विज्ञान आणि अध्यात्म!
गणित माझा लहानपणी पासूनच आवडता विषय आहे. लहानपणी तर गणिता बद्दल इतकी आपुलकी होती की कंटाळा आला की गणितं सोडवत बसायचे. कदाचित कुठल्याही समस्येचं समाधान काढण्याच्या माझ्या प्रवृत्ती मुळे मला गणितं सोडवायला आवडायचे. पुढे मी गणितात एम एस सी केलं तेव्हा एक विषय स्फेरिकल ट्रिग्नॉमेट्री हा होता.
स्फेरिकल ट्रिग्नॉमेट्री म्हणजे गोलाच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या त्रिकोणांचा अभ्यास. या त्रिकोणांच्या बाजू (sides) सरळ रेषा नसून गोलावरील महावर्तुळांच्या (Great Circles) कमानी असतात. विषुववृत्त, अक्षांश, रेखांश इत्यादी पृथ्वी वरील ह्या काल्पनिक रेषांवरून आपल्याला अंदाज येईल.
आपण शाळेत शिकलेली त्रिकोणमिती ही सपाट पृष्ठभागावरील त्रिकोणांवर आधारित असते. परंतु पृथ्वी गोलाकार आहे, आकाशाची कल्पनाही गोलाकार स्वरूपात केली जाते आणि अनेक खगोलीय मोजमापेही गोलाकार पृष्ठभागावर केली जातात. अशा वेळी साधी त्रिकोणमिती अपुरी पडते आणि तेथे स्फेरिकल ट्रिग्नॉमेट्री (Spherical Trigonometry) उपयोगी ठरते.
या शाखेचा उपयोग अत्यंत व्यापक आहे. विमानचालन आणि समुद्री नौकानयनात दोन ठिकाणांमधील सर्वात कमी अंतर शोधण्यासाठी स्फेरिकल ट्रिग्नॉमेट्रीचा आधार घेतला जातो. खगोलशास्त्रात ग्रह, तारे आणि उपग्रहांची अचूक स्थाने मोजण्यासाठीही याच तत्त्वांचा वापर होतो. आधुनिक GPS प्रणाली, उपग्रह संप्रेषण आणि अवकाश मोहिमांमध्येही ही गणितीय शाखा महत्त्वाची भूमिका बजावते.
आजच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्फेरिकल ट्रिग्नॉमेट्रीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. हवामानाचा अंदाज, उपग्रहांचे मार्ग, पृथ्वीचे नकाशे तयार करणे, अंतराळ संशोधन आणि जागतिक स्थाननिर्धारण प्रणाली या सर्व क्षेत्रांत तिचा प्रभावी वापर केला जातो.
ह्या सगळ्या विषयांवर आधारित मुख्यतया ग्रह आणि ताऱ्यांवर आधारित मोठाली प्रमेये (theorems) आम्हाला ह्या विषयात सोडवावी लागायची. ती सोडवताना ब्रम्हांडाच्या व्याप्ती बद्दल मला खूप कुतूहल वाटायचं आणि त्यावेळी इतक्या मोठ्या ब्रम्हांडासमोर आपण किती क्षुल्लक आहोत ह्याची जाणीव प्रकर्षाने झाली. अध्यात्मिक विचारांचं बीज माझ्या मनात तेव्हांच पेरल्या गेलं. असा आध्यात्मिक अनुभव पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणाऱ्या अंतराळवीरांना देखिल होतो, जेव्हा ते पृथ्वीला दुरून बघतात… त्यांना इतकी मोठी पृथ्वीच इतकी लहान इतकी एकटी दिसते तेव्हां जाणवतं आपण तर ह्या पसाऱ्या समोर काहीच नाही…
असा भक्ति मार्ग आणि ज्ञान मार्गा पैकी ‘विज्ञानाचा अभ्यास’ हा ज्ञान मार्ग देखिल शेवटी अध्यात्मात कडेच नेतो!
फोटोत 6 एप्रिल 2026 रोजी, आर्टेमिस II च्या टीमने ओरियन अंतराळयानातून चंद्राच्या दूरच्या बाजूने केलेल्या उड्डाणादरम्यान पृथ्वी उदयाचे
फोटो काढले. ह्यात पृथ्वी, अर्ध चंद्रासारखी आकाशात, अंधारात एकटी दिसते आहे…
सई देशपांडे
30.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
