नरेंद्र मोदींचे वय या १७ सप्टेंबरला ७५ पूर्ण होईल, त्यामुळे त्यांनी किमान पंतप्रधान पदावरून निवृत्त व्हावे अशी कुजबुज जरा जास्तच मोठ्या आवाजाने सुरू आहे.संघाचाही दबाव आहे.
पण मोदींनी खरंच निवृत्ती घ्यावी का?
मोदींसोबतच बरेच राष्ट्रीय स्तरावरील लोक ७५ वर्षांचे होत आहेत. ते सारेच कार्यनिवृत्ती घेतील का?
मोदींनी निवृत्ती घेतल्यावर पुढे होणारा पंतप्रधान खरंच त्या क्षमतेचा असेल का?आणी सध्या असा नेता कोण आहे?
एखाद्या सामाजिक संघटनेच्या नेत्याने वयाच्या ७५ व्या वर्षी कार्यनिवृत्त होत बाजूला होणे व सक्षम पंतप्रधानाने कार्यनिवृत्त होत बाजूला होणे यात फरक आहे.पण सध्या सामाजिक संघटने मधील शिर्ष नेतृत्व ७५ वर्षात निंवृत्त होताना दिसत नाही. नरेंद्र मोदी १७ सप्टेंबरला आणी मोहन भागवत ११ सप्टेंबरला ७५ वर्ष पुर्ण करतील,मग काय हे दोघंही निवृत्त होतील?
सायरस मिस्रीच्या हातात टाटा उद्योगाची धुरा सोपवुन हाच प्रयोग रतन टाटांनी केला होता. पणपुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे.
टाटा उद्योगाची अनेक क्षेत्रात पिछेहाट झाली. शेवटी रतन टाटांना तो ढासळता डोलारा पुन्हा सावरावा लागला व अगदी मृत्यूच्या दिवशीपर्यंत ते या कामात गुंतले होते.
कार्यनिपुणता ही यांत्रिक प्रक्रिया नाही. यंत्र सुरू बंद करायला माणसं ठेवता येतात. यंत्र दुरुस्त करायलाही ठेवता येतात,पण गरजेनुसार यंत्र निर्मिती व गरजेनुसार निर्णयतत्परता है गुण मुशीतून तयार होत नाही. जन्मतःच या क्षमता अंगी असाव्या लागतात. कार्यक्षम दिसणे व कार्यक्षण सिद्ध होणे या दोन अलग अलग बाबी आहेत.
सर्वांसोबत काम करतांना कार्यनैपुण्य दिसून पडणे अलग व मुख्यजागी पोहचल्यावर तत्त्व व व्यवहार यांची सांगड घालत व्यवसायाला कालसुसंगत युगानुकूल ठेवणे अलग!
मोदींना काही समजत नाही…
हे वाक्य कोणीही ऐरागैरा सहज वापरतो,घरी बायकोने सांगितलेल काम विसरणाराही मोदींविषयी असे बोलणे समाज सहजच ऐकून घेतो. पण आपल्या वेंधळेपणा बद्दल सांगायला कचरतो.
त्यामुळे खरं म्हणजे ते वाक्य “मोदींना काही समजत नाही!” असे नसून “मोदी मला कळत नाही” वा “मोदी मला (काहीच) समजत नाही!” असे असते.
सम्राट विक्रमादित्य व शालिवाहन यांच्या क्षमतेचा हा नेता कोणाचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून शुन्यनिद्रा साधना करत कार्यरत नाही. मी माझ्या कौशल्याचा अत्त्युच्च वापर करत भारताला एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवीन, या भावाने मोदी क्षणनक्षण कार्यरत आहेत. हजार वर्षांची घसरगुंडी केवळ दहा वर्षात थांबली म्हणजे मोदींचे इहकर्तव्य संपले असे नाही. राष्ट्राचा गडगडलेला हा डोलारा पुन्हा न भुतो न भविष्यती अशा उंचीवर न लवकरात लवकर नेऊन ठेवायचा आहे.
“देश सावरला गेला आहे. आता तुम्ही ७५ वर्षांचे होणार, त्यामुळे कार्यनिवृत्ती घ्या” , हे म्हणणे म्हणजे देश आपल्या इप्सित प्रगतीपथाकडे जात असतांना पिछेहाट होऊ नये म्हणून लावलेली पाचर काढणेच आहे.
