पहिल्या भागासाठी इथे भेट द्या: ऋणानुबंध.... विठाबाई!
ऋणानुबंध…विठाबाई! - भाग 2
विठाबाई ची आतुरतेने वाट बघणं सुरू होतंच पण ती येईस्तोवर मी बॅंकेत जाऊन काय सिच्युएशन आहे बघून आले. तिथल्या ऑफिसरने सांगितले - “सगळ्या खातेधारकांचे पैसे परत करणार आहोत फक्त सगळे एकरकमी परत न करता महिन्यातून एकदा काहीच टक्के काढता येतील.” ऐकून थोडं हायसं झालं. आता फक्त विठाबाई ने लवकर यायला हवं होतं म्हणजे सगळी कार्यवाही लवकर सुरू करता येणार होती. आधी तर तिची सगळी कागदपत्रं जमा करावी लागणार होती…
आणि एक दिवस बाईसाहेब उगवल्या. “बाईssss”
देव पावला! “आली का विठाबाई” म्हणत लगबगीने दार उघडले… ती तोंडावर पदराचा बोळा ठेऊन हुंदके देतच घरात आली… म्हंटलं बहुतेक हिला बॅंकेबद्दल कळलं दिसतंय.
“काळजी करू नको विठाबाई सगळं ठीक होईल” - मी तिचं सांत्वन केलं. तसंही मी ठरवलंच होतं काहीही करावं लागलं, बॅंकेच्या टॉप लेव्हल पर्यंत जावं लागलं तरी जाईन पण विठाबाईची कष्टाची कमाई बुडू देणार नाही.
माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अजूनच घळघळ अश्रू वाहू लागले. हुंदके देतंच म्हणाली -" काय बेस होईल जी आता? .. काल तं दारू पेऊन लई शिव्या देल्याजी मले.. त्याची बायको न तो… दोगानं बी लई भांडन केलं माह्यासंगं. म्हने डबोलं घेऊन काय वर जानार हाय काय? पैका दे, नाईतं चालती हो इथून… मले जेवालेबी नाई देल्लं जी. थे तं माह्या नातवाले माही दया आली तं चार घास आनून देल्ले त्यानं"… डोळे पुसत पुढे म्हणाली-" माह्या मालकानं बांधलेलं घर बी खुदच्या नावानी लिहौउन घेतलं नं आता मला म्हनत्येत चालती हो? तुमीच सांगाजी बाई रडू नको तर काय करू जी." म्हणून पुन्हा हुंदके देणं सुरू झालं…
तरी मला वाटलंच आज इतक्या सकाळी कशी काय आली ही? आठच वाजले होते. स्नान करून तडक इकडेच आली दिसत होती. थोडा वेळ तिचं सांत्वन केल्यावर विचारलं -
" विठाबाई चहा बिहा तरी झाला की नाही तुझा? "
" नाई जी मले आता तेथं पाय बी नई ठुवायचा न त्याइचं तोंड बघायचं"
तिचे त्यावेळी ग्रहच खराब होते बहुदा. आणि त्यात तिला आधार द्यायचं काम देवाने मला दिलं होतं असं एक क्षण विचार येऊन गेला मनात. अजून बॅंकेचा घोळ तर तिला माहितीच नव्हता " विठाबाई, आधि चहा नाश्ता घे मग बोलू आपण."
पंडित नी पराठे केलेच होते. तिला दोन गरम गरम पराठे, चहा दिला. खाल्ल्यावर, चहा पील्यावर थोडी शांतं झाली. आता बॅंकेची बातमी सांगायची होती.
“विठाबाई, आपली बॅंक आता बंद होणार आहे तर तिथले सगळे पैसे काढून दुसऱ्या बॅंकेत टाकावे लागणार आहेत.”
