वारी! (कथा - भाग 2)

वारी! (कथा - भाग 2)

अनुजाचं आणि तिच्या मैत्रिणींचं वेळापत्रक मागे पुढे झालं होतं. पण वारीत अनुजाची एका खेडेगावातून वारीला निघालेली एक छान मैत्रिण झाली होती आणि ती पण एकटीच असल्याने अनुजा तिला आपल्या सोबत कार मधे बसवून घ्यायची…

पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा अनुजाने तिला चिडवत म्हंटलं “तू तर 'रखमा बाई’च आहेस तुला काय गरज विठोबाला भेटायला जायची?”
ती पण तशीच मिश्किल पणे म्हणाली "अवं ताई काय सांगू त्यो लोकाइ च्या गोंगाटात इतका अडकला व्हंय, का बायकोची कईच चिंता न्हाई त्याले… मलेच त्याची खबरबात घ्याले जा लागते. कुनी तरी ईट देल्ली त्याले उभं ऱ्हायले, नं त्यो झाला उभा थेतच. आता का सांगावं… " तिनी असं म्हंटलं अन दोघी खळखळून हसल्या.
अनुजाला मोकळे पणाने बोलणारी, हसरी, खूप आपुलकीने वागणारी रखमा मनाला भावून गेली. तिचा नवरा गावाजवळच्या एका फॅक्टरीत गार्ड होता. ही तिथेच कामाला होती सोबतचे सगळे वारीला निघाले म्हणून ही पण निघाली. बाकीचे एक दिवस आधी निघाले म्हणून थोडे पुढे होते. अनुजा तिला आपल्या कार मधे बसवून उद्या तिच्या सोबतच्या लोकांपर्यंत पोहोचवणार होती… पण मग रखमा अनुजाची काळजी घ्यायला ह्या तिघांसोबत अकोल्याला आली होती.
तासाभरा पूर्वी अनिकेतला “म्या आत्ता येतो” सांगून ड्रायव्हरला घेऊन कुठे तरी गेली आणि आली तर हातात एक डबा.. त्यात कसला तरी काढा घेऊन आली होती.

अनिकेत जवळ येत म्हणाली “साइब, तुमी तं सर्वे हुशार मानसं… तुमी बी सर्वे उपाय करूनच ऱ्हायले पर माहं बी म्हननं थोडं ऐका… हा पिपराइच्या (पिंपळाच्या) पानाचा काढा करून आनला व्हंय मिनं… हा घुट घुट टाका ताईच्या तोंडात… बगा कशी ताजीतवानी होते ताई”
ती वारकऱ्यांच्या ठिकाणावर जाऊन काढा बनवून घेऊन आली होती.

हर्ष अनिकेतनी एकमेकांकडे बघितलं… आता सगळे उपाय त्यांना करून बघावे वाटत होते. हर्ष डबा घेऊन नर्स जवळ गेला. तिने डॉक्टरची परवानगी घेऊन थोडा थोडा काढा नळीनं तोंडात टाकणं सुरू केलं. आणि काय आश्चर्य!
अर्ध्या तासात अॉक्सीजन लेव्हल वाढायला लागली. शरीर इतर औषधांना, ट्रीटमेंटला रिस्पॉंड करू लागलं. आणि पुढील आठ दिवसात अनुजा घरी जाण्या लाइक बरी झाली. हृदय थोडं नाजुक झालं होतं पण घरी सगळ्या सोयी अनिकेत हर्ष ठेवणारच होते.

अनुजाची एक इच्छा मात्र अजूनही होती ती तिनी अनिकेतला बोलून दाखवली " रखमा माझ्या साठी वारी सोडून इथे आली… तिचं एकादशीचं पंढरपूरचं दर्शन चुकायला नको.तिला आपल्या गाडीने पंढरपूरला सोडून द्या."
तसं अनिकेत नी रखमाला बोलवलं.
“मी ताई बगर वारी पूर्न करनार नाई जी… ताईची लई इच्छा व्हंती विठूरायाले भेटायची. आता विठोबानंच त्याइले समदं बरं केलंय… मंग दर्शनाले जाले पाहिजे नगं? इचारा तुमच्या डाक्टर साइबाले”

‘हे नवीनच काढलंस रखमा… असं शक्य नाही. आम्ही तुला कार अन् ड्रायव्हर देतो तो तुला सुखरूप पंढरपूरला सोडेल’ अनिकेत थोड्या कडक भाषेत बोलला. तसे रखमा अन अनुजा दोघींचे डोळे पाणावले. तितक्यात डॉक्टर राउंडला आले… डॉक्टर मित्रंच असल्याने सगळा सीन त्यांनाही सांगण्यात आला. ते म्हणाले “अरे बिलकुल जाऊदे. मी तर म्हणतो तुम्ही सगळे माझ्याच सोबत पंढरपूरला चला. मी पुढल्या आठवड्यात निघणार एकादशीचं दर्शन घेणार आणि परतणार. तुम्ही आठ दिवस अजून इथेच रहा… तो पर्यंत वहिनींची तब्येत अजून बरी होईल. काय म्हणता?” अनुजा एकदम सुखावली. तिची इतके वर्षांची इच्छा पूर्ण होणार होती. डॉक्टरनेच सुचवल्यामुळे अनिकेत आणि हर्ष पण तयार झाले. रखमाच्या आनंदाला उधाण आलं होतं!

अनिकेत, हर्ष एकदा अमरावती ला जाऊन आले. आणि आठ दिवसाने दोन गाड्यांमधे अकोल्याहून वारी निघाली.

एकादशीला अनुजासाठी व्हीलचेयरची व्यवस्था केल्या गेली. सगळ्यांनी मन भरून विठोबाचं दर्शन घेतलं अनुजा, रखमा च्या डोळ्यातून तर आनंदाश्रू वाहणं थांबत नव्हतं. अनुजा रखमा कडे वळून म्हणाली “रखमा, ही अशक्य वाटणारी वारी फक्त तुझ्या आणि विठ्ठला मुळे झाली बघ”… रखमा ने काही नं बोलता फक्त एक गूढ स्मित केलं… आणि विठ्ठलाला नमस्कार केला. तिच्या चेहऱ्यावर अनुजाला क्षणभर दैवी तेज जाणवलं. ती रखमा कडे बघतच राहिली… “अवं ताई आता मले माझ्या लोकाकडे सोडून द्या जी. ते समदे थांबलेत बगा माह्या साठी” रखमाच्या आवाजाने अनुजा भानावर आली “हो हो चला”
सगळे बाहेर आले. अनुजाने रखमाची साडी चोळी ने ओटी भरली, तिला नमस्कार केला. रखमाने पण सगळ्यांना नमस्कार केला. अनुजाने तिला घट्ट मिठी मारली. ड्रायव्हरला तिच्या सोबत दिले. आणि रखमा निघाली. ती दिसेनाशी होईस्तोर अनूजा तिच्या पाठमोरी आकृती कडे बघत राहिली… रखमाने तिचं काम चोख बजावलं होतं… अनुजाची वारी पूर्ण केली होती!

जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल !

सई देशपांडे
25.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026

सोबत दिलेल्या फोटोत मी केलेलं विठोबाचं वॉटर कलर पेंटिंग आहे.