सुरपाखरू!
लेखनाची इच्छा असणाऱ्यांना लिहितं करण्यासाठीचा हा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे. ह्यात सतत 30 दिवसात 30 लेख लिहायचे आहेत. ते लेख, कथा, क्रमशः कादंबरी किंवा इतरही कुठलेही प्रकार असू शकतात. एका दिवसात कमितकमी 250 शब्द लिहायचे आहेत. आज पासून मी ह्या उपक्रमात सहभागी होतेय. श्री तुषार जोशींचे आभार त्यांच्या वॉलवर ह्या उपक्रमाची माहिती मला मिळाली.
30 दिवसात माझ्या हातून काय काय लिखाण होतं बघूया. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेतच. आशा आहे आपण वाचक म्हणून माझ्या लिखाणाचा आनंद घ्याल.
सुरवात माझ्या आयुष्यात थोडेच दिवस आलेल्या पण कायमच्या सुंदर आठवणी देऊन गेलेल्या व्यकतिंविषयी, ज्या अनुभवांमुळे मला जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांवर विश्वास ठेवावासा वाटतो. आजची व्यक्ती आहे विठाबाई!
ऋणानुबंध… विठाबाई!
जेमतेम साडेचार फूट उंचीची विठाबाई…
पण माझ्या आयुष्यात मात्र अफाट उंचीचं नातं घेऊन आलेली.माझ्या आयुष्यातली ही अकल्पनीय ऋणानुबंधाची गोष्ट आहे.
माझे यजमान अजय शाळेत होते, तेव्हापासून विठाबाई आमच्या सासरी धुणी-भांडी करायच्या. कष्ट हा तिच्या श्वासात मिसळलेला शब्द होता. एकेक पई जपून, जोडून, संसाराचा डोलारा तिने स्वतःच्या हातांनी उभा केला होता.
माझे सासरे लेबर कोर्टात जज. त्यांनी तिच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा वळणाचा क्षण घडवला—“बँकेत खाते उघड. पैसे घरात ठेवू नकोस.”
त्या दिवसापासून विठाबाईचा संसार थोडासा सुरक्षित झाला. अजय शाळा–कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी बँकेची कामं करायचे. वेळ पुढे सरकला. अजय नोकरीसाठी बाहेर गेले. आमचं लग्न झालं. मुलं झाली. अनुभवाची गाठ पाठीशी घेऊन आम्ही नागपूरला परत आलो आणि व्यवसाय सुरू केला.
आम्ही परत आलो, हे कळताच विठाबाई पुन्हा हजर झाली.यावेळी मात्र तिची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती.आता ती खूप वयस्कर झाली होती. अंगात त्राण उरलं नव्हतं. कामं होत नव्हती.
पण आयुष्यभराच्या कष्टातून तिने जे जमवलं होतं, ते अभिमानास्पद होतं. जवळपास दोन लाख रुपये… काही फिक्स्ड डिपॉझिट्स…
अधूनमधून गावाला शेतीची कामं करायची. पैसे जमले की, “बँकेत टाकून द्या” म्हणून माझ्याकडे यायची.
आजही तो क्षण अगदी जिवंत आहे.
सकाळी साधारण नऊ–साडेनऊ.
तुळशी वृंदावनाच्या दाराशी उभी राहून तिचा आवाज यायचा—
“बाईssss…”
आमच्या बंगल्याला चार दिशांना दारं होती. डाव्या अंगणात तुळशी वृंदावन. तिथूनच कामवाल्या, जवळची माणसं ये-जा करायची. म्हणून त्या दाराचं नावच पडलं होतं… तुळशी वृंदावनाचं दार.
कामात गर्क असलेली मी आवाज ओळखून हाक मारायचे, “आली का विठाबाई?”
“हो जी… याद आली जी तुमची,”
असं म्हणत नऊवारी गुडघ्यापर्यंत नेसलेली विठाबाई, वाकलेली कंबर सरळ करून, दोन्ही हात कमरेवर ठेवून वाट पाहत उभी राहायची. तिच्या रूपात विठोबाच उभा असल्याचा भास व्हायचा.
“बस बस, आलेच,” असं म्हणत मी दार उघडायचे.
