काय लिहावं .........

मूळ प्रकाशन: काय लिहावं ……… - सुरपाखरू साहित्य

२५ जुलै….. चातुर्मासाची सुरुवात…. चातुर्मास म्हणजे संकल्पपूर्वक व्रतस्थ राहण्याची वेळ. सनातनी हिंदू म्हणून आहार आणि आचरण यांवर कुलाचाराप्रमाणे निर्बंध असतातच. ते पाळतोच. पण चातुर्मासात “दिसामाजी काही लिहावे” म्हणून श्री. विजयराव देशमुख ह्यांनी आग्रह धरला. सुरपाखारू च्या ३० दिवस ३० लेख ह्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. मी लिहावं म्हणून नुसता आग्रह करून थांबले नाहीत तर तगादा लावला. शेवटी प्रयत्न करून पाहू म्हणून सुरुवात केली.

काय काय लिहिलं? योग, अध्यात्म, भुजंगप्रयात वृतांत कविता, ऍडमिशन करतानाचे व इतर किस्से, मराठी गझल, पंच परिवर्तन, इतिहास, ललित लेखनासोबत विडंबन…. संस्कृत समस्यापूर्ती सोबत उर्दू शायरीचं रसग्रहण…. काय काय नाही लिहिलं ….. अगदी मनसोक्त मुशाफिरी करून घेतली ह्या ३० दिवसात….. खर तर लिहिण्यापेक्षा त्याआधीची तयारी आणि त्यानंतरचा सुस्कारा जास्त आवडला…. नवीन लेखक कळले, वाचायला नवीन खूप मिळालं', आपल्याला अजून किती शिकायचं बाकी आहे ह्याचा पुन्हा प्रत्यय आला. अनेक प्रस्थापित, नवोदित, सिद्धहस्त आणि आमच्यासारख्या धडपडणाऱ्या लोकांचे लेख, कथा, आणि सर्व साहित्य वाचायला मिळालं. स्पष्ट बोलायचं तर स्वतःची लायकी किती वाढवायची गरज आहे ते समजलं. अगोदर भाषणं ठोकणे, वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेणे, कथाकथन करणे हे सगळं करून झालं होतं …. त्याचा एक बऱ्यापैकी दर्प पण होता… पण आता खरोखर लिहिणं, त्यात ही दुसऱ्याला आवडेल ते लिहिणं आणि त्यातही दुसऱ्याला आवडेल असा खरं लिहिणं किती अवघड असतं ह्याचा प्रत्यय आला.

अल्प विद्या परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥

अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥

तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥

ह्याचा अर्थ आता कुठे समजायला सुरुवात झाली आहे….

३० दिवस झाले, ३० लिखाण झाले…. आता काय? समाप्ती? समारोप? सांगता? कि उपसंहार?

समाप्ती नाही, कारण हा शब्दच मुली समापत्ती वरून आलेला आहे असं वाटतं …. समापत्ती, म्हणजे सम (योग्य प्रकारे), आ(पर्यंत), पद (पोचणे किंवा प्राप्त करणे). मी अजून तरी कुठे पोचलेलो नाही म्हणून ही समाप्ती मी मानत नाही.

मग हा समारोप का? रुह धातूपासून झालेलं हे रूप आहे… रुह म्हणजे रोपणे, रोपट्यांच्या बाबतीत म्हणतो तसं … काहीतरी रुजलंय हे खरं ….

मग ही सांगता आहे का? हा मूळ शब्द सांगोपांग असावा. म्हणजे सह अंग उपांग ….. अगदी बारीक डिटेल्स सकट …. इतकं ३० दिवसात माझा तरी नाही झालाय… मग ही सांगता पण नाही.

मग काय उपसंहार? हा शब्द संस्कृत भाषेतील उपसर्ग, सम धातु आणि प्रत्यय मिळून बनलेला आहे:उप (उपसर्ग) – जवळ, खाली किंवा विशिष्ट पद्धतीनेसम् (उपसर्ग) – एकत्र, चांगले किंवा पूर्णपणेहृ (धातू) – हरण करणे, नेणे किंवा गोळा करणे/समेटणे (√हृ – to draw, take, or bring together) आपण शोध निबंध किंवा क्लिष्ट विषयाच्या शेवटाला म्हणतो हे….

मग आता ३० दिवसानंतर नक्की काय?

खरंच प्रश्न आहे…. मी उत्तर शोधतोच आहे पण…..

आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥१॥

साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥

काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥

तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥३॥