छोटा सदाशिव : हृषिकेश बडवे

२ छोटा सदाशिव

साधारण १८/२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भरतनाट्य मंदिरात संगीत नाटक बघायला गेले होते. तसं पाहिलं तर मला संगीत नाटकात काही स्वारस्य नव्हते. माझ्या लहानपणी मराठी दूरदर्शनवर महिन्यातून एकदा चित्रपटाऐवजी संगीत नाटक दाखवले जाई. तेव्हा थोडा विरस होई. गाणं तसं चांगलं म्हणतात पण एकच ओळ सारखी सारखी का म्हणतात हे काही कळायचं नाही. परंतु नवऱ्याच्या आग्रहाखातर जाणे भाग पडले. जराशा नाराजीनेच नाटक न्याहाळत होते. मात्र पाच तास चालणाऱ्या या संगीत नाटकातील पदं अक्षरशः काळजात घुसली हो! पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील व वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, प्रसाद सावकार या गायकांनी अजरामर केलेली ही गीते नवऱ्याच्या ओठांवर फेर धरताना बघितली होती. त्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांच्याशी थोडी जवळीक साधली गेली होती.

आता तर अगदी प्रथितयश गायकांच्या तोंडून ती पदं प्रत्यक्ष ऐकताना मन त्या स्वरांच्या अधीन झाले होते. एक ओळ पुन्हा पुन्हा आळवताना त्यातील वैविध्य, त्या हरकती लक्षात येत होत्या. आवडत होत्या. चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे ह्या गायकांनी अक्षरशः त्यात प्राण ओतले होते. त्यांच्याइतकाच लक्षात राहिला तो छोटा सदाशिव. गुरुकुलात संगीत शिक्षण घेणाऱ्या सदाशिवच्या तोंडी एक पद होतं. बहुधा ‘दिन गेले भजनाविण सारे’ असावं. आता नीटसं आठवत नाही. परंतु बटुच्या रुपातील तो छोटासा सदाशिव व त्याचं ते गायन, त्याने अगदी सहजतेने घेतलेल्या हरकती ऐकून अवाक झाले होते. आपल्या मुलींपेक्षा काहीच वर्षे मोठ्या असणाऱ्या या बालकाचे आईच्या नजरेतून बघितल्यावर फारच अप्रूप वाटत होते. आपल्या भूमिकेचा कार्यभाग संपल्यावर कपडे बदलून हा बटू आमच्या शेजारच्या आसनावर येऊन बसला, तेव्हा कौतुक भरल्या नजरेने त्याचे स्वागत केल्याचे आठवते. त्याच्या गाण्याची स्तुती केल्यावर आपण काही खास केले असा जरासाही भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. केवढी ही निरागसता!

मध्यंतरी वृत्तपत्रात त्याचे नाव दिसत होते, ‘हृषिकेश बडवे’. परंतु त्याचे गाणे ऐकण्याचा योग कधी आला नव्हता. मात्र यावर्षीच्या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पत्रिकेत त्याचे नाव बघताच आपण कार्यक्रमाला जायचेच यावर शिक्कामोर्तब झाले. महोत्सवातील दुसऱ्या दिवसाचा आरंभीचा गायक होता हृषिकेश. कार्यक्रम स्थळी जाताना सहज मनात विचार आला या गायकाची भेट घेऊन त्याच्यासमवेत एक फोटो काढायचा. पण ते जमून येईल का याबद्दल साशंक होतेच. धावत पळतच सभामंडपात पोहोचले. मंचावर एकेकाळी पाहिलेला तो बटू आसनस्थ झाला होता. तेच रूप पण जराशी पक्वता धारण केलेले, परंतु तीच निरागसता. बोल आलापीने ‘गावती’ रागाचा विस्तार आकारास येत होता. तेवढ्यात जवळ सनदी लेखापाल भाचा येऊन बसला. सहसा शास्त्रीय संगीताची वाट न धरणारा. त्याला मंडपात बघून आश्चर्य वाटले. तेव्हा समव्यवसायिक मित्राचे गाणे ऐकण्यासाठी तो आला असल्याचे कळले. हृषिकेश बडवे एक उत्तम गायक आणि तो सनदी लेखापाल. अजून एक आश्चर्यचा धक्का होता.

अत्यंत क्लिष्ट समजला जाणारा हा अभ्यासक्रम त्यात गायनाचा रियाज याचा मेळ कसा साधत असणार हा विचार मनात आला. एव्हाना सरगम तानांना आलाप तानांची जोड लाभल्यामुळे ‘गावती’ चे रूप चांगलेच खुलत होते. मिलिंद कुलकर्णींची संवादिनी साथ व प्रशांत पांडव यांची तबल्यावरील समर्पक साथ गायनात रंग भरत होती. ‘गावती’ नंतर ‘श्री कल्याण’ रागातील बंदिश श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होती. ‘सावरिया हम तुम संग’ ही रचना लयकारीच्या तानांनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेत होती. तेवढ्यात आयोजकांनी नाट्यगीत गाण्याची फर्माईश केली. एकेकाळी पाहिलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ च्या स्वरांनी मनाचा ताबा घेतला. हिशेब तपासणाऱ्या सनदी लेखापालाला गायनातील दुप्पट तिप्पट चौपट सहज वश होती याचा प्रत्यय येत होता.

कार्यक्रम संपल्यावर भाच्याने, 'ह्रषिकेश बरोबर फोटो काढायचा का! असे विचारताच मी फोटो काढून घेण्यास अधीर झाले. थोड्याच वेळापूर्वी मनात धरलेली इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसली. मंडपाबाहेर भाच्याने ओळख करून देताच तो पटकन नमस्कारासाठी वाकला. ते बघून वीस वर्षांपूर्वीचा छोटा सदाशिव डोळ्यासमोर आला. पुन्हा तीच निरागसता प्रत्ययास आली. सवाईच्या जगविख्यात पवित्र मंचावर नुकतीच आपली कला सादर करून, हजारो श्रोत्यांची मने जिंकून आलेला हा तरुण आदराने वडिलजनांच्या चरणस्पर्शासाठी वाकलेला बघून मीच ओशाळले. केवढी ही विनम्रता! केवळ ह्या विनम्रतेमुळेच सप्तसूर त्याच्या अधीन होत असावे हे उमगले.

पुन्हा एकदा कट्यार आठवली. त्या नाटकातील ‘कला व विद्या’ यावर केलेले मार्मिक भाष्य आठवले. ‘विद्या ही बाहेरून आत शिरते तर कला ही आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरे तर कलेसाठी मस्तक व हृदय दोन्हीही हवीत.’ नकळत ‘हृषिकेश अशीच तुझी कला फुलत राहो’ असे आशीर्वादाचे बोल तोंडातून आपसूक बाहेर पडले.

वंदना लोखंडे
पुणे
०२/०१/२०२६