आत आली की आधी हालहवाल. मुलगा, सून कसे त्रास देतात, कोण काय बोललं, कोणी काय केलं… सगळी दुःखं मोकळ्या मनानं सांगायची. माझ्याबद्दल तिला काय वाटायचं, ते कधी कळलं नाही; पण माझ्यासमोर ती निःसंकोचपणे मन मोकळं करायची.
थोड्या वेळाने हळूच म्हणायची,
“ब्यांकेत चला नं जी… थोडंसक पैसे जमा करून द्या नं जी…”
आणि मग नऊवारीच्या केळातून चुरगळलेल्या नोटांची एक घट्ट घडी काढून माझ्या हातात ठेवायची. “मोजून द्यानं जी…”
मी मोजायचे… कधी पाच हजार, कधी दहा हजार.
रक्कम सांगितली की तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहण्यासारखं असायचं. स्वतःच्या कष्टाचं फळ ती प्रचंड विश्वासानं माझ्या सुपूर्द करायची.
जेवण होईपर्यंत मला निघणं शक्य नसायचं. तोपर्यंत ती काही ना काही काम मागायची.पालेभाज्या निवडणं, शेंगा सोलणं, लसूण सोलणं… हलकी-फुलकी कामं.
उन्हाळा असो, हिवाळा असो…
पारिजातकाच्या झाडाखाली, विहिरीजवळची जागा तिची आवडती. तिथेच ठाण मांडून बसायची.
जेवायची वेळ झाली की मी आवाज द्यायचे—
“विठाबाई, चल जेवायला.”“
हो जी,” म्हणत सगळं आवरून नीटनेटकेपणानं आणून द्यायची.
स्वयंपाकघरात खालीच जेवायला बसायची.
“आणखी वाढू का विठाबाई?”
“लई बेस झालं जी… काई बी नको.”
एकच वाढ तिला पुरेशी असायची. क्वचितच काही फारच आवडलं, तरच मागायची.
आणि मग, आमचा मोर्चा बँकेकडे वळायचा…
ऑफिस मधली माणसं, तीन ड्रायव्हर असे सगनळे असूनही ती कुणाच सोबत जायला तयार नसायची. मलाच घेऊन जायची. मलाही तिचा आग्रह मोडवत नसे, तिच्या बद्दल काय वाटायचं माहीत नाही पण कधी कधी तर ड्रायव्हर नसला तर मी ड्रायव्हरगिरी करायची आणि ती मस्त हक्काने माझ्या बाजूला थाटात बसून बॅंकेत जायची.
पण एक दिवस माझ्या साठी मोठी काळजी घेऊन आला. रिझर्व्ह बॅंकेने ह्या बँकेवर (धरमपेठ महिला को-ऑपरेटिव्ह) स्थगिती आणली होती, हे कळलं…
आणि त्याच क्षणी माझी काळजी शिगेला पोहोचली.विठाबाई त्या वेळी गावाला गेली होती.तिला निरोप कसा द्यायचा, हा मोठाच प्रश्न होता. तिच्याकडे फोन नव्हता. आणि तिच्या मुलगा, सून यांनाही तिने बँकेबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं.
खूप विश्वासानं तिची सगळी कमाई ती फक्त मला सांगत असे.
त्या दिवसापासून मी रोज तुळशी वृंदावनाच्या दाराकडे पाहू लागले.
सकाळी नऊ झाले…
साडेनऊ झाले…
पण तो ओळखीचा आवाज आला नाही..
“बाईssss…”
विठाबाई कधी येईल?
तिला ही बातमी कशी सांगणार?
आणि सगळ्यात मोठा प्रश्न—
तिच्या आयुष्यभराच्या कष्टाचं काय होणार?
बँकेचं पुढे काय झालं?
विठाबाई परत आली का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं—
विठाबाईला तिचे पैसे परत मिळाले का नाही?
हे सगळं जाणून घेण्यासाठी
उद्याचा पुढचा भाग वाचायला विसरू नका….
क्रमशः
सई अजय देशपांडे
01.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
पुढचा भाग: ऋणानुबंध..... विठाबाई! भाग 2