मूळ प्रकाशन: व्यवहार कौशल्य शिक्षणाचे माझे गुरुवर्य - सुरपाखरू साहित्य
व्यवहारकौशल्य शिक्षण हा शालेय शिक्षणाचा भाग नसतो, त्यामुळे जीवन आवश्यक असलेले हे शिक्षण अनौपचारिक पद्धतीने आपल्याला मिळत असते. समाजात जीवनातील सर्व व्यवहार कसे चालतात, हे , ट्राइल अँड एरर , पद्धतीने पुढे आपण जन्मभर शिकत राहतो . व्यवहार कौशल्य शिक्षण म्हणजे फक्त आर्थिक व्यवहाराचे नसुन, समाजात दोन व्यक्ती एकमेकासोबत कसे वागतात, किंबहुना कसे वागायला पाहिजे, ह्याचे शिक्षण , असे अपेक्षित आहे. सहसा , हे व्यवहारकौशल्य शिक्षण कुटुंबातील संस्काराचा भाग असतो, पण आपल्या समाजात बालपणी ह्यापासून आपल्याला हेतुपरस्परपणे वंचित ठेवले जाते आणि मग पुढे जन्मभर , ते आपण समाजाकडून मिळवीत राहतो . मी ज्यांच्याकडून हे शिकलो , त्यांची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला झालेली ही आठवण .
व्यवहार शिक्षणाचे माझे पहिले गुरु म्हणजे धनजी काका , अगदी लहानपणी माझी त्यांच्याशी ओळख झाली. आपल्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा काढून तो , भविष्यासाठी सुरक्षित ठेवला पाहिजे,आणि शक्यतो तो पैसा , कधीही खर्च करू नये, हे त्यांनी मला शिकविले. असा उत्पन्नाचा चौथा भाग वेगळा काढून,थेंबे थेंबे तळे साचे, ह्या न्यायाने नियमित धनसंग्रह कसा निर्माण होतो, ह्याचे धनजीकाका उत्कृष्ट उदाहरण आहेत . कोणतीही गोष्ट विकत घ्यायची असेल,तर खिश्यात अग्रिम द्यायची रक्कम , आणि लेखी करार करायचा कागद , सोबत नेण्याचे शिक्षण , मला काका कडूनच मिळाले, ह्याचा फायदा मला माझ्या भविष्यातील कितीतरी व्यवहारात झाला.
व्यवहार शिक्षणाचे माझे दुसरे गुरु म्हणजे , माझे हातेकर मामा , पब्लिक प्रॉविडेंट फंड मध्ये केलेली गुंतवणूक सहसा खर्च न करता , तीच आपल्या निवृत्ती वेतनाची सोय समजावी, हे त्यांनीच मला शिकविले. कोणतेही व्यवहार तोंडी न ठेवता त्याचे कायदेशीर लेखी स्वरूपात रूपांतर करण्याचे शिक्षण त्यांनीच मला दिले. वाहतुकीचे नियम पाळत चौकात उभे असतांना , आपले वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे नेता कामा नये , हे त्यांनीच मला शिकविले. सरकारी कामासाठी अर्ज करतांना पूर्ण अर्जाची अतिरिक्त झेरॉक्स कॉपी काढून ठेवण्याचे शिक्षण सुद्धा मामांनीच दिले.
व्यवहार शिक्षणाचे माझी तिसरी गुरु म्हणजे माझी सहधर्मचारिणी , राधा . कुटुंबातील आर्थिक व्यवहारांचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने कसे करायचे असते , त्याचे शिक्षण मला तिने दिले. तिचे वडील शेतीअर्थशास्त्र विषयाचे शिक्षक होते , त्यामुळे आपल्या भविष्यातील करावयाच्या सर्व जबाबदाऱ्या समयोचित पद्धतीने, तिने लेखी स्वरूपात सहज रित्या तयार करून दिल्या आहेत. कोणत्या वर्षाला काय करावे लागेल, त्याचा किती आर्थिक भार पडणार, हे सर्व आमचे तयार झालेले असते . त्यामुळे मुलांची शिक्षणे, लग्न, सणासुदीला द्यायच्या भेटी, कुटुंबाच्या सहली, आमच्या परदेश वाऱ्या, हिमालयातील भटकंत्या अश्या कोणत्याही गोष्टीचे खर्चाचे पाकीट आमचे आधीच तयार ठेवलेले असते . त्याशिवाय कोठे,कोणाशी काय बोलायचे,काय नाही बोलायचे,कसे कपडे घालायचे, ह्याचे धावते शिक्षण वेळोवेळी मिळत असते, ते वेगळे.
समाजात वावरताना आपल्याला ह्या व्यवहार कौशल्याची पदोपदी गरज भासत असते,आणि त्यावरच आपले समाजातील यशस्वी स्थान अवलंबून असते. प्रत्येकाला हे शिक्षण आपापल्या अनुभवातून पदोपदी मिळत असते, आणि ते शिक्षण देणारे गुरुवर्य आपल्याच आजूबाजूला सदोदित वावरत असतात, त्या सर्वांना गुरुपौर्णिमा निमित्ताने नमन आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा.