मी व माझा रक्तदाब
सोसायटीतल्या गणेशोत्सवाची तयारी करण्याच्या बैठकीत मी व माझ्या दोन मैत्रिणींची चर्चा चालू असताना अचानक मला चक्कर आल्यासारखे वाटले. हे असं का होतंय कळेना. थोडा आराम केल्यावर बरे वाटेल असे वाटले पण छे! ते थांबेचना. अस्वस्थता वाढली. जीव घाबरू लागला. या अगोदर कधी कधी डोकेदुखी डोकं वर काढत होती. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र डॉक्टरांना दाखवणे आवश्यक होते. जवळच्याच डॉक्टरांकडे गेले, तेव्हा रक्तदाबाचा पारा 110/70 ची सीमा ओलांडून 140/100 पर्यंत पोहोचला होता. डॉक्टरांनी थायरॉईड व इतर रक्त तपासण्या करायला सांगितल्या. त्यांनी दिलेल्या औषध-गोळ्यांचा अपेक्षित परिणाम दिसेना. माझ्या जीवाला आराम नव्हता. त्याच दरम्यान माझे आई-वडील आले. मी आपली सारखी झोपून राहत असे. मुलींकडे दुर्लक्ष होत होते. खूप वाईट वाटायचं की आपण तरुण असून झोपून राहतो आणि वयस्कर आई-वडील आपला सर्व भार उचलत आहेत. एक स्नेही वडिलांना भेटायला आले होते. माझी परिस्थिती बघून त्यांनी सांगितले की, ‘प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ ‘डॉ. जगदीश हिरेमठ’ यांना तुम्ही तब्येत दाखवा’. त्या व्यक्तीने डॉक्टरांचा नंबर मिळवून त्यांची अपॉइंटमेंट घेतली. भाऊ, वडील व माझे पती आम्ही सगळेच मुकुंदनगर येथील डॉक्टरांच्या क्लिनिकला गेलो. छातीचा X-ray व Renal vascular Doppler करायला सांगितले. त्यात aorta arteritis असल्याचे निदान केले. काही औषध-गोळ्या लिहून दिल्या आणि ‘तुम्ही काय करतात’, असे विचारले. तेव्हा मी कृत्रिम फुलं बनवण्याचा छंद जोपासत होते. फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात ‘हिरवळ’ या संस्थेने चालवलेल्या 'डेलिया महोत्सवा’त खरंतर मला भाग घ्यायचा होता. पण तब्येतीमुळे मन कच खात होते. डॉक्टरांनी त्यात सहभागी होण्याचा सल्ला दिला. मी केलेली कृत्रिम फुले, फुलांची रचना करण्यासाठीचे साहित्य अशा ३/४ पिशव्यांचे ओझे घेऊन निघाले. तीन-चार आकर्षक रचना केल्या. दूरदर्शनवर खाजगी वृत्तवाहिन्यांनी या प्रदर्शनाची बातमी दिली होती. त्यामध्ये दाखवलेल्या माझ्या फुलांच्या रचना बघून मी सुखावले.
आठ- पंधरा दिवस झाले, तरी रक्तदाब मूळ पातळीवर येईना. हातांना मुंग्या येणे वगैरे प्रकार चालू होते. एकदा मी दुपारी झोपली असताना, स्वप्न पडले. त्यात माझ्या मुली शाळेतून घरी परतल्याच नव्हत्या. मी खूप घाबरले आणि ताडकन उठून बसले. आणि मनोमन निश्चय केला. ‘आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे. असे झोपून चालणार नाही. आपल्याला आपल्या मुलींसाठी जगायचे आहे.’ बस! तो एक क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. योग्य उपचार व माझ्या वाढलेल्या मनोबलामुळे हळूहळू रक्तदाब उतरू लागला. त्यावेळी माझे वय फक्त 29 वर्षाचे होते. याअगोदर माझ्या गर्भारपणात दोन्ही वेळी रक्तदाब वाढला होता. मात्र प्रसूतीनंतर तो खाली येत असे. बहुधा त्या प्रवृत्तीने डोके वर काढले होते.
बऱ्याचदा आपल्या जीवनात सर्व काही सुरळीत चालू आहे असे जगाला आपण दाखवत असलो तरी कुठेतरी नातेसंबंध जपतानाचा सततचा ताण हळूहळू शरीरावर विपरीत परिणाम दाखवायला सुरुवात करतो हेच खरे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी SSY (सिद्धी समाधी योगा) या आध्यात्मिक संस्थेत तीन आठवड्याच्या प्रशिक्षणात प्राणायाम व मेडिटेशनची पद्धत प्रामाणिकपणे समजून घेतली. त्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आम्ही तीन दिवस पुण्याच्या बाहेर कुटुंबापासून विलग राहिलो होतो. त्या तीन दिवसांत मितआहाराबरोबर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहाध्यायींवर विश्वास ठेवून वाटचाल करण्याचा सराव आमच्याकडून करून घेतला. शेवटच्या दिवशी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे गुरूंनी औक्षण केले. तो कार्यक्रम चालू असताना मला अस्वस्थ वाटायला लागले आणि गुरूंनी माझे औक्षण करताच माझी शुद्ध हरपली. तेव्हा एकाने हृदयाला मसाज करून मला शुद्धीवर आणल्याचे कळले. अशा विपरीत प्रसंगात आप्त-परिवाराव्यतिरिक्त सहप्रवासीही आपली काळजी घेऊ शकतात याची प्रचिती आली.
