अतिक्रमणाचा विळखा : रस्त्याची व्यथा

अतिक्रमणाचा विळखा

अतिक्रमण… आज जिकडे तिकडे आपल्याला बघावयास मिळते. बघून हताश होतो पण त्याविरोधात काहीच करू शकत नाही. विरोध करण्याचा प्रयत्नही करत नाही. जागेवर, रस्त्यावर तसेच भाषेवर सुद्धा अतिक्रमण होताना दिसते.
मराठी भाषेवर इंग्रजीचं अतिक्रमण सर्व जण जाणून आहोत. टेबल, फोटो यासारख्या इंग्रजी शब्दांनी आपल्या शब्दकोशात अधिकृत स्थान मिळवले आहे. आजकाल ‘सॉरी’, ‘थॅंक्यू’, ‘एक्सक्युज मी’ ह्या इंग्रजी शब्दांची पेरणी केल्याशिवाय मराठीतून संवाद पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे क्षमा करा, आभारी आहे, माफ करा हे शब्द तर मराठी माणसाच्या शब्दकोशातून हद्दपार झाले आहेत.
रस्त्यावरच्या अतिक्रमणाचीही अशीच तऱ्हा. उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या घराजवळचा रस्ता. सेनापती बापट रस्ता. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या एका क्रांतिकारकाच्या नावाचे स्मरण करून देणारा हा रस्ता. एके काळी शालीन, सुसंस्कृत वाटणारा हा रस्ता आज उन्मत्त व आततायी झालेला दिसत आहे.
साधारण १९९४-१९९५ मध्ये मी कोथरुडहून इकडे भावाकडे यायची, तेव्हा ह्या रस्त्याचे फार आकर्षण होते. फारशी गजबज नसलेल्या या शांत रस्त्यावर रात्रीच्या वेळी रस्त्यालगतच्या बाकांवर ज्येष्ठ नागरिक निवांत बसलेले दिसत. या रस्त्याला लागून चतु:श्रुंगी मंदिर आहे. तिथल्या नवरात्रोत्सवासाठी रस्त्यावरील वाहतूक वळवून भाविकांसाठी रस्ता खुला केला जाई. त्यास जत्रेचं स्वरूप येई. परंतु काही वर्षांतच आय. सी. सी. सेंटर सारख्या व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या. विद्यापीठ चौकात उड्डाण पूल उभारले गेले आणि या रस्त्याची शान हरवली. हा रस्ता शील हरवून बसला. रात्र होताच झोपेच्या कुशीत जाणारा हा रस्ता कलावंतिणीच्या वस्तीप्रमाणे रात्रभर जागा राहू लागला.
एकेकाळी या रस्त्यावर वाहन उभे (पार्क) करण्यास मज्जाव होता. परंतु आज बापटांचे तथाकथित वारसदार समजून रस्त्याच्या मधोमध ते वाहन उभे करतात. इथल्या पंचतारांकित हॉटेल, मॉल यामुळे ओला, उबेर सारख्या टॅक्सी व्यावसायिकांना हक्काचे, विनामूल्य वाहनतळ मिळाले आहे. मेट्रो उभारणीच्या काळात इथली वाहतूक मुंगीच्या गतीने होत होती, तरीही ह्या बेशिस्त वाहन चालकांना अटकाव केला नाही की त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही. आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस निमूटपणे हे अतिक्रमण सहन करत राहिला, करतो आहे आणि करत राहणार.
सिंम्बॉयसिस कॉलेजपासून सुरू होणारा हा रस्ता जिथे संपतो तिथे दुभागला गेला आहे. एक रस्ता विद्यापीठाकडे जातो तर दुसरा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या सोसायट्यांना मिळतो. ह्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांची व्यथा काय सांगावी? हे लोक म्हणजे अतिक्रमणाचे शिकार आहेत.
