माझा जीवाभावाचा सखा : माझं घर

माझा जीवाभावाचा सखा

जीवाभावाचा सखा. छे छे ! मी नवऱ्याविषयी नाही बोलत आहे. नवऱ्या व्यतिरिक्त स्त्रीचा सखा म्हटलं म्हणजे आपोआपच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या जातात. द्रौपदीचा सखा भगवान श्रीकृष्ण होता हे विसरून कसे चालेल? पण माझा सखा यापेक्षाही वेगळा आहे. ना रक्ताचा, ना रक्ताच्या नात्याचा तरीही जीवाभावाचा.
याच्या अंगाखांद्यावर खेळतच मी मोठी झाले.
माझ्यातल्या सुरवंटाचे फुलपाखरू होतानाचा प्रवास त्याने पाहिला. मला चार भिंतीचं संरक्षण दिले. बाहेर जाताना-येताना विचारपूस करायला त्याचा उंबरठा होताच. दमून भागून आलेल्या या जीवाला सतत कुशीत घेण्यासाठी याचे दार सतत उघडे असे. याने दिलेल्या उबदार छतामुळे ऊन, वारा, पाऊस यांपासूनचा किंचितही त्रास नव्हता. छोट्याशा खिडकीतून बाहेरचे जगही तो दाखवत होता. एके दिवशी हे फुलपाखरू अलगद उडून गेलं तेव्हा मात्र थोडा हळहळला. आता तरी पटली ना ओळख माझ्या सख्याची ? अहो! घराबद्दल बोलते मी. हे होतं माझं माहेरचं घर.
त्या घरातून उडाले तरी त्याने जवळच दुसऱ्या घराची सोय करून दिली होती. त्या नवीन घराने माझे छान आगत-स्वागत केले. उंबरठ्यावरचे तांदळाचे माप ओलांडून मी या घरात प्रवेश केला. सोबत माहेरच्या घराने दिलेली संस्कारांची सुगंधी फुले होती. त्या फुलांचे बीज पेरून मला त्या घरातही सुगंध पसरावयाचा होता. त्यामुळे चटकन त्या घराला आपलेसे केले. सकाळी उठून त्या घराचं अंगण रांगोळ्यांनी सुशोभित करत होते. स्वतः हाताने भरतकाम केलेला पडदा लावून दार सजवले. तिथल्या रेडिओ, दूरदर्शन यांसारख्या करमणूक करणाऱ्या बोलक्या साधनांना अंगरखा चढवला. तिथल्या कपाटांना उसासा देत त्यांचं रूप देखणं करत होते. सणासुदीला झेंडूच्या फुलमाळांनी सुशोभित करत होते. घरातल्या माणसांसाठी रुचकर भोजन तयार करत होते. मग हळूहळू या घरानेही मला आपलेसे केले.
पण ज्याच्यासाठी मी हे घरदार सोडून आले होते तो इथे नसायचा. तो होता ३५० कि. मी. दूर असलेल्या पुण्यनगरीत. तिथे जायचे म्हणजे पुन्हा घर बदलणे आलेच. त्याबरोबर शहरही बदलले. पण या वेळी मी एकटी नव्हते. या फुलपाखराच्या सोबतीला गुणगुणारा भ्रमर होता. जीवापाड प्रेम करणारा सहचारी होता. त्याच्या सहवासात माझ्या जीवनास पूर्णत्व आलं. तो मला एका नवीन घरात घेऊन आला. शासकीय सेवेत असलेल्या नवऱ्याला शासनाने राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिले होते. जे फक्त आमच्या दोघांचं होतं. या घराने आमच्यातला प्रणय फुलताना बघितला. मातृत्वाचं सुख पदरात टाकलं. काही काळापुरताच हे घर असणार हे माहीत असूनही या घराला मी तेवढाच जीव लावला. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याला मिळालेल्या पदोन्नतीचा आनंद या घराने पाहिला. ‘पहिली बेटी धनाची पेटी’ याची सत्यता पटली. आता या घराने तिला आपल्या अंगाखांद्यावर खेळवायला सुरुवात केली. तिचं शैशव आकारास येत असताना दुसऱ्या मुलीचा जन्म या घराने पाहिला. या घराच्या कृपाशीर्वादाने आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जाण्याचा योग आला. पाच वर्षाचा सहवास असलेल्या या घराला सोडून जाण्याचे दु:ख होतेच. परंतु स्वकष्टार्जित नवीन कोऱ्या घरात जाण्याचा आनंदही होताच.
आपल्याला त्या वास्तूत शांती लाभण्यासाठी वास्तूची शांती करणेही आवश्यक होते. आप्त-स्वकियांच्या प्रेमळ साक्षीने या घरात खऱ्या अर्थाने गृहप्रवेश केला. माझे नशीब खरंच चांगले आहे. मला लहानपणापासून नेहमीच प्रशस्त व सुसज्ज घराचा लाभ मिळाला. घराचे स्वरूप जरी बदलत गेले परंतु त्याचा आत्मा तोच होता. जीवाभावाचा सखा. या घरात माझ्या मुलींच्या सुरवंट ते फुलपाखरू या अवस्थांतरची क्रिया घडत होती. नवऱ्याच्या प्रगतीमुळे घरात आरामदायी सुविधांची पुरेशी साधने उपलब्ध होत होती. पहिली चारचाकी आली ती याच घरात. वडिलधारी मंडळी येथे येऊन विसावत होती. परिवारातल्या