नियमित औषध-गोळ्या, प्राणायाम, सकाळी ४५ मिनिटे चालणे व त्यानंतर मेडिटेशन असे पहाटेचे दोन तास मी माझ्यावर खर्च करत होते. नियमित तपासणीत एक गोळी कमी झाली. साधारण दर तीन महिन्यांनी फेर तपासणीला जात होते. नवऱ्याला ऑफिसमधून सुटी घेणे शक्य नसल्यामुळे मी तपासणीसाठी बऱ्याचदा एकटीच 'पुना हॉस्पिटल’ला जात असे. जाताना नेहमीप्रमाणे व्यवस्थित तयार होऊन जायची. जेणेकरून दवाखान्यात आलेल्या इतर रुग्णांना, डॉक्टरांना माझ्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटायला हवे. हृदयरोगतज्ज्ञ म्हटल्यावर डॉक्टरांना अचानक गंभीर रुग्णांच्या तपासणीसाठी जावे लागत असे. अशा वेळी तासनतास वाट बघण्याशिवाय पर्याय नसायचा. बहुतांश सर्वच रुग्ण ज्येष्ठ नागरिक असत. साहजिकच गप्पांमध्ये तुम्ही कोणाला घेऊन आल्या अशी विचारपूस करत. मीच पेशंट आहे म्हटल्यावर माझे वय पाहून ते आश्चर्यचकित होत. कदाचित रुग्णाची छटा माझ्यात त्यांना दिसत नसावी.
४/५ वर्ष सुरळीत चालले होते. अचानक पुन्हा रक्तदाबाने उचल खाल्ली. अनावश्यक ओझे डोक्यावर घेऊन चाललो तर धाप लागणारच ना. पुन्हा गोळ्यांचा डोस वाढला. सुरळीत व्हायला काही महिन्यांचा अवधी लागला.
त्यानंतर पुन्हा १० वर्षांनी पारा वर चढला. सलग पंधरा दिवस मोलकरणीची सुटी. त्या दरम्यान शारीरिक श्रम जास्त झाल्याने हा त्रास झाला होता. बंद झालेली गोळी पुन्हा सुरू झाली. आता ठीकठाक चालू आहे. दरवर्षी फेर तपासणीला जात असते. जवळ जवळ २७ वर्षापासून मी रक्तदाबाला जोजवत आहे. जेवणात मीठावर तर अंकुश होताच पण आता साखरेवरही अंकुश ठेवण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षापासून कोलेस्टेरॉलला प्रतिबंध करण्यासाठी गोळी चालू झाली.
या दरम्यान जीवनात अनेक चढउतार पाहिले. अनेक कठीण प्रसंग ओढवले. परंतु त्यातून बाहेर पडण्याचे धैर्य वाढले आहे. डॉ. हिरेमठांसारखा चांगला तज्ज्ञ मिळाल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होत आहे.
‘डॉ. जगदीश हिरेमठ’ एक शांत, गंभीर व संयत व्यक्तिमत्त्व. त्यांच्याकडे पाहिल्यावर रुग्णाला दिलासा मिळतो. सतत गंभीर अवस्थेतील रुग्ण तपासताना त्यांनाही ताण येतच असणार पण तो ताण कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. प्रत्येक रुग्णाला पुरेसा वेळ देऊन त्याचे शंका समाधान करतात. एवढ्या धकाधकीच्या जीवनशैलीत डॉक्टर मित्रांसमवेत आपली गाण्याची आवड जोपासताना दिसतात. आकाशवाणीवर हृदय रोगाविषयी मार्गदर्शन करतात. व्यायामात हलगर्जीपणा केल्यास सूचक भाषेत रुग्णाचा कानही धरतात. एका भेटीत माझे ‘प प पक्षी’ पुस्तक मी त्यांना भेट दिले. आठवणीने पुस्तक वाचून झाल्यावर माझ्या मोबाईलवर त्यांचा मेसेज आला. ‘छान पुस्तिका, efforts ![]()
’ प्रतिसाद वाचून त्यांच्या विषयीचा आदर दुणावला. सुरुवातीलाच त्यांनी दिलेला छंद जोपासण्याचा मंत्र जपत राहिले. लिखाण, पक्षी-निरीक्षण, फोटोग्राफी, रांगोळ्या, देवपूजा या गोष्टीत मन गुंतवत राहिले. कदाचित या सवयीमुळेच मी व माझा रक्तदाब दोघांत मैत्रत्व नांदत आहे.
वंदना लोखंडे
पुणे
१५/०१/२०२६