सावनी
सप्तकातील ‘षड्ज ते निषाद’ या सात सूरांना हळूवार गोंजारत, त्यांची एकमेकांत सुरेख गुंफण करत एक सुंदर कलाकृती सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवणारे हे एक सोज्वळ, शालीन, व्यक्तिमत्त्व. सावनी शेंडे. स्वरसुगंधित 'कुसुमा’तील स्वरकण अलगद टिपून त्याचा दरवळ पसरवणारी सावनी. आपल्या स्वरातून रसिकांना संमोहित करणारी सावनी मला भेटली ती साधारण पंचवीस वर्षांपूर्वी ‘भैरव ते भैरवी’ या कार्यक्रमात . आपली अनुजा (धाकटी बहीण) ‘बेला’ समवेत. एकाच मंचावर या दोघी बहिणी शास्त्रीय संगीताचा सुगम संगीताशी झालेला मेळ उलगडून दाखवत होत्या. दहा राग व त्या रागावर आधारित दहा गाणी. कार्यक्रमाची संकल्पना तर छान होतीच परंतु दोघींचे सादरीकरण त्याहूनही छान होते. बाह्य सौंदर्याइतकाच त्यांचा अंत:स्वरही तितकाच साजिरा होता. सावनीने आपल्या नावाचा अर्थ उलगडून सांगितल्याचे आठवते, परंतु तो आता स्मरणात नाही. त्याबरोबर तिला आजी ‘कुसुम शेंडे’ यांच्याप्रती विशेष लळा असल्याचे जाणवले. सावनीला सूरांइतकेच शब्दही वश होते बरं का! अगदी तरुण वयातच स्वतः लिहिलेली बंदिश त्या कार्यक्रमात तिने ऐकवली होती. हा वारसा तिला आजीकडूनच मिळाला होता. कार्यक्रम ऐन रंगात असताना हॉलचे व्यवस्थापक पुढच्या कार्यक्रमासाठी हॉल लवकर खाली करून देण्याचा धोशा लावत होते. नाईलाजास्तव एक राग वगळून ही मैफिल पूर्णत्वास गेली.
बालपणापासूनच या दोघींनी पिता ‘संजीव शेंडे’ यांच्याकडून संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. मला या पित्याचे विशेष कौतुक वाटते. मुलींमधील गुण हेरून त्यांना योग्य मार्गावर आणून सोडणारा आदर्श पालक त्यांच्या रूपात दिसतो. या मुली एकाच मुशीतून घडल्या तरी दोघींचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र फुलत होते. एक शास्त्रीय संगीतात रमलेली तर दुसरी सुगम संगीतात प्रवीण. नावंही किती सुंदर बहाल केली आहेत! एक ‘सावनी’ तर दुसरी ‘बेला’. नावं उच्चारताच पवित्र अनुभूती येते. सावनीत सप्तकातील षड्ज, निषाद दिसतात तर बेलात बिल्वदलाचा भास होतो. दोघींच्या वाटा भिन्न होत्या. त्यामुळे कधीकाळी गायन क्षेत्रात एकमेकींशी स्पर्धा होण्याची शक्यता धूसर होती. या स्पर्धेपायी नाती संपुष्टात येण्याचा संभव असतो. परंतु त्या शक्यतेला इथे वाव नव्हताच. या मुलींच्या जडणघडणीत निश्चितच त्यांच्या माऊलीने आपल्या व्यक्तिगत विकासाकडे दुर्लक्ष केले असणार. तिचा त्यागही तेवढाच महत्त्वाचा वाटतो.
पाच वर्षांपूर्वी सावनीला ऐकण्याचा पुन्हा योग आला. निमित्त होते प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे आयोजित ‘कवितेचे दोन दिवस’. या कार्यक्रमात सावनी सोबत प्रसिद्ध शास्त्रीय गायक ‘पं. संजीव अभ्यंकर’ हे ही मंचावर होते. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात माझा अल्पसा सहभाग असल्यामुळे पुढच्या रांगेत बसून हा कार्यक्रम बघता आला होता.
