माझी विठाई - माझी शिवाई

१६ माझी विठाई - माझी शिवाई
(मातृतुल्य व्यक्तिमत्त्व : शिवजी बाप्पा)

अनेक पिढींच्या पुण्याईने त्या घराण्यात दैवी पुरुष जन्माला येतो असे म्हणतात. जसे प्रभू रामचंद्र. तसेच आपल्या जीवनात एखाद्या दैवी पुरुषाचा सहवास लाभणं ही आपल्या पूर्वजांची पुण्याईच म्हणायची. माझ्या आजोबांचे गुरू अमळनेरचे प.पू.सखाराम महाराज दरवर्षी आमच्या घरी येत. माझ्या वडिलांच्या (केले दादा) जीवनाला दैवी पुरुषाचा स्पर्श झाला ते ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले. स्वाध्यायचे प्रणेते युगप्रवर्तक प.पू. दादा. स्वाध्यायच्या निमित्ताने आम्हाला तळागाळातील माणसापासून ते थेट डी. आय. जी. पदावरील व्यक्तिचा सहवास बालपणात मिळाला. त्यातलीच एक आदरणीय व्यक्ती म्हणजे शिवजी बाप्पा. निफाड तालुक्यातील सायखेड्यात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या ह्या व्यक्तीने आपलं उभं आयुष्य स्वाध्याय कार्यासाठी वेचले. निर्मळ, निर्मोही, निष्पाप असं हे व्यक्तिमत्त्व. अंगात स्वच्छ सुती बंडीसारखा लांब बाहीचा सदरा, पांढरे स्वच्छ सुती धोतर व डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पेहराव. मी १२/१३ वर्षाची असेल तेव्हापासून ह्या व्यक्तिचा प्रेमळ सहवास आम्हाला लाभला. सतत पायाला भोवरा बांधलेला. कधी महाराष्ट्र तर कधी गुजरात. त्यांचा ठावठिकाणा नसायचाच.
ते दोन तीन दिवस आमच्या घरी आले म्हणजे दिवाळी दसऱ्या असल्याचा आनंद आम्हा सर्वांना व्हायचा. त्यांना भेटायला येणाऱ्यांची रिघ लागायची. ‘काय भाऊ कसं आहे?’ असं म्हणत समोरच्याचे सुख-दुःख ते जाणून घेत.
कौटुंबिक अडचणीत ‘तो आहे पाठिशी, काळजी करू नको’ असा त्यांचा धीराचा शब्द दिलासा देई. भगवंतावर त्यांचा अतूट विश्वास होता. पहाटे तीन वाजता अंथरूणावरच ध्यान लावताना त्यांना अनेक वेळा बघितले होते.
जेव्हा कधी येत तेव्हा त्यांच्यासोबत २/३ कापडी पिशव्या, त्यात २/३ कपडे व काही वैचारिक साहित्य असे. जे आवडलं त्याच्या झेरॉक्स प्रती काढून इतरांना वाचायला देणार. प.पू.दादांचं वाङमय गावोगावी पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ते करत.‌ या कामात अगदी अनोळखी माणूसही त्यांच्या मदतीला धावून येई हे उल्लेखनीय. महाराष्ट्र व गुजरातमधील कानाकोपऱ्यात कोण व्यक्ती काय काम करीत आहे याचा अहवाल प.पू. दादांना ते व्यवस्थित पोहोचवत होते. आमच्या वडिलांच्या कामाची दखल घेऊन प. पू. दादांशी त्यांनीच भेट घालून दिली.
आईच्या पदराखाली बालकाला जी सुरक्षितेची भावना मिळते ती अनुभूती त्यांच्या सहवासात सर्वांना मिळे. मी दहावीत होते, तेव्हा ताई बी. कॉम. ला होती. आम्हा दोघी बहिणींना परिक्षेत विशेष प्राविण्य मिळाल्याचे ते सगळ्यांना कौतुकाने सांगत.
‘तू रोज रामरक्षा म्हटली तर तुला मुलगा होईल’, असे माझ्या एका गर्भार बहिणीला मिश्कीलपणे सांगत. तिने ते पाळलं आणि तिला मुलगा झाला. अर्थात हे सगळ्यांच्या बाबतीत खरे होईलच असे नाही. परंतु गर्भसंस्कार आवश्यक आहे हे पटले. रामरक्षा खूप शक्तिशाली (atom bomb)आहे व रोज तिचे पठण आवश्यक आहे हे त्यांनी अनेकांच्या मनावर सहजतेने बिंबवले होते.
