मुंग्यांच्या राज्यातील फेरफटका

मुंग्यांच्या राज्यात

लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा
संत तुकारामांनी आपल्या अभंगात सांगितले आहे ‘लहान होऊन जगणे हेच श्रेष्ठ आहे’. मुंगी होऊन साखर खावी म्हणजेच नम्र राहून फायदा करून घ्यावा. संतांनी आपल्याला मुंगीचा आदर्श दिला आहे म्हणजे नक्कीच त्यांच्यात काहीतरी विशेष असणार.
मुंग्यांची शिस्त, काम करण्याची जिद्द आपणास माहिती आहेच. परंतु त्यापेक्षाही मुंग्यांच्या जगात अजब गोष्टी पाहायला मिळतात.
१) मुंग्याचं वारूळ :
मुंग्यांचं निवासस्थान म्हणजे वारूळ. खूप कलात्मक पद्धतीने तयार केलेले दिसते. जसे पक्षी जगतातील वास्तुविशारद म्हणजे सुगरण तसेच कीटक वर्गातील स्थापत्य अभियंता म्हणजे मुंगी असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकदा टी. व्ही. वर एक माहितीपट बघितला होता. त्यात जमिनीखालील मुंग्यांच्या वारूळाची रचना दाखवली होती. कित्येक किलोमीटर लांबीचा रस्ता त्यात होता. मुंग्यांचे पसरलेले साम्राज्य पाहून अचंबित झाले होते.
पाटणादेवी परिसरात जमिनीवर उंचवट्याचे अनेक टोकांचे वारूळ बघितल्याचे आठवते. जंगलातील पायवाट चालताना जमिनीलगत वर्तुळाकार स्वरूपातील कामकरी मुंग्यांचे वारूळही पाहायला मिळते. एखादे फूलच जणू. वारूळात पाणी जाणार नाही अशा पद्धतीने (जलरोधक) या वारूळाची रचना असते. मुंग्या वारूळात स्वतःसाठी धान्य वाहून नेतात, ते ही साल काढून. जवळ जवळ १०/१२ किलो धान्याचा साठा त्या करू शकतात. बऱ्याचदा दुष्काळात मनुष्य वारूळातील धान्यावर उदरनिर्वाह करताना दिसतो. बिचाऱ्या मुंग्यांनी त्यांच्यासाठी कष्टाने साठवलेले अन्न मनुष्य लंपास करतो.
२) मुंग्यांचे घरटे :
लहानपणापासून मुंग्यांचे वारूळ, Ant - Anthill हे घोकलेले असते. परंतु मुंग्याचे घरटे कधी ऐकले आहे का? मी पाहिले आहे. आमच्या टेरेसला लागून असलेल्या आंब्याच्या झाडावर पानांची घरटी दिसली. शिंपी पक्षी विशिष्ट धाग्याने पाने शिवून स्वतःसाठी घरटे तयार करतो हे बघितले होते. परंतु आंब्याच्या झाडावरील घरटे जरा वेगळेच होते. त्यावर मुंग्यांचा वावर होता. मी फोटो काढून पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांना तो पाठवला. तेव्हा त्यांनी माहिती पुरवली की हे मुंग्यांचे घरटे आहे. क्रेमॅटोगॅस्टर जातीच्या वृक्षवासी मुंग्या चिकट पांढरट स्त्रावाने पाने जोडून चेंडूसारखे गोलाकार घरटे बांधतात. पक्षीअभ्यासक ‘सचिन मेन’ यांच्या ‘पक्षीजगत’ या पुस्तकात जी माहिती मिळाली ती वाचून मी अवाक् झाले. ‘विटकरी सुतार’ हा मुंग्या खाणारा पक्षी. वृक्षवासी मुंग्यांची अंडी, कोश, अळ्या व प्रत्यक्ष मुंग्या खाण्यासाठी तो आपल्या तीक्ष्ण चोचीने मुंग्यांच्या घरट्याला भोक पाडतो. फेब्रुवारी ते एप्रिल हा त्याचा विणीचा हंगाम. या हंगामात मुंग्यांच्या घरट्यात शिरून सुतार अंडी घालतो. आश्चर्य म्हणजे त्या काळात मुंग्या या पक्ष्याची अंडी खात नाही किंवा पिलांना त्रास देत नाही. काही पक्षीतज्ज्ञांनी इतर पक्ष्याची अंडी या घरट्यात ठेवून बघितली. तेव्हा मुंग्यांनी अंडी फोडून त्यातला बलक फस्त केला. परंतु विटकरी सुतारच्या पिलांना मुंग्या काहीही इजा करत नाही. असं म्हणतात, त्या दोघांमध्ये एक करार झालेला असतो. सुतारपक्षी मुंग्यांकडून घर भाड्याने घेतो. त्या बदल्यात मी तुला एक पिल्लू देईन असं सांगतो. परंतु पिलं मोठी झाल्यावर तो शिताफीने तेथून पसार होतो. खरंतर हजारो मुंग्या क्षणात फस्त करणारा हा पक्षी घरटे सोडून गेल्यानंतरही घरट्यात मुंग्या तशाच असतात. शिकार व शिकारी एकत्र राहण्याचे हे दुर्मिळ उदाहरण पाहायला मिळते.
३) शल्यविशारद मुंग्या :
परवा ‘सकाळ’ वर्तमानपत्रात एक अद्भुत माहिती वाचायला मिळाली. ‘मुंग्यांमधील शल्यविशारद’. मागील 10 कोटी वर्षांपूर्वीपासून मुंग्या पृथ्वीवर आपले साम्राज्य टिकवून आहेत. मुंगी बुद्धिमान नाही परंतु तिची समूह बुद्धिमत्ता अफाट आहे. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार, मानवाव्यतिरिक्त मुंग्या पहिल्या जीव आहेत ज्या आपल्या वसाहतीतील इतर मुंग्यांवर गरज पडली तर सर्जरी करतात. ‘फ्लोरिडा सुतार’ मुंग्यांमध्ये जखमी झालेल्या मुंगीला वाचवण्यासाठी आणि त्या मुंगीचा वसाहतीमध्ये होणारा संसर्ग टाळण्यासाठी अवयव कापण्याची प्रक्रिया दिसते. संशोधकांना असे आढळून आले की मांडीचा वरचा भाग जिथे शरीराला जोडलेला असतो तोच भाग या मुंग्यांच्यामध्ये कापला जातो. पोटरी, नडगी सदृश्य भाग कापला जात नाही, तर त्यावर मुंग्या आपल्या तोंडाच्या साह्याने उपचार करत राहतात.
बिल वॉघन या अमेरिकी पत्रकाराने म्हटले आहे, ‘एक प्रजाती म्हणून व्हेल विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, पण मुंग्यांचं बाकी छान चाललं आहे’.
शरीराने महाकाय किंवा बुद्धिमान प्रजातीच पृथ्वीवर टिकून राहील असे नाही तर ज्या प्रजातीला परिस्थितीशी जुळवून घेण्याची चांगली क्षमता आहे तीच प्रजाती टिकते. आणि हा स्वभाव मुंग्यांमध्ये पाहायला मिळतो.
लोकहो , ‘स्वतःचे अस्तित्व नगण्य समजू नका. अविरत कष्ट, त्यासाठीची जिद्द व सांघिक भावना जपली तर यत्किंचित वाटणारी माणसेही बरंच काही करू शकतात’.

वंदना लोखंडे
१२/०१/२०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६