बदलत गेलेली रांगोळी

बदलत गेलेली रांगोळी

रोज सकाळी सडा-संमार्जन करून अंगणात रांगोळी काढायची अशा संस्कारात मी लहानाची मोठी होत गेले. अंगणातली रांगोळी काढल्यावर, ओट्यावर तुळशीच्या कुंडीखाली व त्यानंतर देवांसमोरच्या पाटावर अशा तीन रांगोळ्या आई रोज नित्यनेमाने काढत होती. अंगणातल्या रांगोळीत कासव, बिल्वपत्र, कोयरी, स्वस्तिक, चांदणी, गालिचा अशा लहान मोठ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या काढल्या जात. ओट्यावरच्या रांगोळीत एकपदरी रांगोळी, गरूड, स्वस्तिक, शंख, चक्र व चार गाईची पावलं रेखाटली जात. तशीच रांगोळी देवापुढे पण काढली जात असे. परंतु चातुर्मासात या रांगोळीत बदल होई. गाईची एकसारखी 33 पावले तीन ओळीत बघताना पाहून मन प्रसन्न होत असे.
आई आमची मुळातच हुशार. दोन हातांवर आपल्या नाजूक, लांबसडक बोटांनी गरगर फिरवून जेवढी मऊसूत पुरणाची पोळी करायची तितक्याच नाजूकतेने बोटांच्या चिमटीत रांगोळीची पूड घेऊन बारीक रेघेतली रांगोळी रेखाटत होती. तिच्या लहानपणी तिने परातीतल्या पाण्यावर कोळशाची पूड पसरवून त्यावर पाच ते एक अशा ठिपक्यांचं छोटंसं बिल्वपत्र रेखाटलं होतं. त्यात ती पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली होती व तिला गंधाची बाटली बक्षीस मिळाली होती.
हाच वारसा आम्ही दोघी बहिणींनी तिच्याकडून घेतला. तिच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही अंगणात रांगोळी काढायला सुरुवात केली. तशातच बाजारात रांगोळीची पुस्तके उपलब्ध होऊ लागली होती. त्यात सोप्या, सरळ रांगोळ्यांबरोबर थोड्या कठीण पाना-फुलांच्या नक्षीदार रांगोळ्या बघायला मिळत. ताईने आपल्या रांगोळीत थोडा बदल करत मुक्तहस्त चित्रं रेखाटायला सुरुवात केली. त्यात ती खूप सुंदर पाना-फुलांच्या, पक्ष्यांच्या नक्षी चितारत असे. कोणी पाहुणे येणार असतील तेव्हा जेवणाच्या पंगतीत ताटाभोवती व भाऊबीज, रक्षाबंधनाच्या वेळी पाटाभोवती महिरपीची रांगोळी काढत असू.
दिवाळीच्या दिवसात आमच्या गल्लीमध्ये रांगोळी काढण्याची चढाओढ लागत असे. तसेच काही ठिकाणी रांगोळीच्या स्पर्धांचे आयोजन केले जात असे.अशाच एका स्पर्धेत ताईने पाण्यावर रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सपशेल फसला. तेव्हा तिने लाकडाच्या भुशावर रांगोळी काढून स्पर्धेत वैविध्य राखले होते. पुढे चार-पाच वर्षांनी मी एका स्पर्धेत पुन्हा पाण्यावर रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. लाकडी कोळशाची पूड करून घरी छोट्याशा ताटलीत रांगोळीचा सराव केला. तो प्रयत्न यशस्वी झाला म्हणून स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या परातीत रांगोळी काढली. परंतु त्यात यश आले नाही. आईने कशी काय ती रांगोळी काढली असावी याचे गूढ आम्हाला उकललेच नाही.
पुण्यात राहायला आल्यावर फ्लॅटच्या दारात रांगोळी काढायला भरपूर जागा होती. रांगोळी पाहून जाणारे-येणारे रहिवासी दाराची बेल वाजवून रांगोळी छान झाली असे आवर्जून सांगत. हा प्रतिसाद म्हणजे सर्जनशील कृतीचे एक प्रकारे कौतुकच होते.
पुढे उंबरठ्यावर किंवा देवांपुढे काढण्यासाठी छोटेसे चौकोनी छापे मिळायला लागलेत. एका पत्र्याच्या ताटलीत अगदी बारीक चूकेने छिद्रे करून एखादी रेखाकृती तयार करत. ज्यात बोटांनी दाब देऊन रांगोळी पसरवायची. छापा उचलताच खाली एक सुबक रांगोळी उमटत असे. या प्रक्रियेत बऱ्याच सुधारणा झाल्या. माझ्या संग्रही असे पंचवीस एक छापे तरी असावेत. सणासुदीला या छाप्यांचा वापर करून मुली जिन्याच्या प्रत्येक पायरीवर सुंदर रांगोळी रेखाटत.
पुढे संस्कारभारतीच्या पाच बोटांनी काढलेल्या रांगोळ्यांनी सणा-समारंभात मानाचे स्थान मिळवले. गणपतीच्या मिरवणुकीत रस्ते सुशोभित होऊ लागले. यामध्ये बिंदू, अर्धवर्तुळ, सरळ रेषा, गोपद्म , शंख, केंद्रवर्धिनी या सुचिन्हांचा वापर होई. मला हे फारसे जमले नाही. नंतर अशा रांगोळ्या काढण्यासाठी प्लास्टिकचे पेन सुद्धा बाजारात उपलब्ध झालेत. तरीही मला ही कला पाहिजे तशी अवगत झाली नाही.
वेगवेगळ्या रंगांची फुलं, पानं, धान्य असे अनेक पदार्थ वापरूनही रांगोळ्या रचल्या जात होत्या.
