सवाई गंधर्व संगीत महोत्सव

सवाई गंधर्व संगीत महोत्सव

सवाईचा भव्य शाही मंडप. पांढऱ्या शुभ्र रेशमी वस्त्राने छत आच्छादित केलेले. सभोवार लाल- पांढऱ्या कनातींची नक्षी. मध्यवर्ती भागातील छताला लटकलेली प्रकाशमान व आलिशान झुंबरे मंडपाची शोभा वर्धित करत होते. पांढऱ्या शुभ्र रेशमी वस्त्राने आच्छादलेले सोफे. समोर लाल, पांढऱ्या व पिवळ्या जरबेराच्या फुलांनी सजवलेला भव्य मंच. त्यावरील स्वरप्रतिभावंतांच्या पाठीमागे लावलेल्या तिन्ही प्रतिमांना बघून नकळत हात जोडले गेले.

‘७१ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ ही फलकावरची अक्षरे बघून मन वीस वर्ष मागे धावत गेले.

तेव्हाचा हा महोत्सव ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ या नावाने प्रसिध्द होता. पुण्यात वास्तव्य केल्यापासून डिसेंबरच्या महिन्यात या महोत्सवाचे वर्णन वर्तमान पत्रातून वाचत होते. माझे कॅनडास्थित काका डॉ. जगन्नाथ वाणी दरवर्षी डिसेंबर महिन्यात भारतात यायचे. ते मात्र आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावत याचे आम्हाला अप्रूप वाटे. रात्रभर चालणाऱ्या या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण हजेरी लावावी असे कधी वाटले नाही. परंतु जेव्हा दोघी मुली शास्त्रीय संगीताचे धडे घेऊ लागल्या, तेव्हा या कार्यक्रमाविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्याच दरम्यान त्यांचे गुरू प्रख्यात सरोदवादक पं. राजन कुलकर्णींनी या मंचावर आपली कला सादर केली. मुलींची अभिरुची जागृत ठेवावी, त्यांना पूरक श्रवणीय खाद्य द्यावे व त्याचबरोबर आपणही या कार्यक्रमाची अनुभूती घ्यावी या मनीषेने संगीत महोत्सवास हजेरी लावण्याचे ठरवले.

शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवसात चार सत्र होत असत. मला वाटतं 2004 साल असावं. सवाईचा ५१ वा कार्यक्रम असला तरी आमच्यासाठी तो पहिलाच होता. भारतीय बैठकीचा सीजन पास काढला. त्यावेळचा तुटपुंजा पगार व आवश्यक गरजांसाठीचा भरमसाठ खर्च यामुळे खुर्ची किंवा सोफ्याचे तिकीट काढण्याचा विचारही कधी मनात आला नाही.

अखेर तो दिवस उजाडला. धावत-पळत ते ठिकाण शोधले. रमणबाग परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात प्रवेश केला. सभामंडप खच्चून भरलेला. सोफा, खुर्च्या, मंचासमोर भारतीय बैठक व त्या पलिकडे प्रेक्षकांसाठी उंचावर असलेली आसन व्यवस्था. गर्दी पाहून भारावले. मंचासमोरची भारतीय बैठक तर आधीच गच्च भरलेली होती. आच्छादित मंडपाच्या दोन्ही बाजूला मोठे स्क्रीन लावले होते. त्यासमोरच सोबत आणलेल्या सतरंजीवर बस्तान बसवले. संध्याकाळचे साडेपाच वाजलेले. मंचावर जयतीर्थ मेवुंडीचे गायन चालू झाले. ‘पटदीप’ रागाचा विस्तार, बडा ख्याल सुरू झाला. त्या आलापी स्वरांनी मनावर चांगलीच पकड घेतली. हळूहळू छोटा ख्यालच्या द्रुतगतीतील आलापी तानांनी वातावरणात रंग भरायला सुरुवात केली. गायकाची भावमुद्रा व तानांच्या लयीप्रमाणे होणारे हातवारे खूपच मोहक होते. त्यांच्या स्वरातून व देहबोलीतून राग उमलत होता. आमच्या सारख्या शून्य स्वरज्ञान असलेल्या श्रोत्यालाही त्या रागाची भुरळ पडली. यातच त्या गायकाचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले होते.
त्यानंतर तरुण कलाकार अमान अली बंगश व अयान अली बंगश या भावांचे सरोद वादन, त्यांची तबल्यासोबतची जुगलबंदी पाहून अक्षरशः वेड लागले. प्रसिद्ध संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा जेव्हा स्टेजवर आले तेव्हाही हाच अनुभव आला. सरोद, संतूर ही खरं तर तंतुवाद्ये. एका लाकडी पोकळ भोपळ्यावर बारीक तारा खुंटीला बांधलेल्या. त्यावर या कलाकारांची बोटं इतकी सफाईने फिरत होती की त्यातून होणाऱ्या स्वरझंकाराने स्वत्व गळून पडले होते. देहभान विसरणे म्हणजे काय? ते हेच असावे बहुधा.