मी पहिल्यांदा आई होणार होती. उच्च रक्तदाबामुळे माझ्या पायांवरील सूज बघून ते काळजीत पडले. त्यांच्या वर्तुळातील डॉक्टरांशी चर्चा करत होते. त्यांच्या सदिच्छेने मी सुखरूप बाळंत झाले.
लग्नानंतरही मला या माऊलीचा सहवास लाभला हे विशेष. स्थान बदललं तरी ममता तशीच होती. सततच्या प्रवासाचा कधी तरी शीण येणारच ना! अशा वेळी ते माझ्या घरी २/४ दिवस मुक्कामाला येत. जसे सासुरवाशीण शीण घालवण्यासाठी माहेरी जाते ना अगदी तसेच. नवऱ्याला, मुलींना गाणी म्हणायला सांगत. संवादिनी व तबल्याच्या साथीने छानशी गान-मैफल रंगे. त्यात भक्तिगीतांबरोबर चित्रपटगीतांचाही समावेश असे. ‘इथल्या संगीतमय वातावरणामुळे मी ताजा तवाना होतो’, असे ते म्हणत. खाण्यापिण्याचे म्हणाल तर अगदी चटणी भाकरीसुद्धा ते आनंदाने खात. माझ्यासाठी काही वेगळं करू नका असा त्यांचा आग्रह असे. त्यांचे बोलणे ऐकतच राहावे असे. आपल्याला आत डोकावून पाहायला लावणारे. हसत खेळत गीतेतील तत्त्वज्ञान समजावणारे ते बोल कान तृप्त करणारे व चित्तास शांती देणारे असायचे.
आले म्हणजे खिशातली डायरी काढून एकेकाला फोन करणार. त्यांच्या एका कॉलने लोक त्यांना धावत पळत भेटायला येत. त्या लोकांसाठी सुद्धा ती एक पर्वणीच असे. कुटुंबप्रमुखाप्रमाणे मला आलेल्यांची चहा-पाण्याची व्यवस्था करायला सांगत.
‘देह झाला चंदनाचा’ ही प. पू. आठवले दादांवर ज्यांनी कादंबरी लिहिली ते राजेंद्र खेर. त्यांच्याकडे आम्हा दोघांना घेऊन गेले. नुकतीच राखी पौर्णिमा झाली होती. ते औचित्य साधून मला त्यांनी राजेंद्रभाऊंना राखी बांधायला सांगितले. त्यांची पत्नी सिमंतिनीताईने यांना राखी बांधली. अशा प्रकारे एका रेशमी धाग्याने क्षणात त्यांनी आम्हाला भाऊ-बहिणीच्या नात्यात बांधले. त्यांच्यामुळे एका सारस्वत कुटुंबाशी जोडले गेलो.
माझी मैत्रीण रंजना लोढाने तिच्या गर्भार सुनेसाठी एक पुस्तक लिहिले होते. ते मी बाप्पाजींना दाखवले. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील तिच्या सुनेची प्रसन्न मुद्रा बघून ते म्हणाले, तिला जीव लावणाऱ्या प्रेमळ कुटुंबाला मला भेटायचे आहे. मी जरा संकोचतच फोन करून तिला भेटायला बोलावले. तिने दारात प्रवेश करताच मारवाडी भाषेत संवाद साधून बाप्पाजींनी तिचे इतक्या प्रेमाने स्वागत केले की मी ते बघून अवाक झाले. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी या सर्व भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘तुमचे माहेर कुठले’?, असे विचारत कधी काळी त्यांच्या वडिलांशी आलेला संबंध उद्धृत केला. माणसे जोडण्याची अद्भुत कला मी अनुभवत होते. त्यानंतर तिच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या हॉस्पिटलचा कर्मचारी वृंद भेटीला आला होता. त्या सगळ्यांशी त्यांनी मोठ्या वात्सल्याने संवाद साधला. असे हे मातृतुल्य व्यक्तिमत्त्व.
चार-सहा महिने झाले की मला त्यांच्या भेटीची ओढ लागे. मग मी वडिलांना निरोप देई, ‘बाप्पाजी आले की सांगा त्यांना, वंदना आठवण काढत आहे’.