मुली अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना त्यांचे ग्राफ पेपर (आलेख कागद) खूप साचले होते. या ग्राफ पेपरचे काय करायचे हा विचार सतावत होता. मला त्या ग्राफ पेपरवर लहानपणीचे रांगोळीतले ठिपके दिसू लागलेत. त्यावर मी विविध कलाकृती रेखाटू लागले. जवळजवळ दोन पुस्तकं होतील अशा रचना तयार झाल्या. पुस्तक प्रकाशित करावे या विचारात असतानाच मला माझी एक काकू म्हणाली की, 'संस्कार भारतीच्या झटपट रांगोळी काढण्याच्या काळात हे पुस्तक कोण घेणार? ते पण खरे होते. त्यामुळे मी पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार रद्द केला. परंतु आता मुलगी लवकरच नव्या स्वरूपात या रांगोळ्यांचे पुस्तक प्रकाशित करायचे म्हणते आहे. बघू या कधी माझे स्वप्न साकार होईल ते.
याच दरम्यान रांगोळीचा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. पीठ चाळतो त्या चाळणीवर सुंदर सुंदर रांगोळ्यांच्या डिझाईन बघायला मिळत होत्या. त्यावर रांगोळी पसरवल्यावर त्यातून उमटलेली रांगोळी मनाला आकर्षित करत होती. मला त्या चाळण्या विकत घेण्याचा छंदच जडला. आज मितीला माझ्याजवळ जवळजवळ शंभर चाळण्यांचा साठा आहे. त्यात दोन इंचापासून ते दोन फुटापर्यंतच्या गोल, दंडगोलाकार, अर्धवर्तुळाकार, चौकोनी, आयताकृती अशा विविध आकारातल्या चाळण्यांचा समावेश आहे.
काळ बदलत आहे. घरातली गृहिणी उंबरा ओलांडून नोकरी करायला बाहेर पडली. त्यामुळे तिला वेळेचा अभाव. परंतु मुळात कलेची आवड असलेल्या या स्त्रियांनी घर सुशोभित करण्यासाठी हे सहज सोपे पर्याय आपलेसे केले. व्यवसायकांनी याचा बराच लाभ उठवला. अनेक वेगवेगळे प्रयोग, कल्पना राबवून, कधी फायबर तर कधी एम. डी. एफ. पासून केलेल्या शोभिवंत कलाकृती बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या. लोकांजवळ पैसा असल्यामुळे महागड्या कलाकृतींनी घरे सजू लागली.
आता तर रेडिमेड रांगोळ्या मिळतात. फक्त त्यात रंग भरायचे. एका ठिकाणी काढलेली रांगोळी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकतो. या सर्व गोष्टींमुळे कमी वेळात घरात सजावट होते, परंतु यामुळे सर्वसामान्य स्त्रियांची सर्जनशीलता, कल्पकता लोप पावताना दिसत आहे.
आता तर रांगोळीच्या माध्यमातून काही कलाकार व्यक्तिचित्रं रेखाटताना दिसत आहेत. ती इतकी जिवंत वाटतात की रांगोळी नसून ते एक प्रकाशचित्रच असल्याचा भास होतो. या मूठभर कलाकारांचा व्यवसाय तसा तेजीत चालला आहे. रांगोळीचा चेहरामोहरा बदलत आहे.
पुण्यासारख्या शहरात अंगण मिळणे दुरापास्त झाले आहे. परंतु अजूनही उंबरठ्यावर किंवा ग्रॅनाइटच्या तुकड्यावर एका कोपऱ्यात रांगोळी काढताना अनेक स्त्रिया दिसतात. त्यांच्या रूपाने आपली संस्कृती, कला अजूनही तेवत आहे.
मी मात्र अजूनही दिवाळी-दसऱ्याला घरात ठिपक्यांची मोठी रांगोळी काढते. ग्राफ पेपरवर पेनाने काढलेल्या माझ्याच रचनांना रांगोळीत स्थान देते. रंग भरण्यासाठी मुलगी मदत करते. यावर्षी दिवाळीत मुलीची ग्रीस देशातील एक मैत्रीण आली होती. मी काढलेल्या रांगोळीत तिलाही रंग भरण्याचा उत्साह आला. तिने त्यात अत्यंत सफाईने रंग भरले. ते पाहून मला समाधान मिळाले. आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरागत चालत आलेल्या कलेचा मोह परदेशातल्या लोकांना होताना दिसतो. त्याची ते भलावण करताना दिसतात, हे अभिमानास्पद आहे.
अशाप्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीचा, कलेचा मी एक पाईक आहे. ती जपण्यात मला धन्यता वाटते.
गेल्या वर्षी माझ्या अमेरिकेतील वास्तव्यात नातीलाही ही कला शिकवली. तिच्यासाठी एक मोठा काळा पुठ्ठा, पांढरी व रंगीत रांगोळी घेऊन गेली. सोबत दोन चार रांगोळीच्या रेडिमेड कलाकृतीही होत्या. याअगोदर तिच्या दादीआजीनेही तिला ह्या कलेचा परिचय करून दिला होताच. या कलेमुळे लहान वयातच बोटांची लवचिकता व मेंदूची सर्जनशीलता वाढीस लागण्यास निश्चितच मदत होते. चला तर मग या कलेचा वारसा आपल्या पुढच्या पिढीला देण्याचा वसा घेऊ या.

वंदना लोखंडे

पुणे
१४/०१/२०२६
सुरपाखरू #३०दिवस३०लेख #प्रयोग२६