या तीन दिवसात अनेक कलाकारांचे गायन, वादन ऐकायला मिळाले. पं.बिरजू महाराजांचे कथ्थक नृत्यही पाहायला मिळाले. त्यात लक्षात राहण्याजोगे गायन म्हणजे कलापिनी कोमकली यांचे. पंडित कुमार गंधर्व यांच्या त्या कन्या. ख्यातनाम पिता व आई वसुंधरा कोमकली यांच्याकडून त्यांना समृद्ध स्वर-वारसा मिळालेला. त्यांचं सात्विक रूप व सात्विक स्वर दोन्हीही भावले. त्यांच्या सादरीकरणाच्या शेवटी गायलेलं भजन ऐकून मी दिङमूढ झाले. एका वेगळ्याच भावावस्थेत शिरले होते. त्यामुळे मनाला मिळालेली शांती अपार होती. तो निर्गुणी भजनाचा प्रकार होता हे दरवर्षी येणाऱ्या शेजारच्या प्रेक्षकांकडून कळले. त्याच भारावलेल्या अवस्थेत तिथल्या स्टॉलवरून पं.कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाची कॅसेट घेतली. तीन दिवसाच्या स्वरयज्ञात पूर्णाहुती देण्यासाठी रात्री १२ वाजता पं. भीमसेन जोशींचे आगमन झाले. त्यांचे गायन आकाशवाणीवर प्रक्षेपित करण्यासाठी काही स्वतंत्र व्यवस्था करावी लागली. त्यासाठी होणारा वेळ, मुलींच्या डोळ्यांवर आलेली अनावर झोप म्हणून आम्ही तिथून जड अंतःकरणाने काढता पाय घेतला. परंतु हा संगीत महोत्सव आम्हाला खूप समृद्ध करून गेला. पुढच्या वर्षी या कार्यक्रमात हजेरी लावायचीच असा मनोदय व्यक्त करत आम्ही घराची वाट धरली.

नित्यनेमाने दरवर्षी ही संगीत वारी करत असते. यामध्ये पं. फिरोज दस्तूर, प्रभा अत्रे, गिरीजा देवी, आरती अंकलीकर, या गायक-गायिकांचे गायन, पं. विजय घाटे, पं. रामदास पळसुले यांचे तबलावादन, पं. भवानी शंकर यांचे पखवाज वादन, तसेच सुप्रसिद्ध नृत्यांगना यांचे नर्तन प्रत्यक्ष बघायला मिळाले.

