आकाश गुरुजी

मूळ प्रकाशन: आकाश गुरुजी - सुरपाखरू साहित्य

गेल्या १७ वर्षांपासून आकाश आमच्याकडे येतो. त्याच्या वयापेक्षा तो फार कमी परिपक्व होता, नव्हे तर त्याचे वागणेही जरा विचित्रच होते. तो सायकल घेऊन कॉलनीतून जात असताना त्याला जे जे ओळखतात त्यापैकी काहीजण त्याला चिडवत असे. त्यामुळे तो त्या लोकांशी हुज्जत घालायचा. कधीतरी त्याच्याविषयी ऐकण्यात आले. त्याला माईल्ड ऑटीझम आहे म्हणून तो असा विचित्र वागतो.
एकदा तर कुणीतरी त्याला म्हटले,
अरे आकाश तुझी सायकल उलटी चालत आहे. बिचारा आकाश सायकलवरून उतरून बघत होता ती खरच उलटी चालते आहे की काय? हे सर्व बघून चिडविणारा हसायला लागला आणि आकाश त्याच्यावर ओरडू लागला.
आमच्याकडे मात्र आकाशला योग्य ती वागणूक दिल्या जात होती. घरी काम करणाऱ्या एका स्टाफ ने त्याला चिडविले तेव्हा आमच्या आजींनी त्या स्टाफ ला चांगले रागावून म्हटले,
का रे.. तुमच्या घरचा कुणी मुलगा मुलगी असे असते तर, त्यांना कुणी असेच चिडविले असते तर तुम्ही चूप बसले असता का?
कॉलनीमध्ये आमच्याकडे जास्त त्याचे येण्याचे हेच कारण की, त्याला जास्त सन्मानपूर्वक वागणूक भेटत होती. पण सहज म्हणूनही आणि एक मित्र म्हणून सुद्धा गंमत केली की तो जाम चिडायचा.
आकाश आताही घरी येतो. सगळ्यांची विचारणा करतो आणि कॉलनीमध्ये काय सुरू आहे याची बातमी देत राहतो. आम्ही त्याच्या नेहमीच्या बडबडीला कंटाळतो पण शेवटी मनात विचार येतो, आपल्याकडे कुणी असा असता किंवा असती तर. त्यामुळे तो आला की त्याच्याशी बोलायचे आणि खीदळायचे.
मागच्या आठवड्यात आकाशचा वाढदिवस होऊन गेला. तसे त्याने स्वतः फोनकरून सांगितले होते की त्याचा वाढदिवस आहे वगैरे म्हणून. त्याने त्यादिवशी घरी येऊन आमच्यासाठी चिप्स चे पाकिट घेऊन आला.
अशात मग कधी आमच्याकडे जास्त वेळ झाला तर त्याच्या घरच्यांचे त्याला फोन येतात. मग तो सांगायचा आजीकडे बसलो आहे. विश्वास नसेल होत तर आजींना फोन देतो. असे म्हटल्यावर त्याच्या घरच्यांचे समाधान होते.
तसे बघितल्यास गेल्या काही वर्षांमधे आकाश मधे बरीच सुधारणा झाली. त्याला विशेष कारण म्हणजे तो पौरोहित्य करायला लागला. काही आजुबाजूच्या मंदिरांमध्ये पूजा, घरोघरी सत्यनारायण, अभिषेक हे कार्य तो नित्यनेमाने करतो. वैदिक मंत्र शिकल्याने त्याच्यामधे विशेषतः स्वभावात बराच फरक पडला. खरं म्हणजे आकाश आता आकाश गुरुजी झाला.
आता आकाश चाळीशीचा झालाय. जरी पूर्णपणे त्याच्यामधे परिवर्तन झाले नसले तरी आता तो पहिलेप्रमाणे आक्रमकपणे हुज्जत फारसा घालत नाही हे महत्त्वाचे. याचे श्रेय त्याच्या आईलाही तेवढेच देणे भाग आहे. कारण जन्मदात्री आई त्याचा जन्म झाल्यावर काही गर्षांनी गतप्राण झाल्यामुळे त्याच्या सावत्र आईने सख्ख्या आईसारखा त्याचा सांभाळ केला. आणि वडिलांनी पौरोहित्य शिकण्यास प्रोत्साहित केले.
आपल्या आजुबाजूला सुद्धा असे आकाश असू शकतात. अशा व्यक्तींना सन्मानाची जास्त गरज असते.