लहान मुलांना हे घर आपलेसे वाटत होते. त्यांनाही येथे येऊन राहण्याचा मोह होत होता. मुलींच्या लहानग्या दोस्तमंडळीची किलबिल घरात गुंजत होती. नात्यांतील रुग्ण मंडळींना दिलासा देत होती. त्यांची योग्य ती काळजी घेतली जात होती. पहि-पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. त्यांचे आतिथ्य करण्यात घर नेहमीच हसतमुखाने कंबर कसून तयार असे. या सर्व गजबजाटात घरातल्या व्यक्तींना मात्र जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे थोडे मोठे घर घेण्याचा विचार मनात तरळू लागला. आर्थिक ओढाताण सहन करत हे ही स्वप्न साकारास आले. अठरा वर्षांचा सहवास असलेले हे घर सोडून जाताना अक्षरशः जीवावर आले. माझ्या जीवनाच्या चाळिशीचा टप्पा इथेच पार पडला होता. घरातल्या सामानाची बांधाबांध करताना मनातल्या आठवणींना उजाळा देत त्यांचीही बांधाबांध करत होते. सामानाचा ट्रक नवीन घराकडे रवाना केला आणि हे रिकामे घर पाहून आतापर्यंत बांधून ठेवलेल्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. घराच्या भिंतीवरून हात फिरवत होते. वास्तूशांतीच्या वेळी जमिनीत स्थापन केलेल्या वास्तुदेवतेचा स्फुंदून स्फुंदून निरोप घेत होते. कर्तव्यदक्ष पिता ज्याप्रमाणे आपल्या लाडक्या लेकीची खंबीर मनाने पाठवणी करतो, त्याच प्रमाणे हे घर मला पोटाशी धरून निरोप देत होते. तू कुठेही गेली तरी मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देत होते.
काहीशा जड अंतःकरणानेच मी नवीन घरात प्रवेश केला. हे घरही छान होते. या घरात येताच मोठी मुलगी अर्थार्जन करू लागली. धाकटीने अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. नवऱ्याची नोकरी पुन्हा सुरू झाली. सकाळी ८ ला ही मंडळी घर सोडायची तर रात्री ८ लाच घरी परतायची. आजूबाजूला शेजारच्यांची वानवा. त्या दिवसभरात मला एकटीला घर खायला उठे. मग मला कोथरुडच्या घराची आठवण यायची. माणसाळलेल्या त्या घरातून मी इथे निर्जन टेकडीच्या पायथ्याशी येऊन पोहोचले होते. पण माझ्या एकाकी मनाला या नवीन घराने सावरले. घराच्या मोठमोठ्या खिडक्यांमधून डोकावणारी झाडे मला साद घालू लागली. त्यावर चिमुकल्या पाहुण्यांची सतत वर्दळ असे. त्यांच्याकडे बघण्यात माझा वेळ छान जाऊ लागला. एक अनोख्या जगतात माझा प्रवेश झाला. या पक्ष्यांनी मला लळा लावला. पक्षी-निरीक्षणातून काव्य स्फुरू लागले. मी लिहिलेली पुस्तके प्रकाशित होऊ लागली. माझ्या व्यक्तिमत्त्वाला नवीन ओळख मिळाली. एक सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या गृहिणीची मी ‘कवयित्री’ झाले.
या घराने मुलीचा विवाह सोहळा पाहिला. धाकटी मुलगी उच्च शिक्षणासाठी बाहेर पडली अन् मी मुलींच्या सहवासाला पारखी झाले. या वेळी मला या घराने जवळ घेतले. ‘संकटसमयी धावून येतो तोच खरा मित्र’ ही म्हण सार्थ ठरली. रजोनिवृत्तीच्या कठीण काळातही त्याने साथ दिली. गच्चीवरची बाग फुलवण्यात माझा वेळ जाऊ लागला. एके दिवशी एक नवा सदस्य घरात आला. माझी नात… ओवी. तिच्या चिमण-पावलांच्या स्पर्शाने घर सुखावले. तिला अंगा-खांद्यावर खेळवू लागले. आमच्या आनंदात सहभागी झाले. या परदेशस्थ नातीला भेटण्यासाठी मला जेव्हा परदेशात जाण्याची वेळ आली तेव्हा या घराचा निरोप घेताना पुन्हा गलबलून आले. ‘माझ्या नवऱ्याची काळजी घे’ हे आवर्जून सांगितले. तिथल्या वास्तव्यात मला माझ्या या सख्याची खूप आठवण यायची. त्याचा विरह सहन होईना. नवऱ्याला व्हिडिओ कॉल करून सांगायचे, ‘मला घर दाखवा’. त्याच्या सहवासासाठी आतुरले होते. भेटीसाठी व्याकुळ होत होते. सहा महिन्यांचा दुरावा सोसून परत त्याच्या कुशीत शिरण्याचा क्षण अपूर्व होता. नातीलाही या घराने लळा लावला. ती व्हिडिओ कॉलवर घर बघण्याचा हट्ट धरते. खरंच माझा हा सखा हाडा-मासांचा नसला तरी जीवाभावाचा आहे, हे निश्चित.

वंदना लोखंडे
पुणे
१३/०१/२०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६