पं. जसराज यांच्या गायनाचा एक अलग बाज होता. ते ८-१० कलाकारांना सोबत घेऊनच मंचावर उपस्थित व्हायचे. ध्वनीव्यवस्थापकला अनेक सूचना देऊन, पाहिजे तशी ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करत. यातच अर्धा तास जात असे. काही प्रेक्षक कंटाळून निघून जात. परंतु उरलेल्या वेळातील त्यांचे पंधरा-वीस मिनिटांचे गायन म्हणजे पैसा वसूल कार्यक्रम या श्रेणीतील असायचे. त्यांची स्वर लावण्याची पद्धत , स्वरातील आक्रमकता मला विशेष भावत असे.

असेच कायम लक्षात राहण्यासारखे सादरीकरण म्हणजे पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादन. लहानपणी पहिलवान असलेल्या हरिप्रसादांनी एक पोकळ हलका-फुलका वेळू हातात घेतला आणि त्यात आपला श्वास फुंकून रसिकांना संमोहित करून सोडले. संध्याकाळची सहा वाजेची वेळ. हरिप्रसादजींनी राग भूप वाजवायला सुरुवात केली. भूप राग फक्त पाच शुद्ध स्वरांचा… ‘सा रे ग प ध’. केवळ पाच सुरांनीही काय जादू घडू शकते ते या मैफिलीत बघायला मिळाले, अनुभवास आले. पंडितजींनी जसजसा राग खुलवायला सुरुवात केली तसतशी मंडपात शांतता आसनस्थ होऊ लागली. पराकोटीची शांतता. सुई पडली तरी तिचा आवाज येईल इतकी ती शांतता. माझ्या संगीताच्या प्राथमिक शिक्षणात राग भूप म्हणजे शांत प्रवृत्तीचा राग असे अभ्यासले होते. परंतु त्याची अनुभूती आज घेत होते. पंडितजींच्या बासरीने संपूर्ण सभामंडपातील प्रेक्षकांना भुरळ घातली होती. जगद्गुरु श्रीकृष्णाच्या बासरीने अख्ख्या गोकुळाला वेड लावले होते, गोप गोपींना संमोहित केले होते या पुराणकथेवरचा विश्वास दृढ झाला.

या कार्यक्रमाला जायचे म्हणजे भरपूर तयारी करावी लागत असे. चार वाजताच संध्याकाळच्या जेवणाचे डबे सोबत घेऊन जायची. बसायला सतरंजी, ऐन हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वेटर, कानटोपी, शाल याची तरतूद करावी लागे. दुचाकीवरून यायचे. पार्किंगसाठी जागा शोधण्याचे दिव्य कर्म करावे लागत असे.

स्टेजवरील कलाकारांना प्रत्यक्ष पाहता येत नसले तरी पडद्यासमोर आम्हा रसिकांची समाधी लागत होती. आजूबाजूचे श्रोतेही खरे दर्दी असत. त्यामध्ये शाळकरी मुलांपासून तर वृद्ध आजी-आजोबांचा समावेश असे. पहिला कार्यक्रम संपल्यानंतर दुसरा कार्यक्रम सुरू होण्याच्या मधल्या काळात काही श्रोते उठून खाण्यापिण्याच्या स्टॉलला भेटी देण्यासाठी जात असत. त्यावेळी इतरांना आपल्या बूट चप्पलचा स्पर्श होऊ नये म्हणून चक्क पायातील वहाण हातात घेत. आपल्या गप्पांमुळे शेजारच्याला त्रास होऊ नये याची खबरदारी घेत. खूप छान, निकोप वातावरण अनुभवायला मिळत असे. यातून अनेक ओळखी घडत होत्या. ओळखीचा मित्र परिवार भेटत होता.