“व्हय का जी? तुमी म्हनान तसं जी”
बॅंकेवर स्थगिती, हा किती मोठा घोळ आहे ह्याची तिला कल्पनाच नव्हती. म्हंटलं “आपण आता आधी बॅंकेत जाऊ अन काय लिखापढी करायची, काय कागद पत्र हवे ते बघून घेऊ”
" चला न जी मंग"
तिला घेऊन आधी बॅंक गाठली. तिचे अकाउंट डिटेल्स बघितल्यावर कळले दोन फिक्स्ड डिपॉझिट्स पण आहेत तिनी केलेल्या. एकूण तीन लाख जवळपास! आधी अर्ज लिहून द्यायचा होता तो लिहिला, त्यावर तिच्या डाव्या हाताचा आंगठा लावला, त्यावर हा विठाबाई चाच अंगठा आहे म्हणून माझी सही केली. अर्ज दिला आणि परत आलो.
पुढे दर महिन्यात एक फॉर्म भरून त्यात जास्तीत जास्त जितकी रकम काढू शकतो तितकी भरून त्यावर तिचा आंगठा, माझी सही असं करावं लागणार होतं, आणि काढलेली रकम दुसऱ्या बॅंकेत टाकावी लागणार होती. त्याच दिवशी तिला घेऊन जाऊन तिचं बॅंक ऑफ महाराष्ट्रात खातं उघडून दिलं. आता ती सरळ गावी गेली होती. अमरावतीला तिची मुलगी राहायची, जवळच तिचं गाव होतं. मुलीचा थोडा आधार होता तिला.
आता ती आली की आमच्या दोन बॅंकामध्ये चकरा असायच्या. आठ दहा महिन्यात तिचे सगळे पैसे बॅंक ऑफ महाराष्ट्रात जमा झाले. आता ती अजूनच थकली होती. मुलाकडेही जाणं बंदच केलं होतं तिनी. मग तिच्या मुलीशी फोनवर बोलून समजावले की तिचं बॅंक अकाउंट अमरावतीला ट्रांस्फर करून देते म्हणजे तिला फक्त बॅंकेत पैसे जमा करायला इतका प्रवास करावा लागणार नाही. तिलाही पटलं.
पुढच्या वेळी ती आली तेव्हां ते तिचं शेवटचं येणं होतं. त्या दिवशी तिला बॅंकेत नेऊन खातं अमरावतीच्या शाखेत ट्रांसफर करून दिलं. घरी येऊन जेवली. आता रवीनगर बसस्टॅंड वर अमरावतीच्या बस मधे तिला बसवून द्यायचं होतं. म्हंटलं " विठाबाई आठवण ठेव जो"
“आस कसं बोलता जी” म्हणत न रहावून मला घट्ट बिलगली. रडत रडत माझ्या गालांवरून, डोक्यावरून हात फिरवत माझे लाड केले, खूप आशिर्वाद दिले.
ह्या नंतर आम्ही भेटणार नव्हतो. मलाही गहिवरून आलं. फोन मधे दोघींचा एक छानसा फोटो घेतला. तिनी लगेच डोक्यावरचा पदर नीट करत छानशी पोझ दिली.
आज तिच्या साठी शेवटची ड्रायव्हरगिरी करणार होते. तिचाही पाय निघवत नव्हता आणि मलाही विठाबाई आता पुन्हा भेटणार नाही ह्याचं वाईट वाटत होतं. पण तरी रात्रीच्या आत तिनी अमरावतीला पोहचणं गरजेचं होतं म्हणून तिला बसस्टॅंडला घेऊन गेले. बस उभीच होती. तिला बस मधे नीट बसवून कंडक्टर ला
तिची काळजी घ्यायला सांगितली. तिचे अश्रू थांबत नव्हते. पाठीवर हात फिरवून तिला शांत केलं आणि मी खाली उतरले. बस सुरू झाली. खिडकीतून ती दिसेनाशी होईस्तोवर तिचं हात हलवणं दिसत होतं… बस देखिल नजरेआड झाली… विठाबाई गेली होती… पुन्हा कधीच भेटणार नव्हती… पण ऋणानुबंध म्हणजे काय हे शिकवून गेली होती!
सई देशपांडे
02.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026