मी जेव्हा २०११ मध्ये या भागात राहायला आले तेव्हा या सोसायटींकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच एका फळविक्रेत्याची टपरी, छोटेसे शनी मंदिर व अगदी दोन तीन फुटांच्या जागेत अंग चोरून बसलेला चांभार एवढेच होते. हळूहळू मुख्य रस्त्यावरच्या कडेला खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांची संख्या वाढू लागली. यात ज्यूस, चहा, भुर्जी, डोसा सगळं काही मिळतं. तिथे खायला येणाऱ्या खवय्यांची गर्दी वाढली. त्यांची वाहने बेशिस्तपणे रस्त्यात उभी असतात. वाहनांच्या पुढे घोळक्याने हे खवय्ये पदार्थांवर ताव मारताना दिसतात. आपल्यामुळे रहदारी खोळंबते हे त्यांच्या खिजगणतीतही नसते. किंबहुना निर्भीड होऊन दुर्लक्ष करतात. आपल्यासारख्यांनी ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाच मूर्खात काढले जाते. ह्या बेशिस्त अतिक्रमणात आमच्या सोसायटीकडे जाणारी वाट मात्र गुडूप झाली आहे.
बरं एवढ्यावर आमची व्यथा संपत नाही. या जखमेवर मीठ चोळण्यासाठीची तजवीज आहेच. मेट्रोची उभारणी होताना ह्या रस्त्याला खोदाईचा शाप आहे. वीज, पाणी, सांडपाणी ह्या खात्यांनी तर ह्या रस्त्याला दत्तक घेतले आहे. वारंवार खोदाई व टामटूम डागडुजी अव्याहत चालू असते. खड्ड्यांमध्ये रस्त्याचा शोध घेत जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी परिक्षा असते. आपल्याच बापाचा रस्ता आहे असे समजून दोन्ही बाजूला वाहन उभे करणाऱ्यांच्या भाऊगर्दीतून वाट काढणाऱ्या सोसायटीच्या सभासदांना खरे तर बक्षीस द्यायला हवे. इथूनच पुढे प्राचीन गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेश बंदी असल्यामुळे ह्या टपरीधारकांचे तर चांगलेच फावले आहे. नजीकच्या कार्यालयातील नोकरदारांना विसाव्याचे ठिकाण (hang out) मिळाले आहे. धूम्रपान करण्याऱ्यांसाठीची हक्काची जागा. या टपरीधारकांनी तर आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाला देव समजून त्याच्यासाठी रस्त्यावर खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था केली आहे.
नो पार्किंगच्या फलकाखाली सर्रास वाहनं उभी असतात.
हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पुलाखालच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला याचे काही सोयरसुतकही नव्हते. एक दोन वेळा तिथे जाऊन तक्रार करून आलो परंतु परिस्थिती आहे तशीच.
इथून थोडे पुढे गेल्यावर औंध रस्त्याची हीच अवस्था. शांत, प्रशस्त रस्त्याचा ताबा अल्पसंख्याकांनी घेतलेला दिसतो. सुरुवातीला फळ विक्रेत्यांचे टेंपो येथे विक्रीसाठी उभे राहत. आता तर खेळणी व तत्सम विक्रेत्यांनी इथे कायमस्वरूपी बस्तान बसवले आहे.
खरंतर हे अतिक्रमण वाढवण्यात काही अंशी आपणच जबाबदार आहोत असे वाटते. या विक्रेत्यांकडून आपण खरेदी करतो म्हणूनच हे पाय पसरतात. आरोग्यासाठी घातक असलेले अन्नपदार्थ ज्या टपऱ्यांवर विकले जातात त्यांचा व्यवसाय आपणच वाढवतो. रात्रंदिवस सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीत उपाहारगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे भान बहुराष्ट्रीय कंपन्यांना नाही. आपण आपल्या गैरसोयी विरूद्ध आवाज उठवू शकतो याची जाणीव सोसायट्यांना नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आपण मोठा पुरुषार्थ समजतो. नैतिकताच संपुष्टात आली आहे.
आपल्या मर्यादांचे उल्लंघन करून दुसऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारे हे अतिक्रमण म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत समाजाला लागलेली किड आहे. वेळीच तिला प्रतिबंध घातला नाही तर मोठा दुर्धर प्रसंग ओढवणार आहे. गलिच्छ, अस्वच्छतेच्या विळख्यात ह्या समाजाचा श्वास गुदमरला जाईल. परिणामी विकासाऐवजी विनाशाकडे आपली वाटचाल होत राहील.

वंदना लोखंडे
पुणे
११/०१/२०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६