माझ्या दोघी मुलीही समरसून हा कार्यक्रम ऐकत असत. धाकटी श्वेता तर त्यातून टिपण काढत होती. तिला कळलेल्या स्वरांचे नोटेशन लिहून घेत असे. एकदा रविवारी सकाळी एकटीच कार्यक्रमाला गेली. नेहमीप्रमाणे नोटेशन काढून घेत असताना तिला एका पत्रकाराने बघितले आणि त्यांनी चक्क तिची छोटीशी मुलाखत घेतली. ती मुलाखत ‘पुणे मिरर’ या अंकात छापूनही आली. त्या दिवशी सकाळी एका स्नेहीजनाने फोन करून ही खुशखबर सांगितली. लेकीचा खूप खूप अभिमान वाटला. बालवयातच ती व तिच्या मैत्रिणीने एक निश्चय केला होता की, आपण कमवायला लागल्यावर सोफ्याचे तिकीट काढून व्यासपीठासमोर आसनस्थ होऊन हा कार्यक्रम ऐकायचा. त्यांच्या या मनोदयाचे खूप कौतुक वाटले. सवाईला हजेरी लावण्यातील मुलींचे सातत्य बघून मी त्यांना विचारत असे, “लग्नानंतरही सवाईचा कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही माहेरपणाला येत जाल ना?”

आज हे आठवून हसू आले. ६/७ वर्षापासून माझा लहान भाऊ या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेत असतो. त्यामुळे पुढच्या रांगेत सोफयावर बसून हा कार्यक्रम बघण्याची सुवर्णसंधी मला प्राप्त होत आहे. कधी काळी कॅनडाचे काका शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी भारतीय कलाकारांना परदेशात त्यांची कला सादर करण्यासाठी, त्यांचे कार्यक्रम आयोजित करत होते. आज भाऊ तोच वारसा जपत आहे, याचे कौतुक वाटते. त्याच्यामुळे परवीन सुलताना, पं. शिवकुमार शर्मा, महेश काळे, ह्या दिग्गज कलाकारांना भेटता आले. त्यांच्यासोबतचे हे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करता आले.

प्रस्थापित, नामांकित पीढीतील कलाकार वयोवृद्ध होत चालले आहेत. काही काळाच्या पडद्याआड लुप्त झाले आहेत. त्यामुळे आयोजक मोठ्या प्रमाणावर नवोदित कलाकारांना या मंचावर आमंत्रित करताना दिसतात. त्यामुळे निश्चितच हरहुन्नरी युवा पीढी श्रोत्यांसमोर येत आहे. भारतभरातील, प्रसंगी परदेशातील शास्त्रीय संगीताचे साधक शोधून त्यांना मंचावर आणत आहेत, ही एक जमेची बाब आहे. खरोखर ही युवा पिढी तेवढीच तल्लख व आपल्या व्यासंगाविषयी गंभीर आहे. या युवा कलाकारांचा फार मोठा चाहता वर्ग आहे.

कित्येक वर्षांची परंपरा जपणारे रमण बागेतील स्थान बदलून आता मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळ क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होतो. मध्यवर्ती भागाऐवजी हे ठिकाण जरा दूरच आहे. कदाचित त्यामुळेच पूर्वीची ‘मंडप ओसंडून वाहणारी गर्दी’ हे विशेषण आता लागू पडत नाही असे म्हणावेसे वाटते. आजूबाजूला प्रायोजकांसाठी राखून ठेवलेल्या सोफ्यांवरची तुरळक उपस्थिती पाहून मन थोडे विषण्ण होते. त्यामुळे रसिक श्रोत्यांबरोबरची संवादाची तार अदृश्य झाली आहे.

आता तर अनेक संगीतभक्तांनी त्यांच्या त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ विशेष महोत्सव आयोजित करायला सुरुवात केली. जसे आपण गल्लोगल्ली आपल्या इष्ट देवतांच्या मंदिरांची उभारणी करतो त्याप्रमाणेच. असे असले तरी भक्तांना आषाढी एकादशीला भीमातीरीच्या विठू माऊलीच्या दर्शनाची आस असते. त्याचप्रमाणे या सर्व संगीत महोत्सवांच्या मांदियाळीतही खरा संगीतप्रेमी भीमेच्या संगीतधारेत मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतोच.

वंदना लोखंडे,
पुणे

१ जानेवारी २०२६