माझ्या आईचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले तेव्हा ते आईला भेटायला आले. पुण्यातच असल्याने वडिलांनी मला फोन करून बोलावून घेतले. सुदैवाने आम्ही सगळी भावंडं तिथे जमलो. प्रत्येकाची आस्थेने विचारपूस केली. भावाच्या मुलांशी सुसंवाद साधला. त्यानंतर गावातल्या दोन-तीन स्वाध्यायींची भेट घेऊन माझ्या घरी रात्री मुक्कामाला आले. सकाळी उठल्यावर नवऱ्याला व मुलीला गाण्याची फर्माईश केली. नाश्ता-पाणी झाले. त्यांच्यासोबत दुपारच्या जेवणाची शिदोरी दिली. निघताना विचारले, ‘बाप्पाजी, आता परत कधी येणार’? ‘आता काय खरे आहे…’ असे म्हणत त्यांनी निरोप घेतला. हे बसस्थानकावर त्यांना सोडायला गेले.
त्यानंतर दोनच दिवसांनी सकाळी भावाचा फोन आला. ‘ताई, बाप्पाजी गेले’. परवाच तर इथून गेले होते. माझा विश्वास बसेना. अश्रूंचा बांध फुटला. विंचूरचे एक स्वाध्यायी जगदाळे काका. त्यांच्याकडेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या सांगण्यावरून राहुरीच्या स्वाध्यायी डॉ. कुसुरकरांकडे त्यांना उपचारासाठी नेले. तिथेच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तो दिवस होता १३ नोव्हेंबर २०१४. आयुष्यात पहिल्यांदाच मी इतकी कोणासाठी तरी रडत होते. जवळचं माणूस गेल्याचं दुःख काय असतं तेव्हा मला कळले. ‘अंत्यदर्शनासाठी नासिकला येणार का’?, असे भावाने विचारताच मी चटकन होकार दिला.
‘हे विश्वचि माझे घर’ या उक्तीप्रमाणे आयुष्य जगताना त्यांनी स्वतःचं घर-दार असावं असा लोभ धरला नव्हता. दवाखान्यातून त्यांना मुलाच्या घरी नेण्यात आले. अंत्यदर्शनासाठी स्वाध्यायींची रिघ लागली होती. असंख्य कुटुंबांना त्यांनी आईचे प्रेम दिले होते. ह्या माय- माऊलीचे, ह्या शिवाईचे (शिव+आई=शिवाई) दर्शन घ्यायला त्यांची लेकरं आली होती. चरणस्पर्श करून त्यांचे मस्तक मांडीवर घेतले. हे त्यांचे शेवटचे दर्शन, हा शेवटचा स्पर्श ह्या जाणिवेने मी व्याकुळ झाले. वडिल व भावाबरोबर मी पहिल्यांदा स्मशानभूमीत पाय ठेवला होता. मुंग्यांच्या गर्दीसारखी माणसांची गर्दी दाटली होती. त्या गर्दीतून वाट काढत अजाणतेपणी चितेजवळ येऊन उभी राहिले. तेव्हा सर्व पुरुषांच्या गर्दीत मी एकटीच स्त्री असल्याचे जाणवले. ज्यांच्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्या स्वाध्यायीची तिथे भेट झाली. ‘त्यादिवशी तुम्ही बाप्पाजींना दिलेली शिदोरी आम्ही सोबत खाल्ली होती’, हे त्यांनी सांगितल्यावर मला भरून आले.
चितेवर त्या देहाला अग्नी देत असताना सुन्न होऊन पहात होते. त्यावेळी अनेक संत महात्म्यांच्या सोबत स्वतः पांडुरंगशास्त्री त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वर्गाच्या दारात उभे आहेत असा भास होत होता. ८८ वर्षाचे जीर्ण वस्त्र फेडून एक पुण्यात्मा अनंतात विलीन होत होता.
‘शिवाई’ अनंतात विलीन झाली तरी तिच्या सुगंधी आठवणी अजूनही आमच्या कुटुंबात दरवळत आहेत. तिच्या आशीर्वादाचे छत्र आमच्यावर आहे.
‘विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई’ असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना विठ्ठलात जगतजननी दिसत होती. 'शिवजीबाप्पां’मधेही तशीच आई मी पाहत होते. सान-थोरांना जवळ घेणारी, चुकल्या माकलेल्यांना क्षमा करणारी, संकटसमयी धैर्य देणारी ही माऊली. आज एक तप होत आले तरीही ही ‘शिवाई’ माझ्या ह्रदयाचा कोपरा व्यापून आहे.
‘विठाई विठाई माझी शिवाई शिवाई’|

वंदना लोखंडे
पुणे
१६/०१/२०२६


सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६