मोहन जोशी यामचा जुलै २०२६ पथकाचा समारोप

मूळ प्रकाशन: सूरपाखरू चा समारोप - सुरपाखरू साहित्य

मी आतापर्यंत अनेक वेळा हिमालयात भटकंती केली आहे,आणि त्यात मला एक गोष्ट नक्की समजलेली आहे की, आपल्याला अश्या कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तेथूनच बोलावणे यावे लागते , असेच काहीसे आमच्याबाबतीत सुरपाखराबाबत झाले. आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर दीपकने फक्त एक साधे निमंत्रण पाठविले , आणि का म्हणून माहीत नाही पण, आम्ही दोघांनी तेथे जायचे ठरविले. ह्याआधी माझा लेखन क्षेत्राशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता ,पण ह्या नवदृष्टी सभागृहातील दोन तासानंतर मला खरेच काहीतरी नवदृष्टी मिळाली असावी , असे वाटते आणि आम्ही दोघांनी महिनाभर व्यक्त होण्याचे व्रत घ्यायचे ठरविले.

Image.png

हे व्रत तर घेतले , पण दवाखाना, शेती,गाव,घरची कामे सगळे सांभाळून लेखन करायचे, म्हणजे थोड धाडसच वाटत होते. हे धनुष्य पेलवेल की नाही, ह्याबाबत मन शाशंक होते . त्यात तुषार जोशींचा धाकही वाटत होता , पण पाहता पाहता हे व्रत पूर्ण झाले आणि आता मी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

हे व्रत पूर्णत्वाला नेण्यासाठी , जसे मला तुषारचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले, तसेच प्रोत्साहन मला माझ्या फेसबुक मित्रांकडून मिळाले आहे . माझा एक मित्र गुजराथी तर दुसरा दक्षिण भारतीय, ह्या दोघांनी तर , तू आमची मराठीची शिकवणी घेतलीच पाहिजे, अशी विनंती केली आहे. माझ्या माय मराठीला माझे परप्रांतीय मित्र स्वतः हुन स्वीकारीत आहेत , ह्यापेक्षा काय आनंद असावा !

माझे व्याही मराठीत डॉक्टरेट आहेत , त्यांनी सुद्धा मला चांगले लिहीत असल्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे. माझ्या एम.डी.चे गाईड श्री भातकुले सर , ह्यांनी सुद्धा माझे कौतुक केले आहे . माझ्या कितीतरी मित्रांनी आणि माझ्या खुप नातलगांनी , माझ्यावर कौतुकाचा सतत वर्षाव करीत, मला पूर्ण महिनाभर हे व्रत पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे . माझ्या सहधर्मचारिणीने माझ्या ह्या वेळीअवेळी सुरू असलेल्या लेखनकार्याला सहिष्णुता पूर्वक पाठिंबा दिला आहे, त्यासाठी वरील सर्व जणांचे , मी मनापासून आभार मानतो आहे.

ह्या सुरपाखराने केलेल्या परीस स्पर्शानंतर , आणि एव्हाना माझा आत्मविश्वास आता सातव्या ढगावर पोहचल्यामुळे , पुढे तुमच्यासाठी , काय काय मांडून ठेवले असणार , ह्याची कल्पना तुम्हीच करू शकता ! तर भेटूया मग @ अक्षरयात्री साप्ताहिक # सुरपाखरू येथे दर आठवड्याला

1 Like