपी मुळे जुळत आलेले ligament पुन्हा फाटले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी Matrix therapy हा पर्याय सुचवला. पुन्हा ५/१० हजाराचा चुराडा.
खूप दिवसांपूर्वी पक्षी निरीक्षणासाठी ग्रेटर रण ऑफ कच्छला जायचे निश्चित केले होते. ३००००/- रुपये भरले होते. रेल्वेचे बुकिंग झाले होते. ८-१० दिवसांत तिकडे निघायचे होते. मी का-कूं करू लागले. पैसे परत मिळण्याची सोय नव्हती. माझ्याऐवजी कोणी जाईल अशी व्यक्ती मिळत नव्हती. पैसे पाण्यात जाऊ नये म्हणून घरच्यांनी मी जावे असा आग्रह धरला. डॉक्टरांच्या सहमतीने जाण्याचा निर्णय घेतला. Pune ladies birders ग्रुपच्या माझ्या मैत्रिणींच्या सहकार्यामुळे ही मोहीम व्यवस्थित पार पडली.
आल्यावर पुन्हा matrix थेरपी वगैरे वगैरे सोपस्कार पार पडले.
आता माझे पद-आख्यान संपले असा गैरसमज करून घेऊ नका. अभी तो पिक्चर बाकी है!
पाय बरा झाला असे वाटून हळूहळू छोटी मोठी भ्रमंती करू लागले. लग्नसमारंभात उपस्थित राहू लागले. या घटनेला आठ महिन्यांचा कालावधी लोटला होता. नासिकला मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला जायचे होते. कंबर कसून एकटीनेच जायला तयार झाले. भल्या पहाटे ड्रायव्हर येणार होता. तो येण्याच्या आत घाईघाईने तयार होत होते. पायाच्या कोरड्या त्वचेला क्रीम लावून छानसा मसाज केला. तेवढ्यात फोन वाजला. जराशा घाईतच पायात चप्पल अडकवून फोनजवळ धावले आणि जोरात आपटले. नवरा दुसऱ्या खोलीत झोपला असल्यामुळे माझा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. किरकोळ दुखापत असणार असे समजून, वेदनाशामक गोळीचे सेवन करून नासिक गाठले. एके ठिकाणी बसूनच सगळ्या विधीत सामील झाले. सोबत दोघी-तिघी डॉक्टर मैत्रिणी होत्या. त्यांच्या सल्ल्याने पुन्हा वेदनाशामक गोळ्यांचे सेवन केले. दोन दिवस कसेबसे पार पडले. अंगठ्यावर सूज दिसत होती. पुण्यात आल्यावर पुन्हा दवाखान्याची वारी, पुन्हा फोटोसेशन झाले. त्यात डाव्या पायाच्या अंगठ्याच्या हाडाला फ्रॅक्चर झाले होते. तिथे प्लास्टर करणे शक्य नव्हते म्हणून विशिष्ट बूट घालायला दिला. हाडांची ठिसूळता वाढली आहे म्हणून ती तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी पुन्हा तिसरे हॉस्पिटल गाठले. फार नाही पण ७/८ हजार रुपयांची पावती फाडावी लागली. डॉक्टरांच्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले होते. आता डॉक्टरांनी इंजेक्शनचा उपाय सुचवला. सलग तीन महिने रोज पोटावर इंजेक्शन घ्यायचे. एका इंजेक्शन मध्ये ३० दिवसाचे औषध होते आणि एका इंजेक्शनची किंमत होती फक्त १००००/- एकदम तीन घेतले तर २७०००/- लागणार व त्यासोबत इंजेक्शन ठेवण्यासाठीचा खास पाऊच मोफत मिळणार होता. त्या सौद्याला बळी पडून खरेदी केली. नित्यनेमाने रोज रात्री नऊ वाजेचा अलार्म लावून स्वतःच इंजेक्शन टोचून घेत होते.
एक मात्र खरे की या वर्षभरातील काळात मी पायाला कधीच दूषण दिले नाही की कमी लेखले नाही. उलट त्याचे कौतुकच केले. ‘बघा ना किती दानशूर हा! स्वतःच्या पोटाला चिमटा काढून कित्येकांचे पोट भरत होता’. त्यात डॉक्टरांबरोबर औषध विक्रेते, रक्त तपासणी करणारे, एक्स रे व MRI करणारे तज्ज्ञ एवढेच नव्हे तर त्यांचे उत्पादक या सगळ्यांचा उदरनिर्वाह चालवत होता.
‘मी निर्धन, मी कफल्लक, मी गरीब’, असे म्हणून सतत रडणाऱ्या सुदृढ लोकांना माहीतच नसते की जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना आहे. देवाने दिलेले हे सुंदर शरीर किती मौल्यवान आहे हे त्यांच्या खिजगणतीतही नसते. हे जाणून घेण्यासाठी मी केला तसा दवाखान्यातील एक फेरफटका पुरेसा आहे. नुसती गुडघ्याची वाटी बदलायची असेल तर 4/5 लाख, रोहिणीत बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी २/३ लाख, किडनीसाठी ५/१० लाख आणि यकृत बदलायचे असेल (ते ही दुसऱ्या कोणाकडून मिळाले तर) ५/२५ लाख रुपये खर्च येतो. हा फक्त सर्जरीचा. त्यातील छुपे खर्च ही लाखाच्या घरात जातात.
आपल्या देहाचा, प्रत्येक अवयवाचा आदर करा, काळजी घ्या. एवढे सांगून माझे पद-आख्यान थांबवते.
वंदना लोखंडे
पुणे
२०/०१/२६
सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६
