वो फिर नहीं आते…ललित लेख

वो फिर नहीं आते…

आज २२ जुलै… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांचा वाढदिवस आणि याच वर्षी आपल्यातून कायमचे निघून गेलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री अजित पवार यांचाही वाढदिवस. देवेंद्रजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली…

आज सकाळी फेसबुकवर देवेंद्रजींची अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारी एक हृदयस्पर्शी पोस्ट बघितली. त्या पोस्टमध्ये पार्श्वभूमीला एक गाणं होतं आणि त्यातील एक ओळ मनाच्या अगदी खोलवर जाऊन भिडली… “उम्रभर चाहे कोई पुकारा करे उनका नाम… वो फिर नहीं आते…”
नकळत डोळ्यात पाणी आलं… किती साधी पण किती गहन गोष्ट आहे ही! हेच परम सत्य आहे… माझ्याही आयुष्यातले एकेकाळी अविभाज्य असलेले अनेक चेहरे नजरे समोर तरळून गेले… जे आता कधीच परत येणार नाहीत… काही वय झाल्यावर निघून गेले, पण काही अचानक… जिवाला चटका लावून गेले… आता उरल्यात फक्त आठवणी… किती क्षण भंगुर आहे आयुष्य!
मग आयुष्य इतकं क्षणभंगुर आहे, म्हणून जगायचंच नाही का?
नक्कीच जगायचं! अगदी मनसोक्त, आनंदाने आणि भरभरून जगायचं. पण इतकंच लक्षात ठेवायचं की आपल्या जगण्यामुळे इतरांच्या आयुष्यात वेदना निर्माण होऊ नयेत. आपण सगळे एकाच प्रवासाचे सहप्रवासी आहोत. कोणाचा थांबा आधी येईल, हे कुणालाच माहीत नसतं. किंवा कधी कधी अपरिहार्य कारणांमुळे त्यांची पुन्हा कधीच भेट होत नाही.
म्हणून नाती जपावी, माणसं जपावी, संवाद जपावे. आपल्या स्वार्थासाठी इतकंही खालच्या पातळीला जाऊ नये की एखादी व्यक्ती गेल्यावर तिच्याविषयी आठवण्यासाठी एकही चांगली आठवण शिल्लक राहू नये. अर्थात, कुणी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल, अन्याय करत असेल, तर भगवद्गीतेने शिकवल्याप्रमाणे योग्य वेळी ठामपणे उभं राहणं आणि आवश्यक तो दंड देणं हेही आपलं कर्तव्य आहेच, पण शक्य असेल तिथे मनात कटुता न ठेवता माणुसकी जपण्याचा प्रयत्न करावा. नाती जपण्याकडे आपला कल असावा.
आज सगळी कडे प्रचंड अपराध घडताहेत ते माणूस एकटा पडत जातो आहे म्हणून असं मला वाटतं… लहान सहान गोष्टिंकडे दुर्लक्ष करून नाती टिकवून बघा… जग नक्कीच बदलेल.
माणूस हा सोशल प्राणी आहे म्हणजे त्याला समूहात राहायला आवडतं. समाजात कुठल्याही बाबतीत कुणी एकटं पडलंय असं लक्षात आल्यास त्याला आधार द्यावा… संवाद साधावा… कारण आपल्या एका सहानुभूतीच्या शब्दाने, त्याला जगण्याची ताकद मिळू शकते… हा माझा अनुभव आहे.

शेवटी जन्म होतो तेव्हाच हे ठरलेलं असतं कि आपण देखिल जाणारच आहोत पण आहोत तो पर्यंत आपल्या आयुष्यात येणाऱ्यांसोबत समृद्ध जगून घ्यावं कारण… “वो फिर नहीं आते…”

सई देशपांडे
22.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026