कोटकायन भाग - ०४

मागील भागावरून पुढे …

कोटक च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले होते. तसेच आमचा त्यांच्यासोबत झालेला करार सुद्धा संपत आलेला होता. त्यामुळे त्यांनी आता नवीन इमारतीमधे शिफ्ट व्हावे असा त्यांच्या वरिष्ठांचा आदेश आलेला होता. परंतु कोटक च्या दोन्ही टीम्स ची इच्छा तेथे जायची नव्हती. ती अगदी बंदिस्त इमारत असल्याने, तुमच्या बिजनेस सेंटरची सवय झाल्याने तिथे काम करणे सोपे नसणार असे बरेच विक्री प्रतिनिधी म्हणत होते.

तुम्ही काहीतरी करा ना सर! तुमच्या बॉस सोबत बोलून बघा, म्हणून काही जण माझ्या मागे लागले होते. पण ते शक्य नव्हते. कारण कोटकसोबतचा करार संपत आलेला होता. आणि ठरल्यानुसार आणि कंपनीच्या आदेशानुसार सर्वांना नवीन ठिकाणी शिफ्ट होणे भाग होते. आमच्या येथे कार्य करतांना त्यांना एका मोठ्या गॅलरी मध्ये उभे राहून enquiry हॅण्डल करता येत होत्या. तिथे मात्र एका जागी बसून अथवा थोडे मीटिंग रूममध्ये चक्कर मारत फोनवर बोलणे शक्य होणार होते. एकंदरीत बंदिस्त इमारत त्यांना आवडली नसली तरी त्यांना स्वतःला यासाठी तयार करणे भाग होते.

कोटकची एक टीम त्यांच्या नवीन इमारतीमधे शिफ्ट झाल्यानंतर दुसरी टीम शिफ्ट व्हायला काही दिवस बाकी होते. पुढे काही दिवसांत ते सुद्धा शिफ्ट झालेत.

अधून मधून त्यातील काही लोकांची भेट व्हायची. तसेच कधी कोण सोडून गेले, कुणाला बढती मिळाली ते सुद्धा समजत राहायचे.

आम्ही कोटक ला दिलेल्या सेवेमुळे आमच्या पी. एम. आर. बिजनेस सेंटर च्या टीमला पुन्हा एक नवीन अनुभव तर प्राप्त झालाच. शिवाय मला स्वतःला व्यक्तिगतरीत्या क्रेडिट कार्ड म्हणजे काय प्रकार आहे हे सुद्धा कळले. क्रेडिट स्कोर वाढविण्यासाठी कोणते कार्ड घ्यायला पाहिजे, एकूण मर्यादेच्या किती टक्के खर्च करायला हवा (आवश्यक असेल तरच), किती खर्च केल्यास क्रेडिट स्कोर वजा होऊ शकतो. आणि इतरही बरीच माहिती मिळत होती. त्यामुळे क्रेडिट कार्ड विषयी असणारे काही थोडे फार असलेले गैरसमज दूर झालेत.

आताही जेव्हा कोटक क्रेडिट कार्ड मधे कार्य केलेल्या प्रतिनिधींशी कधी कुठे एखाद्या मॉल मधे, पेट्रोल पंप जवळ भेट होते तेव्हा काही जुन्या आठवणी निघतात. कारण कॉर्पोरेट संबंध फक्त तेवढ्यापुरते मर्यादित न राहता आपण चांगले राहिलो तर कधीतरी कुठेतरी कितीही दिवसांनी का होईना असे व्यक्ती भेटले तर एकमेकांना सन्मान देऊन अवश्य बोलतात.

म्हणून जोडून ठेवणे तेवढे महत्त्वाचे असते. ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची एकप्रकारची मार्केटिंगचं नाही का…

३०दिवसात३० प्रयोग२०२६ #जुलै२०२६ #सुरपाखरु

वैभव शिरखेडकर

२४/०७/२०२६