वॉल्व! - ललित लेख

वॉल्व!

“अरे, ही मशीन अचानक का बंद पडली?”
रोहनने घाईघाईने विचारलं.

मेकॅनिक हसला. “मशीन बिघडलेली नाही. फक्त एक वॉल्व खराब झाला आहे.”

“फक्त वॉल्व मुळे?”

“हो! वॉल्व नीट काम करत असेल, तरच दाब योग्य दिशेने जातो. पण तोच खराब झाला, तर संपूर्ण मशीन थांबू शकतं.”

वॉल्व… आपल्या अस्तित्वाचा फार गाजावाजा न करणारा, पण कामाने अत्यंत महत्त्वाचा यांत्रिक भाग!

कोणत्याही मशीनमध्ये वॉल्वचं मुख्य काम म्हणजे द्रव किंवा वायूचा प्रवाह नियंत्रित करणं. कधी तो प्रवाह सुरू करतो, कधी थांबवतो, तर कधी योग्य दिशेनेच जाऊ देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जिथे उलटा प्रवाह होऊ नये अशी गरज असते तिथे तो ठामपणे अडवून उभा राहतो. त्यामुळे मशीन सुरक्षित राहते, दाब संतुलित राहतो आणि संपूर्ण यंत्रणा सुरळीत चालते.

अगदी अशीच अद्भुत रचना आपल्या शरीरातही आहे.

हृदयात असलेले वॉल्व रक्ताला योग्य दिशेने वाहू देतात आणि त्याला परत मागे फिरू देत नाहीत. पायांच्या शिरांमधील वॉल्व गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध रक्त वर नेण्यासाठी मदत करतात. वर गेलेल्या रक्ताला खाली येऊ देत नाहीत. जर हे वॉल्व नीट काम करत नसतील, तर रक्त साचू लागतं, शरीर यंत्रणा बिघडते आणि अनेक व्याधी निर्माण होतात.

यंत्र असो किंवा शरीर… वॉल्व वर संपूर्ण व्यवस्था अवलंबून असते.

आपल्या आयुष्यातही काही माणसं अशीच असतात…
जेव्हा आपण अपयशाने खचतो, आत्मविश्वास ढासळतो, परिस्थितीचा भार असह्य होतो आणि आपण खाली कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभे असतो… तेव्हा ही माणसं आपल्या आयुष्यातील वॉल्व बनतात.
ते आपल्या वेदनांचा भार काही काळ स्वतःवर घेतात. ते आपलं कुठे चुकतंय सांगून योग्य दिशा दाखवतात आणि पुन्हा उभं राहण्याचं बळ देतात. आपण मागे खेचले जात असताना, ते उलट प्रवाह थांबवतात. आपण कोसळू नये म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.
हे लोक आई-वडील असू शकतात, जीवनसाथी, मित्र, शिक्षक, भाऊ-बहिण… किंवा कधी एखादी अशी व्यक्ती, जिच्याशी रक्ताचं नातं नसतं… पण मनाचं नातं असतं!
त्यांच्या एका शब्दामुळे, एका विश्वासामुळे किंवा फक्त त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्या आयुष्याला नवं वळण मिळतं.
म्हणून आयुष्यातील अशा “वॉल्व” माणसांना जपा.
कारण मशीनमध्ये वॉल्व नसला, तर यंत्रणा कोलमडते. शरीरात वॉल्व निकामी झाले, तर जीवन धोक्यात येतं. आणि आयुष्यात अशी माणसं नसतील, तर माणूस बाहेरून उभा दिसला तरी आतून केव्हाच कोसळलेला असतो.
तुमच्या आयुष्यातही एखादा असा “वॉल्व” नक्की असेल… ज्याने योग्य वेळी आधार देऊन तुमचं आयुष्य खाली कोसळू दिलं नाही. अशा माणसांना जपा आणि मनापासून आभार माना कि अशी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत!

सई देशपांडे
18.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026