अगदी मोदीच काय,नितिन गडकरींनीही कार्यनिवृत्ती घेऊ नये. कारण गडकरींना केवळ बांधकाम मंत्री नाहीत,तर ते संपुर्ण भारताला जोडणारे विश्वकर्मा आहेत. बांधकामा ऐवजी संरक्षण वा गृह खाते जरी गडकरींकडे दिले तरी ते तेवढ्याच क्षमतेने ते ते विभाग चालवतील.
सेवानिवृत्ती व कार्यनिवृत्ती यात फरक आहे. सेवानिवृत्ती ही नौकरी भावनेने केलेल्या कार्याची असू शकते की आता यापुढे नवीन दमाच्या व्यक्तीकडून हे काम करवून घेऊ.
नौकराची सेवानिवृत्ती व दासाची कार्यनिवृत्ती यात फरक आहे. नौकराला कामातून उसंत हवी असते,दासाला कामापुढे उसंत माहित नसते. अखंड कार्यरत राहावे व आपले काम स्वामीने सांगितल्यागेल्या प्रमाणे वा गरजेनुसार घडावे येवढेच त्याला माहीत असते. त्यामुळे नौकराचे काम दास करू शकेल पण दासाचे काम नौकर करुच शकत नाही.
मोदी वयाने ७५ वर्षांचे होतील, हे कालगणेनेनुसार ठिक आहे. पण म्हणून मोदींच्या क्षमता आता कमी होतील, हे आपण कसे ठरवणार?
मोदींचे केस पिकले, पण भारत मातेला उज्ज्वलते पर्यंत पोहचवण्याचे त्यांचे विचार व कार्यपद्धती दोन्हीही अगदीच सुस्पष्ट आहेत.
जसे शिक्षणाने विद्या येते पण ज्ञान नाही, तसेच समाजकारण वा राजकारणात आहे, म्हणून कर्तबगारही आहेच, असे होत नसते. ज्ञान ही विद्येची अनुभुती असते, जी मुशीत वा पुस्तकाबाहेर बघितल्या शिवाय येत नाही. तसेच साचेबद्ध सामाजिक कार्य वा राजकारण करणारे देशात लाखो लोक आहेत. पण दास्यभावाने स्वार्था पलिकडे देशाला जगात अव्वल स्थानी बसवायला मोदींचा अनुभव व त्यांची कृती यांची देशाला नितांत गरज आहे.
मोदींची केवळ भारतालाच नव्हे तर जगाला गरज आहे. भारत मातेला विश्वगुरू करु म्हणजे व्हॅटिकनमध्ये भारतमातेची मुर्ती स्थापित करू असे नव्हे.
जगात भारताला हे स्थान मिळवून द्यायला मोदी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांचे वय बघण्या ऐवजी त्यांची शारीरिक व वैचारिक स्थिती बघून “मोदीजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” हे ज्यांना म्हणणे शक्य आहे, त्यांनी नक्की म्हणावे. पण जे हा नारा उच्चारू शकत नसतील त्यांनी भारतमातेच्या उज्ज्वल पथावर मोदींची गाडी चालली असतांना वय नावाचे गतीरोधक तिथे बसवू नये.
भारताचे विश्वगुरूपद हे अमेरिका, इंग्लंड, रशिया जापान, चिन आदी देशांच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करणारे नसेलच. या देशांमध्ये जेंव्हा जेंव्हा माणुसकीचा कडेलोट होत राक्षसी वृत्ती नांदू लागले तेंव्हा तेंव्हा सुराज्य स्थापनेची एक शेवटची आशा म्हणून ते भारताकडे येतील व धर्मसंस्थापनेचे (संविधान म्हणू) युगानुकूल सुत्र ते भारतातून घेऊन जातील.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ९ जुलैला “राजकिय शिर्ष नेतृत्वाने ७५ वर्ष वय झाल्यावर पुढे झुकावं” हे विधान केल.ज्यामुळे काँग्रेसला हा मुद्दा मिळाला,पण भाजपने “२०२९ पर्यंत मोदीच असतील” हे स्पष्ट केल.ही चर्चा आता देशभर चघळल्या जाईल आणी यातुन सुवर्णमध्य साधुन मोदी योग्य निर्णय घेतीलच.
अजय घोरपडे
रविवार,१३ जुलै २०२५
#सुरपाखरु