मूळ प्रकाशन: पाठवा पुढे संस्कृती अर्थात फॉरवर्ड कल्चर - सुरपाखरू साहित्य
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
माझ्यासोबत सतत भ्रमण करणाऱ्या भ्रमणध्वनीवर सकाळी सकाळी एक संदेश येऊन आदळला – हो आदळलाच म्हणायचं आहे मला कारण ते तसेच येऊन पडतात – बॉम्ब पडल्यासारखे. मला तर कधी कधी वाटतं हे संदेश इकडून तिकडे पाठवणं म्हणजे आभासी जगात आपल्या कोर्टातला चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात अर्थात आपल्या भ्रमाणध्वनीतला संदेश दुसऱ्याच्या भ्रमाणध्वनीत पाठवण्याचा खेळ सुरू असावा. तसंही मैदानात जाऊन शारीरिक खेळ खेळणं दिवसेंदिवस कालबाह्य होईल. मग काय इकडचा चेंडू तिकडे करता आला नाही तर संदेश च इकडे तिकडे करत बसुयात. तसंही चेंडू काय एक च असणार. संदेश मात्र वेगवेगळे असतात. रंगीबेरंगी भावनांचे संदेश. सकाळच्या मॉर्निंग पासून तर रात्रीच्या नाइट पर्यंत चे – मध्ये दुपारची आफ्टरनून असतेच, सकाळच्या ब्रेकफास्ट पासून तर रात्रीच्या डिनर पर्यंत चे मध्ये दुपारचं लंच असतंच. आषाढी पासून तर कार्तिकी पर्यंतच्या एकादशा, संकष्टी पासून तर विनायकी चतुर्थ्या, सर्व महिन्याच्या सर्व प्रकारचे वाढदिवस, चवबदलासाठी दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद असे सर्व संदेश अखंड इकडून तिकडे फिरत असतात. आपण काय पाठवतोय याचं भान नाही, कोणाला पाठवतोय याच त्याहूनही नाही. धरलं की पाठवलं – आणि आठवलं की पाठवलं.
आता असा हा संदेश येऊन आदळलाच होता मला न विचारता तर विचार केला बेसावध राहून नंतर शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडण्यापेक्षा आता दिसलाच आहे तर घ्यावं दर्शन अगदी सविस्तर. पण दर्शन झाल्यावर थोडीशी निराशा वाट्याला आली आणि खूप मोठा दिलासा मिळाला. निराशा यासाठी की माझा उगाच वेळ गेला, दिलासा यासाठी की आणखी एक काम येता येता राहिलं. कारण तो माझ्या कामाशी संबंधित नव्हता. मुळात जिथे तो येऊन आदळला होता तिथे सदस्य असलेल्या कोणाच्याच कामाशी त्याचा संबंध नव्हता.
मग तो का आला? त्याला का पाठवण्यात आलं? तो पाठवताना त्याचा खरंच तिथे काही उपयोग आहे का याचा विचार न करता त्याला असंच पाठवून दिलं? सहज?
तर या पाठवा पुढे संस्कृती अर्थात फॉरवर्ड कल्चर च वैशिष्ट्यच हे बनत चाललंय की विचार कमी करा अन् कृती जास्त. कोणी काही विचारलं तर सांगता च येतं – हो हो आम्ही कळवलं आहे त्यांना. असं पाठवता पाठवता शेवटी जेव्हा आणखी समोर पाठवायला शिल्लक राहिलेलं नसतं कोणीच तेव्हा ती शेवटची व्यक्ती प्रत्यक्ष तो संदेश वाचेल अन् मग ठरवेल त्यावर कृती काय करायची ते. साखळीतल्या बाकी सर्व बिंदुंची मनावर व बुद्धीवर गांधारीप्रमाणे स्वखुशीने म्हणा अथवा नाईलाजाने पट्टी बांधलेली असल्यासारखी, थिजल्यासारखी अवस्था झालेली दिसते. गोष्टींची प्रासंगिकता नसतानाही सारासार विचार न करता ‘आता उरलो केवळ आवक जावकी पुरता’ अशी भूमिका बरेच जण घेताना दिसतात.
आमच्यासारखे धावून धावून दमछाक नको म्हणून बॅकवर्ड(?) राहिलेले मात्र वाचू देत, शहानिशा करू देत मग योग्य असेल तर पाठवूयात म्हणणारे मूर्ख ठरत चालले आहेत.