‘सावनी शेंडे व संजीव अभ्यंकर’ दोघेही शास्त्रीय संगीतातील नावाजलेले कलाकार. या दोघांनी मैफिल एका उच्च स्तरावर नेली होती. सावनीने भजन गायला सुरुवात केली. तिच्या आर्त- हळव्या स्वरातून श्रीकृष्णावर असीम भक्ती असलेली मीरा मला तिच्या रूपात दिसत होती. पांढऱ्या शुभ्र वस्त्रातली, हातात तानपुरा घेतलेली सोज्वळ विरहिणी श्रीकृष्णाला साद घालत होती. मी ही त्या मीरेचाच एक भाग होऊन कृष्णनामात दंग झाले होते. काय ही अनोखी स्वरांची जादू!
या मैफलीने, सावनीने, सावनीतल्या मीरेने माझ्या हृदयाचा एक कोपरा व्यापला.
तीन महिन्यापूर्वी माझ्या भावाने आमच्या आईचा ‘अशितीपूर्ती सोहळा’ (८० वा वाढदिवस) करावयाचे ठरवले. आईला माहेरून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे लहानपणापासून तिला अभंग, भजनाची आवड आहे. म्हणूनच तिच्यासाठी, तिच्या माहेरच्या लोकांसाठी एक भक्तिपर गीतांचा कार्यक्रम करावा असे मनात योजले. त्यावेळी भावाने दोन-तीन गायक-गायिकांचे पर्याय माझ्यासमोर ठेवले. त्यात मी चटकन 'सावनी’च्या नावाला संमती दर्शवली. आणि पुन्हा एकदा 'सावनी’ला ऐकण्याचा योग आला.
५ ऑक्टोबरची ती प्रसन्न सकाळ भक्तिमय वातावरणाने भारली गेली. ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘राम घ्यावा राम द्यावा’ अशा अभंगातील प्रत्येक चरणाबरोबर मन ईश्वर नामात चिंब चिंब भिजत होते. चिंब भिजल्याची साक्ष डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूधारा देत होत्या. काठोकाठ पाण्याने भरलेले पात्र जसे ओसंडून वाहते अगदी तशीच मनाची अवस्था झाली होती. आहत पासून अनाहत नाद ऐकण्याच्या मार्गावर मी उभी होते. सभागृहातील प्रत्येक जण त्याच अनुभूतीतून जात असल्याचे तिथली शांतता सांगत होती. ही भावावस्था संपू नये असे वाटत असले तरी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ही मैफल आटोपती घ्यावी लागली, याची चुटपुट कायमच लागून राहील. या मैफिलीत त्यांनी स्वतः स्वरसाज चढवलेल्या अभंगाचे गायन म्हणजे मैफलीचा कळस होता. तिथे कलाकार आपली कला सादर करत नसून एक साधक ईश्वराची आराधना करताना दिसत होता. गायक, काव्यरचिती या व्यतिरिक्त संगीतकार म्हणून सावनीचा नवीन पैलू दिसला.
यंदा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात तिचे गायन ऐकण्यासाठी कान अधीर झाले होते. तो दिवस उजाडला. मंचावर तिच्या येण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत होते आणि तो क्षण आला. आपल्या ताफ्यासहित ती मंचावर विराजमान झाली. दिवसाची वेळ सांजेच्या उंबरठ्यावर उभी होती. अशा वेळी राग मारवा सादर करण्याचा मनोदय तिने व्यक्त केला. मारव्याचे हळवे सूर गुरुपूजा बांधण्यासाठी योग्य आहेत असे म्हणत स्वतः रचलेल्या बंदिशीतील शब्द ऐकवत स्वरपूजा बांधावयास सुरुवात केली. सप्तकातील सूरांत परमेश्वराचे रूप बघण्याचा ध्यास घ्यावा अशा अर्थाची रचना त्यांनी सादर केली. त्यांच्या स्वरातून अरूपातील रूप आकारास येत होते. त्याची मोहिनी संपूर्ण श्रोत्यांना खिळवून ठेवत होती. त्यानंतर उपशास्त्रीय संगीतातील दादरा या प्रकारात त्यांनी वडिलांनी बांधलेली एक रचना ऐकवली.
‘मतवाले बलमा नयना मिलाके न जाना’
अहाहा! त्या सुरांमध्ये प्रियकराला विनवणी करणारी मिलनोत्सुक प्रेयसी दिसत होती. सर्जनशील कलाकार, विरहिणी, साधक व प्रेयसी या विविध भूमिका मला सावनीच्या रूपात बघायला मिळाल्या.
स्वरातून साकारलेली ही विविध रूपे.
सावनी द ग्रेट आर्टिस्ट!
वंदना लोखंडे
पुणे
०३/०१/२०२५
सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६
